Tuesday, 21 September 2021

श्रीदत्त तुम्ही

 श्रीदत्त तुम्ही, त्रिगुणी मूर्ती

अनसूयाउदरी, अवतरती

ब्रम्हा हर आणि, विष्णू रुपा

हे गुरुदेवा, हे अवधूता ।। 


हे स्मितवदना, सुंदरनयना

हे मृदुलकरा, पावनचरणा

शांती स्वरूपा, अद्भुतचरिता

सात्विकरूपा, श्री गुरुदत्ता ।। 


हे दंड कमंडल, कमल धरा

हे अत्रिनंदना, विघ्नहरा

हे अभयकरा, भवतापहरा

हे दत्त दिगंबर, तिमीरहरा ।। 


अवतार तुझा, पतितोद्धारा

स्मरताच मनी, दिसतोची खरा

षड् रिपु रुपीच्या, आक्रमणा

थोपविसी तू, भयमुक्तकरा ।। 


वेदांग तुझ्या, अवतीभवती

ही नम्र धरा, कपिला पुढती

सद्रक्षण हाती, त्रिशूल सदा

हे शंखचक्रधर, नीतवरदा ।। 


तव नाम मुखी, वसुदे सखया

तव रूप नयनी, दिसुदे प्रणया

हृदयी तव मूर्ति, स्थापित ही

श्वासोच्छ्वासी, तव कीर्तनही ।। 


हा प्राण तुझा, हा शब्द तुझा

हा देह तुझा, आनंद तुझा

हा भाव मनीचा, अर्पियला 

श्रीदत्तचरणरज, उद्धरिला ।।


*****श्रीदत्तचरणरज*****

Sunday, 5 September 2021

डॉ राधाकृष्णन जीवनी

 जाणून घेऊ ... डॉ राधाकृष्णन जीवनी (शिक्षक दिन) 


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म  5 सप्टेंबर 1888 रोजी तत्कालीन मद्रास प्रांतात चित्तूर जिल्ह्यात तिरुत्तनी गावात झाला. हिंदूधर्मसंस्कारात वाढलेल्या राधाकृष्णन यांचा वेद, उपनिषद, पुराणे, धर्मतत्व याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या अनेक लेखातून त्यांनी आपली धर्मविषयी मते समाजापुढे ठेवली. संस्कृत, हिंदी, तेलगू, तामिळ, इंग्लिश आदी अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वामी विवेकानंद यांना ते आदर्श मानत. 

ख्रिश्चन मिशनरी शाळा व कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना हे जाणवले की यातून हिंदू धर्माची अवहेलना होत आहे व आपल्या संस्कृतीला दूषणे देऊन धर्मप्रसाराला जोर दिला जात आहे. याला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतःचा धार्मिक अभ्यास वाढवून तर्कातून त्यांनी मिशनरीना सडेतोड उत्तरे दिली. त्यांनी धर्मवेदांत फिलॉसॉफी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व देशविदेशातील अनेक नामांकित जर्नलमध्ये आपले थेसिस लिहिले. वयाच्या 21व्या वर्षी सन 1909 ला त्यांनी कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. 1962 पर्यंत ते देशातील व परदेशातील अनेक नामांकित कॉलेजात प्राध्यापक, विश्वविद्यालयात कुलगुरू व ऑक्सफर्ड विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात  प्राध्यापक (असे मानाचे पद मिळवणारे पाहिले भारतीय) म्हणून कार्यरत होते. अख्या जगास त्यांनी आपल्या बुद्धीवर्चस्वाने मंत्रमुग्ध करून ठेवले होते. जागतिक दर्जाच्या शेकडो विद्यापीठातून त्यांना लेक्चरसाठी व विविध पदे भूषावण्यासाठी बोलावणे येई. जवळपास 100 पेक्षा जास्त जागतिक विद्यापीठांकडून त्यांना सन्माननीय उच्च पदवी व मेरिट बहाल करण्यात आल्या होत्या. हे एकमेव असे व्यक्तिमत्व होते ज्यांचा जगाने इतका सन्मान केला असेल. 

ब्रिटिशांनी शिक्षणक्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना सर या पदवीने भूषित केले होते, जी त्यांनी स्वातंत्र्यानंतर वापरणे सोडून दिले व डॉ. ही आपली शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे मिळवलेली पदवी लावणे योग्य मानले. 

त्याचवेळी राजकीय क्षेत्रात न येता सुद्धा त्यांचे तिथे बुद्धीवर्चस्व होते व म्हणूनच 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री स्वातंत्र्यदिनाला त्यांनी देशाला संबोधित करावे ही तात्कालीन संविधान सभेची इच्छा होती. त्यांनी तसे केले व अत्यंत उत्कृष्टपणे देशास संबोधित केले. 

13 मे 1952 रोजी त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. ते या पदावर 14 मे 1957 पर्यंत होते. 

देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना 1954 रोजी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.

 यानंतर 13 मे 1962 रोजी ते भारताचे दुसरे राष्ट्रपती नियुक्त केले गेले. या पदावर ते 13 मे 1967 पर्यंत राहिले. 

हे सर्व कार्य करीत असताना त्यांनी ज्ञानदान अखंड सुरूच ठेवले होते व त्यांच्यातील हाडाचा शिक्षक त्यांना कधीच गप्प बसू देत नव्हता. आयुष्याची अंदाजे 40+ वर्षे त्यांनी अविरत ज्ञानदान केले. 

राष्ट्रपती असताना, त्यांचे काही विद्यार्थी व मित्र 5 सप्टेंबर 1962 रोजी त्यांना भेटायला व त्यांचा वाढदिवस साजरा करायला त्यांच्या कार्यालयात गेले असता डॉ राधाकृष्णन यांनी अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करायला साफ नकार दिला. तेंव्हा ते म्हणाले की तुम्हाला आजच्या दिवशी काही करायचेच असेल तर ते देशातील शिक्षकांसाठी करा. त्यांच्या या इच्छेखातर देशात त्यावर्षीपासून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा होऊ लागला. 

Thursday, 2 September 2021

देते व्हा...

 देते व्हा... 


जन्मताच प्रत्येक मनुष्यप्राणी प्रकृतीच्या अधीन असतो. प्रकृती नियमाप्रमाणे तो जगतो, वागतो. त्याचे सर्वाधिक परिश्रम कुठे होत असतील तर एखादी गोष्ट मनासारखी घडवून आणणे, एखादी गोष्ट मिळवणे. थोडक्यात, मला यातून काय मिळणार आहे हे तो प्रत्येकात शोधत असतो. हे प्राकृतिक आहे. 


काही ठिकाणी या प्रकृतीवर विकृतीचा विजय झालेला दिसतो, जिथे येन केन प्रकारेण सर्व मलाच कसे मिळेल याची धडपड दिसते. मला नाही मिळाले तर इतर कुणालाही मिळून देणार नाही, प्रसंगी त्याला खाली खेचून, पाडून आपण पुढे जाणे या खलनायकाच्या रुपात ही विकृती आपल्याला समाजात दिसते. 


बहुतांश वेळा या विकृतीवर शेवटी संस्कृतीचा विजय झालेला दिसतो. असे सुसंस्कारित लोक स्वतःपुरता विचार न करता वसुधैव कुटुंबकम् हे ध्येय निश्चित करून समाजकल्याण करताना दिसतात.  देव, देश व धर्म यासाठी ते जीवनार्पण करता व असे करत असताना त्यांच्या जीवनात एकच ध्यास असतो -  "देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें." 


निसर्ग कायम आपल्याला मुक्तहस्ते द्यायला शिकवत आलेला आहे व यातूनच आपली परोपकारी भारतीय संस्कृती उदयास आली आहे. 


परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः। परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम् ॥ 


वृक्ष फळ देतात ते दुसऱ्यासाठी, नदी पाणी देते ते दुसऱ्यासाठी, गाय दूध देते ते दुसऱ्यासाठी, अगदी तसेच आपले शरीरसुद्दा परोपकारी खर्ची लागले पाहिजे हेच हा श्लोक सांगतो.  


सूरज हमें रौशनी देता, हवा नया जीवन देती है । 

भूख मिटने को हम सबकी, धरती पर होती खेती है ।

औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखें ।।

गरमी की तपती दुपहर में, पेड़ सदा देते हैं छाया ।

सुमन सुगंध सदा देते हैं, हम सबको फूलों की माला ।

त्यागी तरुओं के जीवन से, हम परहित कुछ करना सीखें ॥ 


निसर्गातील सर्वच गोष्टी आपल्याला दुसऱ्यासाठी जगायला शिकवतात. यात एक महत्वाचा मुद्दा लपला आहे. आपण ज्यावेळी दुसऱ्यासाठी निःस्वार्थपणे काही करत असतो, त्याच वेळी कुठेतरी कुणीतरी आपल्यासाठीसुद्धा नक्की काहीतरी करत असतोच.

म्हणूनच सतत मी,माझे,मला आणि फक्त मलाच,  हे न करता आपली जाणिवेची सीमा वाढवून समाजाचे देणे जाणून घेतले पाहिजे. 


जो अनपढ़ हैं उन्हें पढ़ाएँ , जो चुप हैं उनको वाणी दें ।

पिछड़ गए जो उन्हें बढ़ाएँ, समरसता का भाव जगा दें ।

हम मेहनत के दीप जलाकर, नया उजाला करना सीखें ॥ 


हे जेंव्हा आपल्याला जाणीवेतून लक्षात येईल तो सुदिन असेल. 

आपली भारतीय संस्कृती या गोष्टीवरच आधारित आहे व म्हणूनच आजवर इतकी आक्रमणे होऊनही ती टिकून आहे तग धरून आहे. 

चलातर मग, आपल्या उर्वरित आयुष्यातले क्षण 'प्रकृतीनियम' पाळून जगताना थोडे 'संस्कृतीनियम' पाळून जगूया. देते होऊया. 

Tuesday, 24 August 2021

श्रीकृष्ण शरणं मम

 ओळख मला राधे ओळख मला,

कोणाचा मी कोण राधे ओळख मला ।।

मथुरेस जन्म झाला, गोकुळात केली लीला

गोपालांचा पालनबाला, ओळख मला ।। 


श्री संत एकनाथांची ही एक माधुर्यपूर्ण प्रेमपूर्ण गौळण ज्या कान्होबाच्या ओढीने रचली गेली, त्या कान्होबाचा, त्या गोपालाचा, त्या मदनमोहनाचा धरावतरण दिन अर्थात गोकुळ अष्टमी!

भयभंजन, नरमृग, पंकजनाभ, नगधर, चक्रपाणि अशी असंख्य नामाभिधाने मंडित केलेला  हा देवाधिदेव या भूतलावर अवतरला तोच मुळी तमाचा नाश करायला. 


अंधाऱ्या पावसाळी रात्री अवतरताच सर्वप्रथम नाश केला तो मातापित्यांच्या पुत्रमोहाचा, कारण जन्मताच पुत्रत्याग सोसावा लागणार होता ना त्यांना! मथुरेतून बाहेर पडतानाच कंसरुपी अहंकाराचा विनाश लिहिला गेला होता. इथून पुढे जणू काही 'सद्रक्षणाय खल निग्रहणाय' हे ब्रीदच घेऊन श्रीकृष्णाने आपले जीवनयापन केले.  धर्मो रक्षति रक्षित: हे कुणी जगण्यातून शिकवले असेल तर ते श्रीकृष्णाने! 


अष्टमीला जन्म घेऊन मानवी मनातील अष्टरिपूमर्दन (काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर, संशय, चिंता) करायचे काम कुणी केले असेल तर ते अमृत वार्षिणी श्रीमद्भग्वद्गीतेद्वारा या श्रीकृष्णानेच! 


कसा होता माझा कान्हा? 


गुरुवंदना, विनम्रता, कर्मशीलता, कार्यकुशलता इत्यादी गुणांचे भांडार म्हणजे हा चक्रधर!

भोगरहीत वात्सल्यप्रेम काय असते हे शिकण्याचे विद्यापीठ म्हणजे श्रीराधाकृष्ण !

मित्रप्रेम, बंधुभगिनीप्रेम, आप्तेष्टप्रेम, समाजप्रेम, निसर्गप्रेम असा प्रेमफुलोरा म्हणजे तो कन्हैय्या!

मानवी समाजाचे, मूल्यांचे, नीतीचे, परंपरेचे, धर्माचे अहित करणारा तो संपूर्ण समाजाचा शत्रू असतो, भले तो परकीय असो वा स्वकीय. अश्या शत्रूला वेळीच ओळखून त्याचा समूळ विनाश करणे हाच पुरुषार्थ आहे ही शिकवण स्वतःच्या वागण्यातून देणारा तो हा मायापती! 


अश्या अष्टावधानी प्रभूअवताराला स्मरण करून हे गुण अंगी बाणण्याचा हा दिवस म्हणजे गोकुळअष्टमी. 


श्रीकृष्ण शरणं मम

Wednesday, 4 August 2021

कोण जातीचा रे तू दीनानाथा?

 कोण जातीचा रे तू दीनानाथा? 

भक्तांच्या आर्त हाकेपोटी वैकुंठ सोडून भूलोकी आलेल्या हे सावळ्या, तू कोणत्या कुळातला आहेस रे? जात काय तुझी? भक्ताने फेकलेल्या विटेवर गुमान तिष्ठत उभ्या असलेल्या हे जगन्नाथा, तुझी जात कोणती? कुणाचे उष्टे आनंदाने खाणाऱ्या तर कुणाच्या घरी पाणी भरणाऱ्या हे नारायणा, कोण जात रे तुझी? 

