***गांधीवध आणि आमचा जाळलेला वाडा***
इचलकरंजी ला माझे पणजोबा खूप मोठे सराफ व सावकार होते. गुजरी पेठेजवळ महादेव मंदीराशेजारी खूप मोठा चौसोपी असा 3 मजली भिडे वाडा होता. इचलकरंजीचे राजे घोरपडे यांच्याशी असलेले पारिवारिक संबंध, घरची प्रचंड श्रीमंती, लोकांची रेलचेल, 8 अवाढव्य मोठ्या तिजो-या, 40 50 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक करता येण्याजोगी मोठाली भांडी, हंडे, 25 30 दुभत्या गायी म्हशी व एक अरबी घोडा. सर्वत्र सुबत्ता. पण या सर्वाला नजर लागली ती गांधीवधानंतर.
मराठाबहुल वस्तीत भिडे हे पहिले कोकणस्थाचे घर होते