कुणाच्या शेणी लावणारा, कुणाची शेती करणारा, कुणाची मडकी भाजणारा तर कुणाची वस्त्रे विणणारा तू काय जात सांगशील रे तुझी? 

ज्ञानदान करणारा आणि ढोरकाम करणाराही तूच ना रे विश्वेशा? मासे मारणारा आणि संजीवनी प्रदान करणारा तू कुणी वेगळ्या जातीचा होता का रे? व्यापार करणारा, बाग फुलवणारा, दागिने करणारा, जोहार घालणारा, कपडे शिवणारा तू कोण जातीत जन्माला आला आहेस रे आदीनाथा? 

सांग ना रे अच्युता, हे अखंडा, अरे अभंगा, हे अनंता, तुझी जात कोणती?


*****श्रीदत्तचरणरज*****

श्रीविष्णू श्रेष्ठ का श्रीशंकर?

 श्रीविष्णू श्रेष्ठ का श्रीशंकर? आज निकालच लावू..


- उदयास आलेल्या नवसृष्टीचा अस्तापर्यंत प्रतिपाळ करणारा श्रेष्ठ का तेजोभंग झालेली सृष्टी विलीन करून नवनिर्मितीस चालना देणारा श्रेष्ठ? 

- कुकर्मे अमर होऊ नयेत म्हणून त्यास अमरत्वापासून परावृत्त करणारा व सत्कर्मांना चालना देणारा मोहिनीराज श्रेष्ठ का सृष्टीचा अकाली अध:पात टळावा म्हणून विषधारण करणारा नीलकंठ श्रेष्ठ? 

- भक्तांच्या हाकेसाठी वैकुंठवैभवीचा त्याग करून धरेवर युगानुयुगे तिष्ठत उभा असलेला तो रमापती श्रेष्ठ का पृथ्वीवर शक्ती स्थापनार्थ स्वभार्येच्या देहाची शकले होताना बघणारा तो सतीपती श्रेष्ठ? 

- वैभवराज असूनही अलिप्त असणारा तो मदनमोहन श्रेष्ठ का अलिप्ततेचे महावैभव अंगोपांगी मिरवणारा तो भस्मरुंडजटाधर श्रेष्ठ?

- अलकनंदेचा बद्रीनारायण श्रेष्ठ का अलकनंदेचाच केदारनाथ श्रेष्ठ? 

- शून्यात पूर्ण आहे हे दाखवणारा श्रेष्ठ का पूर्णात शून्य आहे हे सांगणारा श्रेष्ठ? 

- रामरूपी शिवनाम जपणारा श्रेष्ठ का शिवध्यानी राम नाम जपणारा श्रेष्ठ? 

- विठ्ठलरुपी मस्तकी लिंग धारण करणारा श्रेष्ठ का हनुमंतरुपी हृदयी राम धारण करणारा श्रेष्ठ? 


*****श्रीदत्तचरणरज*****

Tuesday, 20 July 2021

वीटेवरी तू श्रीरंगा

 वीटेवरी तू श्रीरंगा, सभोवती चंद्रभागा,

चरणी घेसी पांडुरंगा, करीशी तू मोहभंगा ।।

नको रुसू नारायणा, धाव घेई रे रक्षणा,

भक्त तुझा दीनवाणा, भाकतसे रे करुणा ।।

भेट देई कडे घेई, नको दूर लोटू आई,

देऊनिया स्तनपाने, तृप्त करी गे विठाई ।।

कोंडूनिया का तू घेसी, काय चुकले सांगसी,

वाट पाहे अनिमिषी, अश्रू वाहे लोचनासी ।।

संताघरी तू नांदसी, पाठी उभा लक्ष देसी,

संत कामी हात देसी, संत मुखे नाम घेसी ।।

पाणी भरी दळण करी, बाग शेतीभाती करी,

संत रूप धरुनी हरी, कष्ट घेसी अंगावरी ।।

अशी माऊली प्रेमळ, धन्य धन्य संत कूळ ,

छेदी अभद्राचे मूळ, उरे नाम ते केवळ ।।

तसे लक्ष देसी आता, तारी तू अनाथनाथा,

दत्तचरणरज प्रार्थी आता, चरणी तुझ्या ठेवी माथा ।।


       *****श्रीदत्तचरणरज*****


Wednesday, 23 June 2021

धरिले हाती गुरूने मजला मार्ग दाखवाया

 माझे मीपण नुरले उरले नाम तुझे देवा

तोडी जे भवबंधपाश ही नामाची सेवा 


धरिले हाती गुरूने मजला मार्ग दाखवाया

नामातून भवसागर तो ही पार करायाया 


नाम श्वास तो कर्मधर्म हा नामची जाणावा

रात्रंदिन नामाचा महिमा श्रवणी ऐकावा 


उभा पाठीशी नामाच्या तो नित्य निरंजन

नामचि मारी अहम् घालुनी नेत्री अंजन 


नाम सगुणी प्रथम दर्शवूनी होते निर्गुण

विरून जाई साधक नामी पटता ही खूण 


भार वाहुनि त्याच्या चरणी होउनी निर्धोक

चालवी मग तो हात धरोनि होई रे निःशंक 


मी तू पण ते सांडूनि गेले सरले ते कष्ट

नाम साधते शिव तल्लीनता होई एकनिष्ठ 


एकनिष्ठ तव चरणी होता समाधान प्रकटले

सर्वस्वही तव चरणी अर्पून एकरूप जाहले


   *****श्रीदत्तचरणरज*****

Thursday, 17 June 2021

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,

 या रचनेत पहिली ओळ श्रीसंत वाङ्मयातून घेतली आहे. 

बाकी सर्व श्रीदत्तकृपेने माझ्याकडून लिहून घेतले आहे. 


रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,

कर्म करा चांग परमात्म्याचे ।।


काम आणि क्रोध, करिती विरोध, 

लाविती निरोध, नामस्मरणी ।।

मदे मत्सरे या, भरले हे मन

करताती दीन, सर्वकाळी ।।


मोह आणि लोभ, जागविती क्षोभ

शून्य तो हिशोब, कर्तृत्वाचा ।।

दंभे अभिमाने, फुगतो गर्वाने

चाले ताठ माने, जगतापुढे ।।


संशये ही चिंता, वाढ वाढे आता

उणे नाही आता, विषयांचे ।।

विषयांचा घाला, मनावरी झाला

युद्ध हाचि उरला, मार्ग एक ।।


अकारण करुणा, सद्गुरू भेटले

नाम शस्त्र झाले, युध्दामाजी ।।

धरूनिया हाती, आयुष्याची दोरी

सद्गुरू सावरी, अंतरंग ।।


सद्गुरुची झाला, जीवनाची ढाल

विषयांचि चाल, लोटताहे ।।

नाम तलवार, कापीती समूळ

विषयांचे कूळ, नष्ट होई ।।


मन निर्विकार, करुनिया चार

पुरुषार्थ थोर, देवे दिधले ।।

चारी मुक्ती कर, जोडुनिया येती

सद्गुरुंची आरती, गाती बाळी ।।


ऐसे ईश कृपे, मज रिते केले

ईश प्रेमे भरिले, अंतरंग ।।

अंतरंगी व्याप्त, परमनिधान

देही कर्म जाण, देवाचेच ।।


माझे मी सरले, त्याचेची उरले

अर्पण हे केले, धन मन तन ।।

तो बोले ते करावे, तो सांगे ते ऐकावे

तो दावी ते पाहावे, हेचि कर्म ।।


देह ईश काजी, झिजो हीच आस

दत्तचरणरजास, घेई जवळी ।।


*****श्रीदत्तचरणरज*****

ओम जय गुरू अवधूता

श्रीदत्तकृपेने माझ्याकडून लिहून घेतलेली श्रीदत्त आरती (चाल ओम जय जगदीश हरे)

ओम जय गुरू अवधूता, दत्ता जय जय अवधूता
स्मर्त्रुगामी प्रभू आपण, हरिसी मम चिंता ।। धृ।।
अवतरिसी तू भू वरी, तारिसी भक्तांसी
आधिव्याधी निवारण, जळती पापराशी ।। 1।।
मेरू पर्वती राहुनी, माहुरी निद्रेला,
कथा निमिषारण्यी, सागरी संध्येला ।।2।।
काशीस स्नान करोनि, चंदन पंढरीला
करविरी भिक्षा घेऊनि, भोजनी पांचाळा ।।3।।
भुवनी घेऊनि तांबूल, गिरीनारी जासी
योग ध्यान तू करिसी, पर्वत शिखरासी ।।4।।
सहस्र वर्षे झाली, तुझिया अवतारा
साक्ष देशी तू आजही, हे पतितोद्धारा ।।5।।
शरणांगतासी जोडी, विषयपाश तोडी
त्रिविधताप परिहारुनी, नामा दे गोडी ।।6।।
अनन्यभावे भजता, तारिसी तू मजला
दत्तचरणरज प्रार्थी, सर्व अर्पि तुजला।।7।।

Saturday, 12 June 2021

मूक वदनी शब्द देऊनी

 मूक वदनी शब्द देऊनी,बोलते केलेस तू

बोधरुपी अमृताचे, ज्ञानद्रव दिधलेस तू ।।

शब्द जिव्ही अर्थ दिधला, शब्दब्रम्ह साकारले

शब्दब्रम्ही प्राण फुंकूनी, चेतनी आलास तू  ।।

जाणीवाही तूच दिधल्या, मानसीच्या सागराला

करूणमूर्ती होऊनिया, जीवनी आलास तू ।।

भावनेचे हेलकावे, थोपवूनी अंतरी

नामरूपी दोर टाकुनी, तारले भवसागरी ।।

जीवनाला अर्थ दिधला, कर्म धर्म नी मोक्ष तू

साधकाच्या आर्ततेला, साद देशी सिद्ध तू ।।

देहरूपे मर्त्यलोकी, आणूनी दावीयले

नामरूपी निर्झराचे, स्नान तू घडवियले ।।

नामदाता अन विधाता, कर्म तू निष्कर्म तू

बाह्य आणि अंतरी तू, सर्व तू सर्वत्र तू ।।

श्वास हा नामात बुडूनि, रंगवितो चित्र हे

प्रकटला चित्रामधुनी, अंतरंगी एक तू ।।

कोण मी अन कोण तू, सांगा कसे मी ओळखू

दर्पणि या रूप त्याचे, तोच मी अन मीच तू ।।

Thursday, 10 June 2021

श्वास माझा दत्त, ध्यास एक दत्त

 श्वास माझा दत्त, ध्यास एक दत्त

करू पुरुषार्थ, दत्त कृपे ।।


मुखी घेता नाम, चरणी प्रणाम

होई तो विराम, वासनेचा ।।


विषयांचे मूळ, तोडी तो समूळ

उद्घरितो कूळ, नामस्मरणे ।।


मूळमायेचा तो, छेदिता पडदा

दिसे रूप सदा, त्रैमूर्तीचे ।।


सांडावे हे तन, अर्पावे हे मन

वाहावे हे धन, दत्त काजी ।।


झालिया फकीर, सांडो नये धीर

करितो खंबीर, परमार्थी तो ।।


दत्त चरणांशी, अर्पूनिया भाव

पदी देई ठाव, माऊली ही ।।


रंगताचि रंगी, तल्लीन श्रीरंगी

जन्म मृत्यू भंगी, मोक्ष दाता ।।


त्रैलोक्याचे सुख, देई तो अनंत

व्हावे अवधूत, दत्ता संगे ।।


*****श्रीदत्तचरणरज*****

Saturday, 5 June 2021

मनोगताची कविता

 🎂🎂🎂🎂💐मनोगत💐🎂🎂🎂🎂

2019

गर्भावस्था, अर्भकावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था आणि आज तरूणावस्था सरली. आज चाळीशी संपली. 41 वा वाढदिवस. प्रौढावस्था की काय ती सुरू झाली. सिंह राशीचा मी सिंहावलोकन करताना ह्या विचारात पडलो की ह्या इतक्या साऱ्या वर्षाचा ताळेबंद मांडला तर तो कसा दिसेल?

            उत्तम संस्कारात वाढलो. कर्म करत गेलो, धर्माच्या चार गोष्टी केल्या, अर्थार्जनही केले. भरपूर शिक्षण पदरी पाडले, देश विदेशाचा अनुभव गाठीशी बांधला. घर, गाडी घेतली. बायकोपोरांसकट संसारही उत्तम सुरू आहे. मुख्य म्हणजे खूप चांगली माणसे ह्या आयुष्यात सोबत आहेत.

         हे सर्व काडीकाडीने जमवत आणि कमवत असताना आयुष्याने खूप चढ उतार दाखवले, खूप वादळे आली, अजूनही येतच आहेत. गोष्टी आल्याही आणि गेल्याही. बरीच माणसे जवळ आली. त्यातील काही वेळेप्रमाणे सोडून गेली तर काहींना मला सोडून द्यावे लागले. एक मात्र आहे की कितीही जीवघेणे प्रसंग आले तरी जीवनाचा प्रवाह मात्र थांबू दिला नाही.

      शेवटी काय, तर ह्या अनुभवरूपी पाथरवटाने जे काही छिन्नी हतोड्याचे घाव माझ्या आयुष्यावर मारले आहेत त्यातून अंततः एक सुबक मूर्तीच घडेल ह्याच विश्वासाने हे पुढील जीवन व्यतीत करणे आहे. 

      इतकी वर्षे मी समाजाकडून बरेच काही घेतले. अजूनही घेत आहेच. पण आता जसे जमेल तसे, जिथे जमेल तिथे आणि जितके जमेल तितके समाजाला परत द्यायचे ठरले आहे आणि त्या दृष्टीने पाऊले उचलली गेलीही आहेत.

     आनंद व समाधान हेच आहे की हे सर्व होत असताना माझी सद्गुरू माऊली माझ्या पाठीशी समर्थपणे उभी आहे व तशी जाणीव ती मला सतत करून देते आहे. 


जीव जगला जगला, कशासाठी पोटासाठी,

चार दिवस तू जग, माणसाच्या हितासाठी. 

साऱ्या जगासी आधार, देणे जमणार नाही,

एका दोघांना जपणे, तुला अवघड नाही.

उपाशी ती पोरे बाळे, दोन घास त्यांना देई,

चार बुके शिकायला, सहायता तुझी होई.

समाजाने दिले तुला, अन्न, ज्ञान आणि धन,

जाणीवेत रहा याच्या, समाजाचे आहे ऋण.

देता होई देत जाई, तोचि धन्य या जीवनी,

ईश्वराची ही जाणीव, आहे पतीतपावनी.

                                                                सचिन

आळंदीचा माझा राजा

 आपेगांव स्तब्ध झाले, गहिवरले नेवासे ।

आळंदीचा माझा राजा, समाधी ही घेत असे ।।


दाटले हे नयनी पाणी, ज्ञानियासी सांगा कोणी ।

नका जाऊनि सोडूनि, इंद्रायणी विनवीतसे ।।


दिनवाणे झाले जन, निवेदिती कर जोडून ।

थांबवा तयालागुन, मुक्ताईशी सांगतसे ।।


सोपानाशी मुक्ताबाई, बोलीतसे ती लवलाही ।

निवृत्तीगुरुंच्या ठायी, करुणा ही भाकितसे ।।


नका जाऊ ज्ञानदेवा, तुम्हीच आम्हा विसावा ।

आर्त विनंती ही भावा, व्याकुळ ती झालीसे ।।


बोले ज्ञानियाचा राणा, ज्ञानेश्वरी मीच जाणा ।

अंतरंगी पाऊलखुणा, एकतत्व पूजितसे ।।


वदे ऐसे ज्ञानदेव, प्रार्थीतसे सकलही जीव ।

वंदितसे मनोभाव, निरोप तो घेत असे ।।


आली ती समाधी वेळा, होत असे हलकल्लोळा ।

ज्ञानियास बसवुनी स्थानी, गुरू शिळा लावितसे ।।


हाय हाय माझा ज्ञाना, पुन्हा नाही दिसणे नयना ।

अश्रूधार ती थांबेना, जीव त्यात अडकतसे ।।


ज्ञानियाची आत्मज्योति, सदा देतसे ही प्रचिती ।

मोक्ष मार्गिचा सांगाती, ज्ञानेश्वर होत असे ।।


अशी ज्ञानोबा माऊली, साऱ्या जगाची साऊली ।

आहे नित्य ती राऊळी, पांडुरंग रुक्मिणीच्या ।।


जावे शरण हो त्यासी, कर ठेवी जो कटीसी ।

उद्धरावे 'चरणरजा'शी, करुणा ही भाकितसे ।।


                                                               सचिन

चांगले कर्म श्रेष्ठ की नामस्मरण

 चांगले कर्म श्रेष्ठ की नामस्मरण ह्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर ....


आपण करतो ते कर्म चांगले की वाईट हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असते. 

उदा. आश्रयाला आलेल्या गायीला कसायापासून वाचवण्यासाठी तिला लपवून ठेवून, मी गाय पाहिलीच नाही असे खोटे बोलणे हे पाप की पुण्य?

म्हणून उत्तम कर्म कोणते हे ठरवण्यासाठी मनाला प्रश्न विचारावा. हे कर्म केल्याने माझ्या हृदयातील परमेश्वर आनंदी होईल का दुःखी?

जर उत्तर आनंदी असे आले तर ते कर्म उत्तम. अन्यथा कर्म टाळावे.

असे कर्म सत्कर्म होते आणि हेच कर्म हळूहळू निष्काम कर्माकडे नेते. उत्तम कर्म वर्तमान व भविष्य उत्तम होण्यास कारणीभूत ठरते.

नामस्मरण हे जन्म जन्मांतरीचे पापरुपी केलेले खड्डे बुजविण्यासाठी उपयुक्त ठरते. असे खड्डे कर्मात अडथळे आणू शकतात. नाम त्यांचा उपद्रव कमी करण्यास उपयुक्त होते. 

शिवाय मन एकाग्र होण्यास मदत होते. त्याने आपले कर्म उत्तम होते.

नाम शेवटी भौतिक लाभ तर देतेच पण भवसागरातून पार होण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणून ठामपणे आपली साथ देते.

म्हणूनच कर्म व नाम दोन्ही हवेच.

हमवापसआयेंगे

 #HumWapasAayenge

#हमवापसआयेंगे

30 साल पहले, आज ही के दिन कश्मीर से हजारो कश्मिरी पंडितोंको जबरन भगा दिया गया था. जमीन जायदाद तो छोड दिजीए, बहन बिवी माँ बेटी को भी नही बक्षा गया. मस्जिद से ऐलान होते थे- पंडितो तुम्हारे पास सिर्फ 3 विकल्प है. कश्मीर छोड के जाओ या मुस्लिम बन जाओ या फिर मरने को तय्यार हो जाओ. किसीभी सुरत मे अपनी घरकी औरत को यही छोड जाना पडेगा. निहत्ते पंडित कुछ कर नही पाये. जो नसीबवाला था वो परिवार के साथ भाग गया. सेकडो कमनसीब या तो मारे गये या जबरन मुस्लिम बना दिये गये. लेकीन औरतोंका क्या हुआ? 

.......सरेआम सामूहिक बलात्कार. औरत मरने तक उसका बलात्कार चलता रहता. और अगर वो न मरे तो उसे जिंदा ही जला दिया जाता या फिर उसके टुकडे टुकडे करके रास्ते पर फेंक दिये जाते. 

ये सब करने वाले कौन थे? इनके अपने ही मुस्लिम पडोसी और साथ मे पाकिस्तान मे प्रशिक्षित हुए दहशतगर्द मुस्लिम. क्या बिती होगी पंडितोंपर? क्या दर्द सहा होगा हमारे भाईयोने? घरकी बहू बेटीयोंकी इज्जत लुटी जाना, फिर अपनेही घर से बेघर कर दिया जाना और 30 साल उससे दूर रहना ये दुख क्या होता है सिर्फ कश्मिरी पंडित ही जाने! 


.................. 30 साल....................


आज 30 साल बाद मोदी शाह के रूप मे पंडितोंको आशा की एक किरण नजर आ रही है. जो गया वो तो वापस नही आयेगा लेकीन कमसेकम अपने घर मे वो फिरसे बस सकते है ये आशा आज इनकी आँखोमे है. 

'हम वापस आयेंगे' ये नारा उन्होने लगाया है. आओ इस नारे को बुलंद करे.

चांगली कर्मे करून सुद्धा आमचे भोग सरत नाहीत

 आम्ही चांगली कर्मे करून सुद्धा आमचे भोग सरत नाहीत आणि उघड पापे करून सुद्धा काही माणसे निवांत जगतात असे का, ह्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर ...


हे गणित इतकं सोपं नाहीये. 

श्रीमद्भगवदगीता ह्याचे सविस्तर उत्तर देते.

अश्या वेळी आधीची पुण्याई खर्च होत असते. आणि वर भर पडते ती पाप कर्मांची. 

ज्या क्षणी आधीची पुण्याई संपेल त्या क्षणी भोग सुरू होतात. मग भले ते ह्या जन्मी असो अथवा पुढील जन्मी. 

आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा परिपाक म्हणून उत्तम अथवा अधम भोग भोगावेच लागतात.

एक उदाहरण देतो.

समजा तुमच्याकडे एक मोठी कणगी अथवा बळद (धान्य साठवायचे खूप मोठे भांडे) आहे. त्यात वरून धान्य ओततात आणि खालून धान्य काढतात. 

तुम्ही त्यात पूर्ण भरेल एवढी ज्वारी वरून ओतली. आणि खालून त्यातली रोज थोडी थोडी काढू लागलात. 

थोड्या दिवसाने भांडं अर्ध संपलं. खालून ज्वारी काढणं सुरूच राहिलं. पण आता तुम्ही वरून त्यात ज्वारी ऐवजी बाजरी ओतलीत. 

तर काय होईल?

खालच्या बाजूने लगेच तुम्हाला बाजरी काढता येईल का? नाही.

बाजरी बाहेर यायच्या आधी, तुम्ही आधीच ओतलेली ज्वारी संपावी लागते. ती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुमच्या मनात नसले तरी बाजरीच बाहेर पडेल.

तसेच कर्माचे असते. आधी उत्तम कर्म केले म्हणून चांगले भोग आले आहेत पण त्यात भर घालण्याऐवजी त्यांनी वाईट कर्म केले. आता ते ही भोगावेच लागेल.

गांधीवध आणि आमचा जाळलेला वाडा

 ***गांधीवध आणि आमचा जाळलेला वाडा***


इचलकरंजी ला माझे पणजोबा खूप मोठे सराफ व सावकार होते. गुजरी पेठेजवळ महादेव मंदीराशेजारी खूप मोठा चौसोपी असा 3 मजली भिडे वाडा होता. इचलकरंजीचे राजे घोरपडे यांच्याशी असलेले पारिवारिक संबंध, घरची प्रचंड श्रीमंती, लोकांची रेलचेल, 8 अवाढव्य मोठ्या तिजो-या, 40 50 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक करता येण्याजोगी मोठाली भांडी, हंडे, 25 30 दुभत्या गायी म्हशी व एक अरबी घोडा. सर्वत्र सुबत्ता. पण या सर्वाला नजर लागली ती गांधीवधानंतर. 

मराठाबहुल वस्तीत भिडे हे पहिले कोकणस्थाचे घर होते जे अनेकांच्या डोळ्यात पहिल्यापासून सलत होते. एक तर घरची श्रीमंती आणि ती ही प्रामाणिकपणाने कमावलेली. व दुसरे म्हणजे आमचे तिथल्या राज परिवाराशी असणारे नाते संबंध. गांधीवधाने आयती संधीच जणू मिळाली होती काही लोकांना त्यांचा पोटशूळ शांत करायची.

1948 ला एका दुर्दैवी सकाळी हल्लेखोरांचा जमाव अचानक वाड्यासमोर जमा झाला व जोरजोरात ओरडून सर्वांना धमकावू लागला की जसे असाल तसे बाहेर निघा. हा वाडा आम्ही जाळून टाकणार आहोत. 

परिस्थिती भयानक झाली होती. माझे पणजोबा, पणजी, खापरपणजी व घरातील इतर सर्व लोक नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर पडले. नव्हे तर त्यांना ओढूनच बाहेर काढण्यात आले. त्यातच लोकांनी घर लुटण्याचा नीचपणा केला. 8 तिजो-या पहारीचे, कुदळीचे घाव घालून फोडण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यांना ते जमले नाही. मग काय, जे हाताला येईल ते लुटले गेले. गायी म्हशी गोठ्यातून पळवल्या गेल्या. जे लुटायला जमले नाही ते सरळ सरळ वाड्यातील मोठ्या विहिरीत फेकून दिले गेले आणि वाड्याला आग लावण्यात आली.  

प्रचंड दहशत माजवली होती जमावाने त्या वेळी. 

भिडे परिवार कसाबसा जवळच्या एका नातेवाइकांच्या घरी पोचला तर जमाव तिथेही हजर. शेवटी लपत छपत हातकणंगलेच्या शेतात जाऊन उसाच्या फडात लपून आपला जीव वाचवावा लागला सर्वांना.

माझे आजोबा त्या वेळी सोलापूर ला होते. त्यांना ही बातमी समजली व ते तडक इचलकरंजीला रवाना झाले. त्या वेळी त्यांना एका ब्रिटिश अधिका-याने खूप मदत केली. त्याच्या अधिकारात त्याने वाड्यातील सामान हलवायला 3 4 ट्रक, काही माणसे व गरजेची हत्यारे दिली. गाड्या घेऊन आजोबा सुसाट वेगाने इचलकरंजीला पोचले. वाटेत जमाव आडवा आलाच. ट्रक पेटवून देणेच बाकी होते, पण आजोबांनी आणि त्यांच्या साथीदारांनी दाखविलेल्या प्रचंड साहसाने आडव्या आलेल्या जमावाला आडवे पाडून गाड्या वाड्यापर्यंत पोचल्या. पण जे दृश्य दिसले त्याने पायाखालची जमीनच सरकली. स्वकष्टाने उभा केलेला आपला राजमहाल आगीत जळून खाक झाला होता. सर्व काही भस्मसात झाले होते. पुरता संसार उध्वस्त झाला होता. 

सराफी सावकारी निष्ठेने करुनही हाती राहिले होते ते जाळलेल्या तिजो-यांचे अवशेष. 8 पैकी 6 तिजो-या जळून भस्म झाल्या आणि त्या बरोबर जाळली गेली होती ती जमिनीची कागदपत्रे, गहाण खते आणि सोने, चांदी, हिरे, मोती यांचा खजिना. करोडो रुपयांचे आणि कष्टाचे भस्म झाले होते. अगदी, आवडता अरबी घोडा सुद्धा जाळून मारला गेला होता.

महाभयंकर असा हा संहार होता ज्याची आजवर कोणीही कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाहीये.

सचिन भिडे पुणे

हिंदुत्व म्हणजे काय?

 एकाचा प्रश्न .... 


*हिंदुत्व म्हणजे काय? विज्ञान युगात याचा काय उपयोग?*


माझे उत्तर .... 


हिंदुत्व ही उच्चमुल्याधिष्ठीत जीवन प्रणाली आहे. ह्यात उत्तम कर्म, ध्येय निष्ठा, निसर्गानुसंधान साधून प्रगती, विचार व नीतिमुल्य, सात्विकता, अदांभिकपणा, सदाचार ह्या व अश्या अनेक तत्वांचा समावेश होतो.

विज्ञानयुगात तर ह्या सर्व तत्वांची सर्वात जास्त निकड आहे. 

विज्ञानातून प्रगती साधत असताना निसर्गाचा समतोल ढासळू न देणं, निसर्गाचे केवळ दोहन करणं आणि शोषण न करणं हे केवळ ह्या नीति मुल्यांमुळेच शक्य आहे. 

विज्ञानाचा वापर करुन विनाशाकडे न जाता मानव उद्धाराकडे जावा असे वाटत असेल तर ही नीति मुल्येच कामाला येतील.

मरण्याचा उत्सव व्हावा

 मरण्याचा उत्सव व्हावा, इतुके निर्भीड करावे,

जगण्याचे सोने व्हावे, हे दान तू मजला द्यावे.

ही काया जाई झिजोनि, अग्नीत ती जाय जळोनि,
राखेचे भस्म बनावे, मरण हे सार्थक व्हावे.

मृत्यू म्हणजे शरीरांतर, जीर्ण त्यजुनी नूतन वावर,
हे नित्यचक्र बिघडावे, मज मोक्षाशी तू न्यावे.

येणे जाणे हे जीवन, करितो तव चरणी अर्पण
श्वासाचे नामचि व्हावे, भवसागर तारून न्यावे

ते सुंदर नाजूक डोळे

 ते सुंदर नाजूक डोळे

शब्दाविण बोलती सगळे
ते लाल गुलाबी ओठ
काळजास भिडती थेट
ते नितांत मोहक हास्य
भावनाभरीत ते लास्य
त्याहूनही प्रेमळ ते मन
सर्वश्रेष्ठ आहे हे धन
त्यागाचे अन नीतीचे
नाते जुळले प्रीतीचे
प्रेमाचे मूर्त स्वरूप
आहे ते तुझेच रूप
भाग्यवान मी ज्या मजला
सहवास तुझा जो घडला
सहजीवन फुलून आले
मन तृप्त तृप्त ते झाले
साता जन्माच्या या गाठी
सांभाळीन तुझ्याचसाठी
सचिन

ठेविले अनंते तैसेचि रहावे

 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या संतोक्तीचा नवविधा भक्तीद्वारे पाहिलेला खरा अर्थ...


श्रवण/मनन, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या आहेत नवविधा भक्ती सोपान. थोडक्यात भक्तीच्या पायऱ्या. 

त्या अनंताच्या, सगुण साकाराच्या म्हणा अथवा निर्गुण निराकाराच्या म्हणा, सानिध्यात कायमचे नत होण्यासाठी त्याला जाणून घेणे व त्यासाठी त्याची भक्ती करणे आवश्यक आहे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम या संत उक्ती प्रमाणे अखंड त्याचे नाम मुखातून निघावे आणि सतत त्याचे रूप या डोळ्यांना दिसावे हेच संतांचे मागणे असते. 


अशा नवविधा भक्ती थोडक्यात बघू.


1. श्रवण(मनन)भक्ती (आदर्श - राजा परीक्षित)

जे ऐकावे ते त्याचेच गुणगान असावे. कानावर पडावे ते त्याचेच नाव, त्याचेच गुणवर्णन. कान असावेत ते त्याचेच ऐकण्यासाठी. 

ऐकावे त्याचे नाव, मनी असावा त्याचाच भाव. मनात विचार येईल तो त्याचाच. केवळ सत्कर्म सद्विचार याचाच विचार. केवळ साराचेच मनन. असाराचा त्याग. 


2. कीर्तनभक्ती (आदर्श - श्री शुकदेव)

त्याचेच गुणगान करावे, ऐकावे व ऐकवावे ते त्याचेच नाम, त्याचेच लीलावर्णन. मुखातून बाहेर आलेला आवाज नामाचा व गुणवर्णनाचाच असावा हा ध्यास.


3. स्मरण/विष्णुस्मरण (आदर्श - बाळ प्रल्हाद, श्री नारद मुनी)

मुखी यावे त्याचेच नाव. सतत त्याचेच स्मरण असावे. वाईट काहीच स्मरू नये. वैखरीवाटे अखंड नामस्मरण सुरू असावे व ते हळूहळू मध्यमेतून पश्चन्ति व तिथून परेत उतरावे हा ध्यास. 


4. पादसेवनभक्ती (आदर्श - माता लक्ष्मी)

अखंड त्याच्याच सेवेत राहावे. उत्तमाची सेवा करावी. मानसपूजा करावी. पायधूळ माथी लावावी. माझा भाव तुझे चरणी ही अवस्था व्हावी ती या भक्तीत. जशी माता लक्ष्मी नेहमी त्या अनंताच्या चरणाशी असते तसे मला तुझ्या चरणाशी ठेव हेच मागणे. 


5. अर्चनभक्ती ( आदर्श - पृथुराजा)

ध्यान करावे ते त्याचेच. पूजा करावी ती त्याचीच. अर्चना करावी ती त्याचीच. सर्व काही तोच आहे मी कोणी नाही हा भाव यायला सुरुवात व्हावी ती या अर्चन भक्तीत.


6. वंदनभक्ती ( आदर्श - अक्रूर)

उत्तमाची ओढ निर्माण झाली की चरणवंदना होते ती उत्तमाचीच. त्याच्या चरणी नतमस्तक व्हावे, चरणी माथा ठेवून वंदन करून शरण जावे ते त्यालाच.


7. दास्यभक्ती ( आदर्श - श्री हनुमान)

आता उरतो तो फक्त देवाचा दास. मी कोण, तर तुझ्या महालाचा महार. जोहार मायबाप जोहार. हा जोहार वहावा त्याला. त्याची चरणधुळ व्हावे व त्या सर्वोत्तमाचे दास्यत्व पत्करावे ते या दास्यभक्तीत. इथे अभिमान,अहंकारासहित सर्व विकार ताब्यात येतात.


8. सख्यभक्ती ( आदर्श - अर्जुन)

खऱ्या दासाचा देव सुद्धा सखा होतो. सख्याच्या प्रेमात आकंठ बुडून सुद्धा भक्तीत रमणे, त्याच्या सानिध्यात असणे व तो म्हणेल तेच व तसेच करण्याची विनम्रता येणे ती सख्य भक्ती. 


9. आत्मनिवेदनभक्ती ( आदर्श - बलीराजा)

शेवटी तो काय आणि मी काय. दोघात काहीच फरक नाही रहात. सर्वस्व त्यास अर्पून उरतो तो फक्त श्वास. तो श्वास पण त्याचाच. देह त्याचा, जीव त्याचा, जीवन त्याचे, मरणही त्याचेच. माझे असे काहीच उरत नाही. साखर पाण्यात विरघळून जाते. साखरेचे अस्तित्व दिसत नाही. गोडी मात्र जाणवते. सोहम (तोच मी आहे) आणि हंस: (मीच तो आहे) अशी सोहम-हंस भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. 


ही पायरी ज्या वेळी येते त्या वेळी कर्ता एक रघुनंदन होतो. मी पणा पूर्ण लोप पावतो. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले अशी अवस्था होते. 


त्या वेळी जे होते ती त्याचीच मर्जी असते. आपण फक्त माध्यम असतो त्या अनंताच्या हातातील. त्याला जे हवे जसे हवे ते तो आपल्याकडून करवून घेतो. 

तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम ही अवस्था येते. 

ज्यावेळी माझे असे काहीच उरत नाही, आपण त्याला संपूर्ण शरण गेलेलो असतो त्यावेळी अगदी त्याच क्षणापासून आपला योगक्षेम तो वाहायला घेतो. 

शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता

जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करुनि


अशा उच्च अवस्थेत तो जे करेल तेच माझ्यासाठी उत्तम आहे हीच भूमिका असते. आपण जरी शरीराने कर्म करत असलो तरी ते कर्म केवळ त्याच्या आज्ञेप्रमाणेच होते. म्हणजेच आपण तो जसे ठेवेल तसे राहायला लागतो. सुख दुःख गरिबी श्रीमंती मान अपमान या लौकिक गोष्टींचा आपल्यावर काहीच फरक पडत नाही व आपली अवस्था अवघा रंग एक झाला अशी होते. 

अशी अवस्था प्राप्त केलेले संत म्हणतात की ह्या ज्या अवस्थेत अनंता तू मला ठेवले आहेस ते तसेच असूदे, कारण याचसाठी केला होता अट्टाहास.

याला म्हणतात ठेविले अनंते तैसेचि राहावे. 


Sachin Bhide

तो आलाच नाही

 रात्र झाली अंगणी या

चांदणी खेळे नभी

धुंद वारे मंद तारे

वाट पाहत मी उभी


प्रियकराची आस लागे

पावलांचा ध्यास लागे

रातराणीच्या फुलांचा

ओंजळीला वास लागे


अजून तो आलाच नाही

तारका निद्रिस्त झाल्या

थकून गेली लोचने अन

पायवाटा शांत झाल्या

गीताश्लोकाचा अर्थ

 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ (2.47)


हा श्रीमद्भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील (सांख्ययोग) 47 वा श्लोक. अतिशय प्रसिद्ध असा हा श्लोक आपल्याला कर्ममार्गाद्वारे मोक्षमार्गाकडे कसे सरकत जावे व त्यासाठी काय करावे, काय करू नये, काय त्यजावे आणि काय अंगिकारावे हे व असे विचार करण्यास उद्युक्त करतो. 


ह्या श्लोकाचा बऱ्याचवेळा ढोबळ मानाने अर्थ काढला जातो व त्यानुसारच आपण सर्वसामान्य लोक नेहमी बोलताना बोलतो की नुसती कर्मे करणे हेच माझ्या नशिबी आहे. कशाकडून काही फळ मिळेल ही अपेक्षा मात्र मी ठेवायची नाही. नुसते काम करा आणि सोडून द्या. आम्ही कामे मात्र करायची, पण त्याबदली आम्हाला काही मिळेल ही साधी अपेक्षा सुद्धा ठेवू नये का? बरोबर ना. थोड्याफार फरकाने असेच विचार येतात ना आपल्या मनात? 


पण हे असे मुळीच नाहीये. 


असे जर असेल तर मग नक्की अर्थ काय याचा? 

भगवान श्रीकृष्णांना नक्की काय सांगायचे असेल इथे? तो अभिप्रेत अर्थ आपण आता बघू. पण या आधी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी व ती ही की श्रीकृष्णाने आपल्याला प्रत्येक वेळी कर्माचे महत्व सांगितले आहे. आपण सदा सर्वकाळ कर्मरत असावे हेच त्यांचे म्हणणे आहे. अकर्मी बनू नकोस (कर्म न करता उदासीन बसून राहू नकोस), नपुंसक (क्लैब्य) बनून राहू नकोस हे श्रीकृष्ण वारंवार सांगतात. 

याचाच अर्थ कर्म करणे हे अटळ आहे, क्रमप्राप्त आहे.


या श्लोकाप्रमाणे, कर्म करणे अथवा न करणे, केले तर नक्की काय, कसे आणि कधी करायचे हे सर्व आपल्या हातात आहे. इथे श्लोकातील 'अधिकार' या शब्दाचा अर्थ हक्क अथवा 'जन्मसिद्ध अधिकार', total authority या सारखा होत नाही. तर आपल्या क्षमतेला, भगवंताने, कर्म करणे इतपतच मर्यादित ठेवले आहे, फक्त कर्म करणे या हद्दीपर्यंतच आपण जाऊ शकतो, तिथेच आपली हद्दक्षमता संपते अश्या अर्थाने घ्यायचा आहे. थोडक्यात काय तर आपण स्वतःच्या ताकतीला, क्षमतेला अमर्याद समजू नये. कर्म करणे इतपतच आपली जी सीमा आहे तिचे रक्षण करणे अर्थात योग्य कर्म करणे हेच आपल्या कक्षेत आहे.


मग असे जर असेल तर पुढे काय? मी कर्म केले तर मी माझ्याच लावलेल्या झाडाचे फळ मिळावे ही अपेक्षाच करायची नाही का? तर ते असे नाहीये.


श्रीकृष्ण म्हणतात, की एकदा तू कर्म केलेस (तुला कर्म निवडण्याची संधी दिली होती) की मग मात्र तुला त्याचे फळ निवडण्याची संधी मिळणार नाही. म्हणजे, केलेल्या कर्माचे हे असेच फळ मिळाले पाहिजे, आत्ताच मिळाले पाहिजे, अथवा फळच मिळू नये(वाईट काही केले असेल तर) असे निवडण्याची आपल्याला सोय व संधी नाही. कारण ज्या वेळी तू कोणते कर्म करायचे हे निवडतोस व त्याप्रमाणे वागतोस त्याच वेळी त्याचे फळ तू न निवडताच तुझ्या पदरात पडलेले असते. कारण कोणत्या परिस्थितीत कोणते कर्म कसे केले गेले व त्या प्रमाणे त्याचे फळ काय असेल, कोणत्या स्वरूपात असेल, ते कधी मिळेल, कसे मिळेल हे नियम आधीच तयार झाले आहेत व ते नियम पूर्णपणे त्या अंतरात्म्याच्या आधीन आहेत. म्हणून फळ हे त्याच नियमानुसार मिळेल. आपल्या इच्छेप्रमाणे नाही. ते फळ आपल्याला कधीनाकधी मिळणारच आहे. आपली त्यावेळी फळ भोगायची इच्छा, अपेक्षा आणि शक्ती असो वा नसो.

काही फळे लगेच मिळतात तर काही उशिरा तर काही अनेक जन्मानंतर. पण कर्म केले की फळ मिळाल्याशिवाय रहात नाही.


आपण केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ जमा होत असते त्याला संचित (साठलेले, जमा झालेले) म्हणतात. भगवद्नियमाप्रमाणे, फळ परिपक्व झाले की आपल्याला मिळते. ते केलेल्या कर्माचे मिळालेले फळ (जे कोणत्याही जन्मातील असू शकते) आपण वर्तमानात भोगत असतो त्याला प्रारब्ध (नशीब) म्हणतात. ते फळ भोगण्याबरोबरच आपण नवीन कर्मे करत असतो ज्याला क्रियमाण कर्म (वर्तमानात केलेली कर्म) म्हणतात. तर अश्या क्रियमाण व संचितातून आपण आपल्याकडे येणारी प्रारब्ध फळे भोगत असतो ज्याच्यावर आपला काहीही ताबा नसतो. व म्हणूनच कर्मफळावर तुझा अधिकार/ताबा नाही असे म्हणले आहे. 


आपण केलेली प्रत्येक कर्मे आपल्याला योग्य बरोबर आणि चांगलीच वाटतात. पण भगवद्नियमाप्रमाणे ती योग्य आहेत का नाहीत हे आपल्या लक्षात येत नाही आणि शेवटी आपण कर्म व त्याचे फळ यात अडकून बसतो. एकदा या चक्रात अडकलो की मग अशी साठलेली फळे भोगायला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकावेच लागते. इथे आपल्याला कोणत्याही योनीतील जन्माच्या निवडीचा अधिकार नसतो.


मग यातून सुटावे कसे? तर यावर भगवान साधा सोपा मार्ग सांगतात. ते म्हणतात की अखंड माझ्या नामस्मरणात रहा. कर्म करणे सुरू ठेव आणि जे काही करशील ते त्याच्या फलापेक्षेसहित माझ्या चरणी अर्पण कर. हळूहळू तुझी मी केले मी केले ही भावना लयाला जाईल. अश्या अवस्थेत हातून फक्त उत्तमच कर्मे घडतील आणि कर्म व कर्मफळ माझ्या चरणी अर्पण केले असल्याने तू या फेऱ्यातून हळूहळू बाहेर पडशील. मुक्त होशील. अर्थात हे कष्टसाध्य आहे व साधना, नामधारणा केल्याने हे नक्कीच साध्य होऊ शकते.


Sachin Bhide

माय माऊली ती, का गे रागावली

 माय माऊली ती, का गे रागावली

नऊ मास झाले, एकांती बैसली |

चुकले गे माये, काय ते सांगावे

लेकुरासी घ्यावे, कुशीमध्ये ||



पापाचे संचिते देहासी दंडणा! 

तुज नारायणा, बोल नाही!!



सुखाच्या क्षणात,

व्यथांच्या घणात,

उभा पाठीशी,

एक अदृश्य हात.



नयनी या तव रूप दिसावे,       

ओठी ते तव नाम वसावे,

कायेतूनी सत्कर्म घडावे,          

इतके दान प्रभू मज द्यावे.


भाववेडा माझा देव, वैकुंठीचा राणा,

शरण जावे त्यासी तोचि उद्धरितो जाणा


तू शांत तेवता तारा
मी धगधगित लाल निखारा
तू प्रशांत आणि व्याप्त
मी मात्र चौकटीतच लिप्त

भास तोचि, ध्यास तोचि

 भास तोचि, ध्यास तोचि, आस तोचि, श्वास तोचि,

ज्ञान तोचि, दान तोचि, प्राण तो, विज्ञान तोचि ||


अंतरी बाहेर ही तो, चालवितो सर्व तोचि,

व्याप्त सारे विश्व करुनि, पूर्ण उरतो एक तोचि ||


शोधिता गवसे कुठे तो, माऊलीचे नेत्र तोचि,

गाय दे जे दूध तोचि, शाक पाक नि अन्न तोचि ||


तृप्ती तोचि, शांती तोचि, भाव आणिक भक्ती तोचि,

शब्द तोचि, मौन तोचि, मृत्यू आणिक जन्म तोचि ||


दृश्य तोचि, दृष्टी तोचि, मानसीचे तर्क तोचि,

धर्म तो, अध्यात्म तोचि, ओवी आणिक ग्रंथ तोचि ||


सर्वत्र तो व्यापून राहे, आर्त हाके प्रकट होये,

ज्योत ती सात्विक होता, महाज्योतित लीन होये ||


श्रीदत्तचरणरज

माझा दत्तराया, प्राणसखा माझा

 माझा दत्तराया, प्राणसखा माझा ।

श्वासोच्छ्वास तोचि, मुक्तीदाता माझा ।।


माझिये अंतरी, वसो ध्यान नित्य ।

ओठात ते राहो, त्याचे नाम सत्य ।।


देह पडो कामी, त्याच्याच सदैव ।

राहो भक्ती भाव, श्रीहरीचरणी ।।


दत्ता दान द्यावे, आपुले म्हणावे ।

पामरा उद्धरावे, भवसागरातुनी ।।


श्रीदत्तचरणरज

श्रीदत्तजयंतीची सेवा

 श्रीदत्तजयंतीची सेवा ...


सदा चित्त राहो श्रीचरणाचपाशी

सदा ध्यान राहो श्रीनारायणाशी

सदा नाम राहो मुखी श्रीपदाचे

सदा कामकाजी वदा नाम वाचे


समर्था तुझ्यासाठी हा देह सांडो

तुझ्या रूप नामातही गोडी वाढो

पदांचे तुझ्या ध्यान लाहो सदैव

मनी अंतरी श्रीगुरु हाची भाव


पदी लागता उद्धरी तू जनासी

असे मूढ हा फक्त अज्ञानराशी

कृपासागरा हात हाती धरावा

बुडे अर्णवी देह हा सावरावा


मनी काय आहे तुला सर्व ठावे

मुखी मानसी नाम तुझेची द्यावे

करी वासना कामना मोह नष्ट

नामी तुझ्या होई असंग भ्रष्ट


अनादि अनंतास ध्यानी धरावे

प्रभू कारणे शब्द वेचित जावे

सदा वैखरी नामरंगी बुडावी

तनु साजिरी ईशपायी झिजावी


                               श्रीदत्तचरणरज

उपवास म्हणजे काय

 उपवास म्हणजे काय? ह्या प्रश्नावर सुचलेल्या काही ओळी ...


त्याचेच चिंतन, त्याचेच भजन, 

त्याचेच स्मरण,नित्य व्हावे


देह करी काम, मन गाई राम, 

जिव्हेसी विराम, देऊ नये


नामात गुंतला, तोच थोर झाला, 

उपवास घडला, जन्मोजन्मी

हिंदू शब्द का इतिहास

 हिंदू शब्द का इतिहास .... 


शब्द कल्पद्रुम(दूसरी शताब्दी) में कहा है,

“हीनं दुष्यति इति हिन्दू जाति विशेष:”।

हीन कर्म का त्याग करने वाले को हिन्दू कहते हैं।


अद्भुत कोष में कहा है,

“हिन्दू हिंदुश्च प्रसिद्धौ दुष्टानां च विघर्षने।”

हिन्दू और हिंदु दोनों शब्द दोनों शब्द दुष्टोम को नष्ट करने वाले अर्थ में प्रसिद्ध है।


बृहद स्मृति(छठीं शताब्दी);

“हिंसया दुयते यश्च सदाचरण तत्पर: वेद ..हिंदु मुख शब्द

भाक्।”

जो सदाचारी वैदिक मार्ग पर चलने वाला,हिंसा से दुःख

मानने वाला है,वह हिन्दू है।


बृहस्पति आगम : विशालाक्ष शिव द्वारा रचित राजनीति के महान शास्त्र का संक्षित महर्षि बृहस्पतिजी ने बार्हस्पत्य शात्र नाम से किया। फिर वराहमिहिर ने एक शास्त्र लिखा जिसका नाम बृहत्संहिता है। इसके बाद बृहस्पति-आगम की रचना हुई। 'बृहस्पति आगम' सहित अन्य आगम ईरानी या अरबी सभ्यताओं से बहुत प्राचीनकाल में लिखा जा चुके थे। अतः उसमें 'हिन्दुस्थान' का उल्लेख होने से स्पष्ट है कि हिन्दू (या हिन्दुस्थान) नाम प्राचीन ऋषियों द्वारा दिया गया था न कि अरबों/ईरानियों द्वारा। यह नाम बाद में अरबों/ईरानियों द्वारा प्रयुक्त होने लगा।  हालांकि इस आगम को आधुनिक काल में लिखा गया माना जाता है।


इसके एक श्लोक में कहा गया है:-

ॐकार मूलमंत्राढ्य: पुनर्जन्म दृढ़ाशय:

गोभक्तो भारतगुरु: हिन्दुर्हिंसनदूषक:।

हिंसया दूयते चित्तं तेन हिन्दुरितीरित:।


'ॐकार' जिसका मूल मंत्र है, पुनर्जन्म में जिसकी दृढ़ आस्था है, भारत ने जिसका प्रवर्तन किया है तथा हिंसा की जो निंदा करता है, वह हिन्दू है।


श्लोक : 'हिमालयात् समारभ्य यावत् इन्दु सरोवरम्। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते॥'- (बृहस्पति आगम)


अर्थात : हिमालय से प्रारंभ होकर इन्दु सरोवर (हिन्द महासागर) तक यह देव निर्मित देश हिन्दुस्थान कहलाता है।

हे गुरुराया

 हे गुरुराया त्रिमूर्ती रुपा, देहातीत हे आत्मस्वरूपा

विघ्ननाशना मंगलरुपा, कृपादृष्टी देइजे ||


नामे तुझिया लागो गोडी, सत्संगाची देई आवडी,

रूप तुझे नेत्र कवाडी, अखंड असावे गुरुराया ||


हात धरुनी चालवावे, तुझेच बोल बोलवावे,

मन मंदिरी व्याप्त राहावे, तुचि अखंड स्वामिया ||


श्रीदत्तचरणरज

विघ्नविनाशक मंगलकारक

 विघ्नविनाशक मंगलकारक, एकदंत तू सिद्धिविनायक।।


दुर्वांकुरप्रिय धुम्रवर्ण तू, गिरीजात्मज तू भालचंद्र तू ।।


रक्तकुसुमप्रिय शंकरप्रिय तू, गणनायक तू मयुरेश्वर तू ।।


मूषकवाहन मोदकभक्षण, अखंड करीतो आमुचे रक्षण।।


गणेशराया गौरीतनया, शिवात्मरुपा हे करूणालया ।।


रूप लोचनी मुखी नाम ते, अखंड नत व्हावे चरणाते ।।


भवपाशनाश करीसी तू माझा,उद्घरीसी श्रीदत्तचरणरजा।

देव कुठे काय करतो

 भगवंत आपल्या भक्तासाठी वाट्टेल ते करतो. कारण भक्ताचीसुद्धा भगवंतप्रति तेवढी दृढ भक्ती असते. त्याच्या प्रेमाखातर तो कधी त्याचा सेवक होतो, तर कधी मार्गदर्शक. मग तो आपल्या मदतीला कधीच का येत नाही, असा आपल्याला प्रश्न पडतो. त्याचे कारण म्हणजे आपण तितक्या आर्ततेने त्याला हाक मारतच नाही. तरीसुद्धा तो न बोलवता आपल्याला मदत पुरवत असतो. आपल्याला ती कधी ओळखता येते, तर कधी येत नाही. कधी कधी आपल्या अडचणीच्या वेळी अनपेक्षित पणे येऊन कोणी आपली मदत करून जातो, तेव्हा आपल्या तोंडून सहज निघून जाते, 'देवासारखा धावून आलास बघ!' देवाच्या ठायी आपली श्रद्धा दृढ असेल, तर देवाच्या मदतीची प्रचिती आपल्याला वारंवार येत राहील.

आजकाल तो माझ्याशी बोलतच नाही

 आजकाल तो माझ्याशी बोलतच नाही

माहीत नाही काय झालंय 

नक्की त्याचं काय बिनसलंय 

आणि माझं काय चुकलंय

मलातर काहीच कळत नाही 

कारण हल्ली तो माझ्याशी बोलतच नाही 


एरवी तो रोज बोलायचा

24 तास सोबत असायचा

प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यायचा

हल्ली मात्र मौनच असते

तो असूनही नसल्यासारखेच भासते

त्याचा आवाजच ऐकू येत नाही 

कारण हल्ली तो माझ्याशी बोलतच नाही 


तो बोलता असायचा तेंव्हा

इतर काहीच ऐकू येत नसे

केवळ त्याचेच शब्द कानी 

अन त्याचेच रूप ध्यानी असे

हल्ली त्याच्या मौनामुळे 

जगाचा गोंगाट मात्र कानावर येतोय 

हा भयानक आवाज ऐकून

मन बुद्धी व देहही चक्रावून जातोय

हा माझा त्रास त्याला का कळत नाही? 

माहीतच नाही का पण हल्ली तो माझ्याशी बोलत नाही. 


त्याच्या आवाजात असणारे माझे विश्व

त्याच्याच शांततेनं भंगून जातंय

बोलण्याविना त्याच्या माझं 

भावविश्वच कोलमडून पडतंय

का रे असा मौनात गेलास

गुन्हा माझा का सांगत नाहीस

कुणीतरी सांगा हो तो माझ्याशी का बोलत नाही? 


तुझ्या आवाजातील ते माधुर्य

मला पुन्हा अनुभवायचं आहे

तुझ्या प्रेमळ शब्दस्वरात

मला चिंब भिजायचं आहे

तुझ्या वाणीच्या रसास्वादात

मला पुलकित व्हायचं आहे

तू मला मारलेल्या हाकेने

मला मंत्रमुग्ध व्हायचं आहे 

ऐकशील का रे माझं एकदा

देशील का रे प्रतिसाद पुन्हा

आधी बोल मग दे तू शिक्षा

जो काही असेल तो माझा गुन्हा

मौनाची ही कठोर शिक्षा 

मला आता झेपवत नाही

थोडं तरी बोल रे माझ्याशी

तू काहीच का बोलत नाही? 


माहीत आहे मला की 

मी किती अतिसामान्य आहे

पण तुझा आवाज सर्वदूर जातो

ही गोष्ट सुद्धा सर्वमान्य आहे

असे असताना त्या गूढ मौनाचा

अर्थच मला उमगत नाही

समजत नाही रे आता मला

तू माझ्याशी का बोलत नाही?


जीव गुंतवून मग हे मौन बरे नव्हे

मुक्याने जगलेले जीवन हे काही खरे नव्हे

एक हाक ऐकू दे रे तुझी

कानात प्राण आणून 

वाट बघतो आहे

तुझ्या मौनाचा गूढार्थ तूच बोलून सांगशील

या एका आशेवर जगतो आहे

आतापर्यंत जो ऐकला आवाज 

तो पुन्हा ऐकू येणार की नाही? 

तोड ते मौन आणि काहीतरी बोल रे

तू काहीच का बोलत नाहीस? 


नको रे असा दूर सारुस

एकटा पडलोय या आभासी जगात

बोलायचेच नव्हते माझ्याशी तर

का जन्मास घातले या युगात

थकलो आता तुझे नाव घेऊन घेऊन

तू मात्र कधीच मला तुझे करत नाहीस

जीव जातोय आता बोल रे

काहीच का बोलत नाहीस?


जगावर रुसलो की तुझ्याकडे यावे

आणि तू तुझ्या बोलण्याने मला समजून घ्यावे

रमलो होतो मी त्या मोहक आवाजात

हा सहवास म्हणजे सुखाची बरसात

नजरच लागली असेल त्याला 

माझ्याच एखाद्या वाकड्या पावलाची

नाहीतर तू का शांत होशील 

आणि वाट धरशील मौनाची?

मी मंदमती मला कळत नाही

कधी कुठे अन कसे पाऊल चुकले

लक्ष्य समोर असताना सुद्धा

लक्ष लक्ष्यापासून कसे हुकले

हे स्वैरत्व नकोच मला

जिथे तुझे अस्तित्वच नाही

तुझ्याच अधिपत्याखाली बरा आहे मी

जिथे तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही 


कर आता मोठे मन आणि पसर दोन्ही हात

धावत येतोय मिठीत घे अन न सोडी आता साथ

मौनाला मात्र दूर लोट कायम दूर ठेव चार हात

ध्वनी प्रतिध्वनी अवघा एकच होईल

अशीच मारावी आता खूणगाठ


***श्रीदत्तचरणरज***

दत्तांची सत्ता

 हे कृष्णावासी दत्ता, तिन्ही लोकी तुझीच सत्ता

हे चिन्मय सद्गुरु रुपा, हे आत्मतत्त्व स्वरूपा

हे अत्री अनसूया सुता, हे दंड कमंडल हस्ता

हे माला कौपिन धारी, हे शरणागत उद्धारी

हे आत्मनिवेदन तत्वा, हे सगुण शुद्ध सत्वा

हे चिद्घन चिद्रुप मूर्ती, हे नवनाथांची स्फूर्ती

हे पतीतपावन दत्ता, भूमंडळी तुझीच सत्ता


श्रीदत्तचरणरज

रूप गणेशाचे

 मळातून जन्मुनी, असे जो निर्मळ

रूप जे तेजाळ, गणेशाचे ।।

दुष्ट संहारक, विघ्नांचा नाशक

सुजनांचा पालक, सर्वकाळ ।।

बुद्धी विद्या मती, याने तू श्रीमंत

रिद्धी सिद्धी साथ, अखंडची ।।

हातासी धरोनि, मार्ग दावियेला

सद्गुरुसी जोडिला, या दासाला ।।

सांगावा रायाचा, सांगणारा तूचि

देणाराही तुचि, त्याच्या करवी ।।

आशीर्वाद तुझा, अखंड रहावा

जन्मोजन्मी द्यावा, आश्रय चरणी ।।


श्रीदत्तचरणरज

जगण्याचे सोने व्हावे

 येणे जाणे हे जीवन, करितो तव चरणी अर्पण,

श्वासाचे नामचि व्हावे, भवसागर तारून न्यावे.


जगण्याचे सोने व्हावे, हे दान तू मजला द्यावे,

मरण्याचा उत्सव व्हावा, इतुके निर्भीड करावे.


ही काया जाई झिजोनि, अग्नीत ती जाय जळोनि,

राखेचे भस्म बनावे, मरण हे सार्थक व्हावे. 


मृत्यू म्हणजे शरीरांतर, जीर्ण त्यजुनी नूतन वावर,

हे नित्यचक्र बिघडावे, मज मोक्षाशी तू न्यावे. 


श्रीदत्तचरणरज

रामायणाचा अध्यात्मिक अर्थ

 ********रामायणाचा अध्यात्मिक अर्थ*************


मुख्यकथा थोडक्यात अशी आहे ----


अयोध्या नगरीत राजा दशरथ आपल्या तीन राण्यांसोबत (कौसल्या, सुमित्रा, कैकेयी) राज्य करत होता. कालांतराने त्यांना 4 पुत्र झाले. (राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न). उत्तम राजशिक्षण करून योग्य वेळी चौघांची लग्ने झाली व 4 सुना घरी आल्या. (सीता, उर्मिला, श्रुतिकीर्ती, मांडवी). 

रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी मंथरा दासीच्या भडकवण्यावरून कैकेयीने वर मागून हट्टाने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवले. सोबत लक्ष्मण व सीता गेले. पुत्रशोकाने दशरथ राजा मृत्यू पावला. 

तिकडे वनात सुवर्ण मोहापायी सीतेने लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा उल्लंघली आणि रावणाने सीतेला पळवले. राम, लक्ष्मण, हनुमानाच्या नेतृत्वात वानरसैन्याने समुद्रावर सेतू बांधून लंकेत प्रवेश केला. राम रावण युद्ध सुरू झाले. लक्ष्मण इंद्रजिताच्या हल्ल्याने बेशुद्ध पडला असता हनुमानाने संजीवनीसाठी अख्खा द्रोणागिरी हिमालयातून उचलून आणला. युद्धात रावण मारला गेला. राम सीता लक्ष्मण हनुमान अयोध्येला परत येऊन सुखाने राज्य करू लागले.


**********अध्यात्मिक अर्थ **********


जी युद्ध करून कुणीच जिंकू शकत नाही ती अयोध्या. इतके शुद्धसत्वगुणाचे वातावरण की जिथे कामक्रोधादी विकार कधीच मनाचा ताबा घेऊ शकत नाहीत अशी ती पुण्यशरीररुपीनगरी अयोध्या. त्या नगरीत देहबुद्धिरूपी राजा आपल्या 3 गुणांसह (सत्वगुण, रजोगुण, तमोगुण) राज्य करत होता. कालांतराने त्यांना धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष रुपी 4 पुत्र झाले. म्हणजे या शरीराला 3 गुणांचा योग्यवेळी योग्य वापर केल्याने धर्म, अर्थ, कर्म, मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त झाले इतकी सिद्धी मिळाली, इतकी त्याची साधना उत्तम झाली. 


चारही पुत्रांची लग्ने झाली, 4 सुना आल्या म्हणजे 4 पुरुषार्थाचा सुयोग्य वापर करून उत्तम कर्म केल्याने सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चार मुक्ती देखील पायाशी लोळण घेत आल्या. 


इतका विवेक वैराग्यपूर्ण देह असतानासुद्धा पूर्वकर्मामुळे म्हणा अथवा पूर्वबंधनामुळे म्हणा, ज्या मत्सराला त्याने दासी करून टाकले होते त्या मत्सररुपी मंथरादासीने डोके वर काढल्याने तमोगुणरुपी कैकेयीने दशरथरूपी देहबुद्धीचा ताबा घेतला आणि देहातील वैराग्यरुपी रामाला देह सोडून जावे लागले. वैराग्य गेले की सोबत विवेकरूपी लक्ष्मण व सदाचरणरुपी सीताही गेले. ज्यावेळी शरीर विवेक, वैराग्य, सदाचरणहीन होते त्यावेळी त्याचा नाश होतो. असे शरीर विवेकवैराग्यपुत्रवियोगाने नाश पावले. 


 तिकडे कर्मभोग भोगत असताना वनात मोहापायी कर्मात सदाचरण विसरले गेले आणि विवेकाने आखून दिलेली रेषा उल्लंघली, म्हणजेच सदाचरण सोडून विवेकहीन वर्तन केले की होतं काय की मनाचा ताबा शेवटी काम, क्रोध, अहंकार रुपी रावण घेतो आणि पळवून नेतो मनाला सद्विचारांपासून, सत्कर्मापासून दूर. 


अश्या पळवून नेलेल्या मनाला जर सोडवायचे असेल तर विवेक, वैराग्य, दास्यभक्तीरुपी राम, लक्ष्मण, हनुमानाचे नेतृत्व हवे. अखंड नामस्मरण हवे. जप मालेतील एक एक मणी म्हणजे एक एक वानर. असा भरपूर जप केल्याने जी वानरसेना तयार होते ती आपल्याला हा भवसागर पार करायला नामरूपी सेतू बांधून देते. 


 नामाची पुण्याई वाढली की मनात विकारांचे द्वंद्वयुद्ध सुरू होते. कधी विषयरुपी राक्षसांचा पगडा भारी ठरतो तर कधी विवेक वैराग्याचा. ज्या वेळी विवेकावर विषयांचा हल्ला होऊन विवेकरुपी लक्ष्मण बेशुद्ध पडतो, त्यावेळी आपली दास्यभक्ती हनुमानाच्या रुपात कामाला येते. भक्तीत प्रचंड ताकद असते. दृढविश्वासाने केलेली भक्ती अशक्य असे पर्वतरुपी प्रश्न हलवू शकते, संकटे पार करू शकते. अश्या भक्तीरुपी हनुमानाने नामसंजीवनी आणून विवेक वाचवला. 

शेवटी युद्धात काम, क्रोध, अहंकाराचा पराभव झाला आणि विवेक, वैराग्य, सदाचरण यांचा विजय झाला.

असा सदाचरणी देह आनंदाने तिन्ही लोकांत राज्य करू लागला, सर्वस्वाचा अधिकारी झाला. 

Sachin Bhide

साधकाने टाळायच्या गोष्टी

 

Copy paste

ll श्रीराम समर्थ ll


*साधकाने टाळायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे* :-


१) रिकामा वेळ मिळाल्यास तो क्षुल्लक गोष्टींबद्दल विचार करण्यात, क्षुल्लक वासना तृप्त करण्यात किंवा मनोराज्ये करण्यात घालवू नये. 


२) साधनात कधीही आळस नसावा.


३) स्वतःच्या योग्यतेबद्दल भलतीच कल्पना नसावी.


४) अनुभवांच्या मागे लागू नये; त्यांच्याविषयी अधीर होऊ नये. आतून तयारी झाली की अनुभव मागे लागतो. 


५) नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये. नाम स्वार्थासाठी नसावे, जिज्ञासेने नसावे, दर्शनासाठीसुद्धा नसावे.


६) आपले साध्य उघड्यावर टाकू नये. त्याला दृष्ट लागते. त्याचा परिणाम वाईट होतो. 


७) साधकाने आपणहोऊन व्यवहाराची मर्यादा सोडू नये. 


८) गुरूने दिलेल्या नामाबद्दल आपली अक्कल चालवू नये. आपल्या प्रगतीबद्दल गैरसमज कधी न करून घ्यावा, कारण आपल्या अंतरंगात काय भरलेले आहे आपल्यालाच माहीत नसते. 


९) माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असेही कधी म्हणू नये. 


१०) साधन करीत असता लोक आपल्याला काय बोलतात याला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देऊ नये. दुसऱ्या साधकाविषयी आपले मत देऊ नये. त्याला वाईट तर म्हणूच नये. 


११) स्वतःबद्दल फार बोलू नये. अहंकाराच्या आहारी जाऊ नये.


भक्तीचे मर्म हे आहे की बाहेरून सगळे तसेच चालले तरी आतून भगवंताखेरीज सर्वांतून सुटले पाहिजे!!! 


~~ (पूज्य बाबा बेलसरे- परमार्थप्रदीप).

माझे असे काय आहे?

 माझे असे काय आहे जे मी तुला अर्पण करू शकतो? 

हा देह तुझा, हा प्राण तुझा, हा श्वास तुझा. 

.

.

         थांब थांब....आहे आहे ... माझं असं काहीतरी आहे ...यादीच देतो तुला. 

         फुकाचा अहंकार, अकारण गर्व, अमर्याद वाढलेल्या वासना, सततची अतृप्ती, तुझ्यावरील अविश्वास, काम क्रोधाचा अतिरेक, लोभाचा मदाचा हव्यास, मत्सराने भरलेलं मन, सततची काळजी संशय आणि चिंता. 

         घे... इतकं सारं ... हे फक्त 'मी आणि माझंच' आहे. 

आता तुला माझं असं काही अर्पण करायचं तर मला हेच सर्व अर्पण करावं लागेल. 

समर्था हे सर्व तुझ्या चरणी अर्पण करून मला अगदी रितं व्हायचंय.... अखंड तुझ्या नामस्मरणात बुडून जायचंय...


श्रीदत्तचरणरज

सद्गुरू म्हणजे काय

Copy paste


 💐सदगुरु💐


🙏. सूर्य प्रकाशाने अंधार पळुन जातो, त्याचप्रमाणे सद्गुरुंचा अभयहस्त ज्याच्या मस्तकावर राहतो त्यांचीकृपा ज्याच्यावर होते, त्याचेवरील मायेचा अंमल नष्ट होतो. ही उपमा इथे लागू पडत नाही. कारण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोप पावतो की, रात्र होते व पुन्हा अंधार ब्रम्हांडात भरतो. मात्र सद्गुरूंचे तसे नाही. ते अज्ञानाला मूळासकटच उपटून टाकतात.


🙏. सोने खराब झाले तरी त्याचे लोखंड कधीच होत नाही. सद्गुरुंच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही.


🙏. परिस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने दुसर्‍या लोखंडाला लावले तर, त्याचे सोने होत नाही म्हणजे परिस लोखंडाला परिसपण देत नाही, पण सद्गुरुंला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करुन तारतो. म्हणजेच शिष्याला गुरुपद प्राप्त होते. म्हणूनच परिसाची उपमाही सद्गुरुंला लागू पडत नाही.


🙏. सद्गुरु सागरा सारखा म्हणावे तर योग्य नाही, कारण सागराचे पाणी खारट असते. अगदी महासागर जरी घेतला तरी तो कल्पांती नासतोच म्हणून ही उपमा तोकडी पडते.


🙏. सद्गुरु मेरुपर्वतासारखा आहे. असे म्हणावे तर ते योयोग्य नव्हे, मेरु पर्वत अचेतन आहे. कठोर दगड आहे पण सद्गुरू तसे नाहीत. ते सचेतन आहेत, त्यांचे अंतःकरण कोमल आहे म्हणून ही उपमा येथे लागू पडत नाही.


🙏. सद्गुरु गगनासारखा आहे म्हणावे तर तेही बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते पण सद्गुरु शून्यापलीकडील स्वरुप आहे. म्हणून ही उपमा सुद्धा उणी पडते.


🙏. सद्गुरु पृथ्वीसारखा, निश्चल, निर्भय व गंभीर आहे म्हणावे तर ते अवाजवी आहे, कारण पृथ्वी कल्पांत समयी विरुन जाईल पण सद्गुरुला मात्र मर्यादा नाहीत. ते अभंग आहेत.


🙏. सद्गुरु सूर्यासारखे आहेत म्हणावे तर ते योग्य नाही, बरोबर नाही सूर्याचा प्रकाश किती ? सद्गुरूंचा प्रकाश अखंड तेवणारा आहे म्हणून ही उपमा अ वास्तव आहे.


🙏. शेषाची उपमा द्यावी म्हटले तर तो डोक्यावर ओझे वाहतो. म्हणून ही उपमा उणी पडते कारण सद्गुरु कोणतेच ओझे वाहत नाहीत.


🙏. सद्गुरु पाण्यासारखे आहे म्हणावे तर पाणी सगळे आटून जाते. परंतु सद्गुरु स्वरुप निश्चल असून ते कधीच नाश पावत नाहीत. म्हणून ही उपमा थीटी पडते.


🙏. सद्गुरु अमृता सारखे आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही. स्वर्गात राहून नित्य अमृत प्राशन करणारे देव अखेर मृत्युच्याच मार्गाने जातात. ते फक्त नावाचेच अमर असतात पण सद्गुरु ज्यांच्यावर कृपा करतात ते खर्या अर्थाने अमर बनतात म्हणून ही उपमा उणी पडते.


🙏. सद्गुरु कल्पतरुसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. आपण जेवढी कल्पना करु तेवढेच कल्पतरू आपणास देतो. परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरु पुढे कल्पतरुची किंमत राहत नाही. किंबहुना सर्व कल्पना ओलांडूनच सद्गुरुंजवळ जावे लागते म्हणून ही उपमा उणी आहे.


🙏. सद्गुरु चिंतामणी सारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. ज्याचे मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरु शिष्यांचे मनात कसलीच चिंता उरु देत नाही. त्याला काही इच्छाच शिल्लक उरली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही म्हणून ही उपमा लागू पडत नाही.


🙏. सद्गुरुला श्रीमंत म्हणावे तर ते योग्य नाही. कारण जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते पण सद्गुरुंच्या द्वाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते.


🙏. स्वर्गलोक, इन्द्रपद आणि त्यांचे ऐश्वर्य ही सगळी कालांतराने नाश पावतात पण सद्गुरुंच्या कृपेची प्राप्ती झाली की, ती कोणत्याही काळी नाश पावत नाही म्हणून ही उपमा लागू पडत नाही.


🙏.सद्गुरुस देव म्हणावे तर सदगुरू कृपेने देव भेटु शकतो पण प्रत्यक्ष त्रिदेव देखील सद्गुरू पाशी नतमस्तक होतात , सद्गुरु मुळे ईश्वर प्राप्ती होऊ शकते पण प्रत्यक्ष ईश्वर जरी प्रसन्न झाले तरी ते आपल्याला सदगुरु ची कृपा मिळवून देऊ शकत.


🙏 एका सद्गुरुचे स्थान सदैव अविनाशी असते सगळी सृष्टी नाशवंत असल्यामूळे दृष्य विश्वातील कोणत्याही वस्तुंची उपमा सद्गुरुला त्यांच्या शाश्वत स्वरुपामुळे देता येत नाही. पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरु स्वरुपात नाही.


🙏वरील सर्व उदाहरणांवरुन असे दिसून येते की, वर्णन करता येत नाही हेच सद्गुरुंचे वर्णन !!!


🙏 सद्गुरुंचे वर्णन करता न येणे हेच त्यांचे वर्णन समजावे. सद्गुरु स्वरुपाचा अनुभव आतील अनुभव आहे जे स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत, त्यांनाच या अवस्थेच्या खुणा कळतात. फक्त अंतर्निष्ठानाच कळेल.


🙏 श्री सद्गुरु ब्रम्हज्ञानी पुरुष असतात. ते परमात्म्याशी अभिन्न असतात. ते चालते बोलते ब्रम्हच समजावे. ते स्वरुपभूत असल्याने त्यांचे वर्णन कसे करणार ?


🙏परमात्म वस्तू अतिंद्रिय व अचिंत्य आहे. अदृष्य व अलक्षण आहे. अतीगूढ व दुर्लभ आहे. सद्गुरुंच्या कृपेने शिष्य ती वस्तू तद्रूपतेने अनुभवतो. आपला आत्मस्वरुपाचा ठेवा सद्गुरुवाचून मिळत नाही म्हणून सद्गुरु करावा. सद्गुरुंनी कृपा केल्याखेरीज ब्रम्हज्ञान होणे दुरापास्त.


🙏 आत्मज्ञान करुन न घेता मनुष्य जी कर्मे करतो ती अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण घडते म्हणून ज्ञान घेण्यासाठी सद्गुरुंचे चरण घट्ट धरावे. त्यांना शरण जाऊन ज्ञान देण्याची प्रार्थना करावी.


🙏सद्गुरुंच्या कृपेखेरीज गर्भवास चुकत नाही. नरकात जाणे सुटत नाही. सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय करतात ? सद्गुरू जीवाला ईश्वर केंद्रित करतात. जीवाची तळमळ शांत करतात. ईश्वरदर्शन घडवितात.


सद्गुरु केला नाही तर जन्म वाया जातो. सद्गुरु पाठीशी नसेल तर जीवन दुःखमय बनते. अभय देणारा हात सद्गुरुंनी डोक्यावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्वर प्रकट होतो. संसाराची दुःखे नाहीशी होतात. असे हे सद्गुरुंचे महात्म्य अपरंपार आहे.


जे जे आपणासी ठावे | ते ते सर्वांसी सांगावे ||

शहाणे करुन सोडावे | सकल जन ||


ही नाथांची  वाणी आहे ..

सद्गुरु महिमा खुप मोठा आहे तो वर्णन करू शकत नाही पण संदगुरू सेवा नामस्मरण, उपासना, संतसंग करून हा मेवा आपण अनुभव करू शकतो ह्याला संदगुरू कृपाचं पाहिजे 🌸🌸


🙏🙏दत्त दास लक्ष्मीकांत🙏🙏


💐💐श्री अनघा दत्तात्रेयाय नमः💐💐

हुशार म्हणजे काय?

 Copy paste


"आमचं लेकरू हुशार आहे पण जरा अभ्यासात कमी आहे", अशा वाक्याला बरेच जण अजुनही हसतात.


शाळेच्या अभ्यासात कमी आहे किंवा परीक्षेत फार मार्क्स मिळत नाहीत, तर ती व्यक्ती 'बुद्धीमान' नाही हा आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे.


खरंतर गार्डनर (Howard Gardner) या मानसशास्त्रज्ञाने ही समजूत कशी ठार चूकीची आहे हे सांगितलंय. त्याने बुद्धीमत्तेचे मुख्य आठ प्रकार पाडले. कुठल्याही व्यक्तीमध्ये या आठ प्रकारांपैकी एक किंवा अधिक बुद्धिमत्तांचं कमी-अधिक प्रमाण असतं, असं त्याचं त्याचं मत होतं.


1. Visual - Spatial Intelligence :  

या प्रकारामध्ये अचूक नकाशा बघणे, random भटकत असतानाही दिशांचा योग्य अंदाज येणे,  फोटो-ग्राफ्स-तक्ते मधून अर्थ काढणे, कोडी सोडवणे, चित्र, patterns मध्ये गती असणं हे सगळं येतं. आर्किटेक्ट, इंजिनीयर, चित्रकार वगैरे यात येतात.


2. Linguistic - Verbal Intelligence :

या प्रकारात भाषेवर प्रभुत्व, शब्दांवर पकड, भारी बोलता येणं किंवा मध्ये मध्ये शाब्दिक विनोद/कोट्या करता येणं हे सगळं येतं. यात शिक्षक, वकील, पत्रकार, काही राजकारणी वगैरे येतात.


3. Logical - Mathematical Intelligence :

आपल्या शाळेत ज्या लोकांना "हुशार" समजतात, अशी मंडळी या प्रकारात येतात. गणित सोडवणं, abstract गोष्टींची लॉजिकल उत्तरं देणं हे सगळं येतं. वैज्ञानिक, गणितज्ज्ञ, इंजिनीयर, कॉम्प्युटर प्रोग्रामर वगैरे लोक यात येतात.


4. Bodily - Kinesthetic Intelligence :

शरीराची वेगवान हालचाल करणं, शरीरावर प्रचंड कंट्रोल असणं, मेंदू आणि डोळ्यांत/इतर अवयवांत भन्नाट co-ordination असणं, हे सगळं या प्रकारात येतं. खेळाडू, डान्सर, शिल्पकार वगैरे लोक यात येतात.


5. Musical Intelligence :

चाल, धून, ताल वगैरे लक्षात राहणं, वाद्यांबद्दल आवड असणं, लवकर नवीन गाणी किंवा विविध वाद्यं शिकता येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगीतिक बुद्धीमत्ता होय.

गायक, संगीतकार, कंपोझर वगैरे मंडळी यात येतात.


6. Interpersonal Intelligence :

लोकांशी संवाद साधता येणं, लोकांच्या भावना समजून घेता येणं, त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करून घेणं, मित्रमंडळी बनवता येणं, त्यांना जपणं, कुठे कसं वागावं हे समजणं, वाद सोडवणं हे सगळं यात येतं. मानसशास्त्रज्ञ, टीम लिडर, काऊन्सीलर, सेल्सपर्सन, राजकारणी माणसं वगैरे .


7. Intrapersonal Intelligence :

हे वरच्या प्रकारच्या उलट. हे स्वतःमध्ये हरवलेले असतात. यांना स्वतःच्या विश्वात दंग राहायला आवडतं. स्वतःचे strengths आणि weaknesses यांना माहिती असतात. नवनवीन कल्पना ते मांडतात (पण मोस्टली मनातल्या मनात 😅). विचारवंत, वैज्ञानिक, लेखक अशी माणसंं या प्रकारची बुद्धीमान असतात.


8. Naturalistic Intelligence :

हा प्रकार त्याने जरा उशीरा मांडला. काही लोकांना निसर्ग आवडत असतो. पक्षी, जंगलं, समुद्र, डोंगर, जैवविविधता अशा सगळ्या गोष्टींचे ते चाहते असतात. शहरात फार मन लागत नाही, खेड्याकडे जाऊन मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात झोपणंं फार आवडत असतं. पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वगैरे सगळे लोक यात येतात.


अशा प्रकारे आपली एक बुद्धीमत्ता ओळखली आणि त्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर आनंदमय होईल सगळं भविष्य. एकापेक्षा जास्त बुद्धीमत्ता असल्यास उत्तमच, मग अशा वेळी भविष्याचा स्कोप अजुन मोठा होतो. 


आपल्या शालेय वयात ज्या बॅक बेंचर्सना आपण अभ्यासामुळे, कमी मार्क्स मुळे हलक्यात घेतो ते लोक कसले भारी खेळाडू, कलाकार असतात हे जरा आठवा. आपल्या एकूणच बोगस शिक्षणव्यवस्थेमुळे कितीतरी लोक depression, न्यूनगंडामध्ये गेले असतील हे सुद्धा आठवा.


त्यामुळे इंटरनेट वर अलरेडी उपलब्ध असलेली ही माहिती सोप्या शब्दांत इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. वाचकांपैकी कोणाचा फायदा झाला तर मला आनंदच होईल 🖤 


लेखक, संकलक माहीत नाही.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझी माय इंद्रायणी

 माय इंद्रायणी नदीचे रोज दर्शन होते. आज तिच्यावर सुचलेल्या ह्या काही ओळी. 


माझी माय इंद्रायणी, असे अति भाग्यवंत

तटी जिच्या ते नांदले, ज्ञाना तुका थोर संत

ज्ञानदेवांची ती ओवी, तुकारामांची ती गाथा

जन्मे हिच्याच तटी ती, धन्य इंद्रायणी माता


आळंदीत जाता कानी, येई चैतन्याचा सूर

देहू गावात रमता, येई भक्तीला तो पूर

दैवी अवतार दोन्ही, साक्षी आहे ही सरिता

बोले ज्ञानियाचा राजा, धन्य इंद्रायणी माता


मुक्ताईच्या साथी माता, माय लेकराचा संग

डोळे पाणावती तिचे, ऐके ताटीचे अभंग

निवृत्तीच्या गुरुत्वाने, ज्ञानदेवा उद्धरिता

बोले सोपान माऊली, धन्य इंद्रायणी माता


गाथा बुडली तरली, माय सर्वसाक्षी झाली

डोळ्या देखत हो तिच्या, स्वारी वैकुंठासी गेली

झाली भक्तीची विरक्ती, आशीर्वाद तिचे घेता

बोले संतांची साऊली, धन्य इंद्रायणी माता


वेड लावती जगाला, संतश्रेष्ठांचे अभंग

तुकोबांच्या कीर्तनात, नाचे सखा पांडुरंग

जीवा भेटेल तो शिव, नामी ध्यानी लीन होता

कल्पवृक्षासम आहे, धन्य इंद्रायणी माता


माय भेटे त्या भीमेसी, उराउरीची ती भेट

दोघी मिळुनी वाहाती, विठोबाच्या चरणी थेट

झाले पापाचे क्षालन, जलस्नान ते करिता

माझी माय ती माऊली, धन्य इंद्रायणी माता

शांत उभी ही मंगल काया

 शांत उभी ही मंगल काया, स्पर्शू शकत नसे ती माया

तीन शीरे षट्करकमलाचे, दिव्य ध्यान हे सद्गुरूराया


ज्ञान ध्यान अन पवित्रता ही, मूर्तिमंत सद्गुरूच्या ठायी

शांती समाधी अन आनंद, तेजभारीत ते मुखारविंद


रज तम अन सत्वही संलग्न, ध्यान स्वप्रभेतची तल्लीन

निर्गुण तेज सगुण ते रूप, दत्तात्रेय एक चिद्रुप 


शस्त्रशास्त्र धारण करुनी करी, चरण मार्ग दाविती संसारी

जनन मरण चक्रातून तारी, दत्तगुरु हा भव उद्धारी


अभय आणि आशीष देऊनी, त्रैमूर्ती रक्षण मम करुनि

मुखी तयाचे नाम बोलुनी, दत्तचरणरज हे प्रार्थितसे


दान देई रे तुझ्या कृपेचे, दर्शन देई मज करुणेचे

घेई नाम वदवुनी या वाचे, अखंड नयनी रूप तयाचे


कानी पडावे मंगल नाम, सत्कार्या द्यावा न विराम

देहाचे बनवुनी श्रीधाम, मग द्यावा चरणी विश्राम


श्रीदत्तचरणरज

नाम ते अनादी, नाम ते अनंत

 नाम ते अनादी, नाम ते अनंत

सांगताती संत, नाम घ्यावे 

नाम ते तारक, नाम ते कारक

परमार्थाचे सुख, नामाचेनी 


नामचि उद्धारी, नेई पैलपारी

अनाथासी तारी, नाम सदा

नामचि जपावे, नामचि बोलावे

नामचि ऐकावे, अन्य नाही 


नाम हे साधन, नाम हे कीर्तन

नामे प्रवचन, सर्वस्वचि

नाम हे अरुप, नाम हे स्वरूप

मूर्तिमंत रूप, नामामुळे 


नामरूपी नौका, आपण बैसावे

पैलथडी न्यावे, भगवंते

पापरूपी वाल्या, नामाने तरला

उद्धरिता झाला, समस्तांसी 


नाम हाच श्वास, नामी उच्छवास

नाम श्वासोच्छ्वास, शेवटचा

नामरूपी जाळे, टाकता प्रवाही

गवसे लवलाही, चक्रपाणि 


नामात तल्लीन, चरणांशी लीन

अखंड भजन, आदिनाथाचे

नाम आधी होते, नाम ते उरते

बाकी नष्ट होते, मायेमध्ये 


नाम तो बोलतो, नामे तो रहातो

नामे आचरतो, व्यवहार

नाम तोचि राम, नामातचि श्याम

नामे परब्रम्ह, सर्वकाळ 


नाम एक सार, बाकी ते असार

व्यर्थ हा संसार, नामाविना

सांगे वेद श्रुती, पुराण महती

नामाचीच कीर्ती, बोले ग्रंथ 


मन लागो नामे, ध्यान लागो नामे

देह करो कामे, संसाराची

नामची महती, सांगो तरी किती

नामे ह्या तरती, भवसागरी 


पापाच्या त्या राशी, वाटे अविनाशी

नाम आगीपाशी, क्षणी भस्म

संचित संपले, भोग ते सरले

नामचि उरले, श्वासामध्ये 


विषयाचा फास, नाम तोडी दोरा

परतोनी माघारा, येणे नाही

नामचि चरण, श्रीहरीचे जाण

आदराने म्हण, नाम त्याचे 


नामासी बंधन, नसावे कसले

परेमध्ये जपले, पाहिजे नित्य

आर्तता नामाची, ओढ माहेराची

आई त्रिधामाची, धाव घेई 


कुशीमध्ये घेई, बाळ तिचा तान्हा

पाजविते पान्हा, अमृताचा

चरणी विसावा, आईच्या असावा

वाटते या जीवा, सर्वकाळ 


नामाने ते साध्य, होई निःसंशय

आई दे आश्रय, नामातचि


श्रीदत्तचरणरज

माय माझी दत्त, बाप तो ही दत्त

 माय माझी दत्त, बाप तो ही दत्त

अनाथांचा नाथ, गुरुराव माझा !!

हात देई दत्त, साथ देई दत्त

जीवनी सोबत, भगवंताची !!

नामरुपी दत्त, श्वासरुपी दत्त

प्राणरुपी दत्त, अंतरात्मा !!

शब्दरुपी दत्त, अर्थरूपी दत्त

सर्वार्थ हा दत्त, चिदानंद !!

ज्ञानातही दत्त, ध्यानातही दत्त

दानातही दत्त, परब्रह्म !!

दाही दिशा दत्त, दत्त सर्वव्याप्त

दत्ताविणे व्यर्थ, निमिषही !!

नाम तेचि रूप, रूप तेचि नाम

पदी द्या विश्राम, जन्मोजन्मी !!


            *************श्रीदत्तचरणरज

श्री नंदी महाराजांकडून काय शिकावे?

 श्री नंदी महाराजांकडून काय शिकावे?

गुणधर्म .... 

एकटक दृष्टी अखंडपणे आपल्या आराध्याकडे लावून बसलेला नंदी,

एकाच स्थितीत अनंत काळ वाट बघत बसलेला नंदी,

आपली कुणी पूजा करत आहे का नाही हे ही ज्याच्या लक्षात येत नाही असा नंदी,

मंदिरात देवाशेजारी न बसता, अगदी दाराशी विनम्रपणे बसलेला नंदी.


अर्थ...

सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती

तद्वत अखंड श्री देवाचे रूप डोळ्यात साठवत बसलेला नंदी हेच सांगतो की श्री परमेश्वर हेच सर्वस्व आहे व हीच खरी ऊर्जा आहे जी सतत ध्यानी, मनी ठेवली पाहिजे, चित्तात साठवली पाहिजे. श्रींशिवाय दुसरे काहीच डोळ्यासमोर नको, मनात नको, विचारात नको, कृतीत नको. 

ध्यान करावे भगवंताचे,

नाम जपावे परमात्म्याचे.

मनी असावे चित्ती वसावे,

अखंड नेत्री हृदयी वसावे. 


दिवस, रात्र, थंडी, वारा, ऊन, पाऊस, सुख, दुःख जे समोर येईल त्याला सामोरे जात असतानासुद्धा परमात्म्याचा ध्यास न सोडता त्याला आपलंसं करण्यासाठी झटलं पाहिजे. विषय विकारांच्या मागे न पळता, चित्त स्थिर करून पतिव्रतेप्रमाणे आराध्यास पुजले पाहिजे. 

इथे मी पूजा करतो, मग त्याने प्रसन्न व्हायलाच हवे, आपले मूळ रूप दाखवायलाच हवे असा कोणताही हट्ट किंवा अट्टाहास कधीही न करता त्या चिदाकाराची अनंत काळ आनंदाने वाट बघण्यात धन्यता मानत, अविकल्प असले पाहिजे. 

वाट बघताना कधीही अधीर होता कामा नये. शांत चित्ताने, दैनंदिन कर्मे करत असताना, अतिशय दृढ विश्वासाने त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडासा जरी विकल्प, अविश्वास मनात असेल तर संकल्प सिद्धी होऊ शकत नाही. 

देवदर्शन घेताना प्रथम दर्शन श्री नंदीचे होते. पण त्यांना त्याचा ना गर्व ना अहंकार. ते या मिळणाऱ्या मानाला पूर्ण दुर्लक्षितच करत असावेत, अथवा त्यांना ते जाणवत देखील नसावे की हा मिळणारा मान माझा आहे, तो मला मिळत आहे. श्रीतत्वाशी पूर्णपणे एकरूप होऊन त्याचाच एक अंश बनून त्याची सेवा साधना करत कालक्रमण करताना मी, माझे, मला हे कवच कधी गळून पडले व मी आणि तो कधी एकरूप झाले हे कळलेही नाही पाहिजे. याला तादात्म्य होणे म्हणतात. असा भाव जागृत झाला की परमेश्वरी कृपा व्हायला वेळ नाही लागत. 

मंदिरात श्री नंदी देवाशेजारी बसत नाहीत, त्यांच्या श्रीचरणांशी बसतात. भक्तीत विनम्रता असणे फार महत्वाचे आहे. अहंकारयुक्त भक्ती विषासमानच असते. आपले स्थान श्रीचरणांशीच हे निश्चित जाणून अतिशय विनम्रपणे नाम घेणे यातच सर्व आले. असे झाले की मूलस्वरूप दूर नाही.

Sachin Bhide

Shri Datt Guru Aarti - Swarachit

*********श्री दत्तगुरूंची आरती *********

(चाल - आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा यासारखी)

आरती अवधूता, दत्तात्रेया समर्था,
सद्गुरूरूपे तू, तारी आम्हा पतिता || धृ ||

त्रिगुणात्मक रूपे, अत्र्यनुसयेचे पोटी
अवतार घेसि तू, विश्व कल्याणासाठी || 1 ||

निराकार परब्रह्म, झाले साकार आता,
दत्तगुरुरूपाने, मार्ग दाखवी अनाथा || 2 ||

वाडी आणि औदुंबर, अक्कलकोट गिरनार,
गाणगग्रामीही, वास तुझा निरंतर || 3 ||

अर्पूनिया ताठ मान, चरणी घेता लोटांगण,
येरझारे चुकवी तो, दत्त चरणांची आण || 4 ||

श्रीदत्तचरणरज, लागे श्रीदत्तांच्या पायी,
बंधमुक्त करी मजला, धाव पाव माझे आई || 5 ||

     ********* श्रीदत्तचरणरज*************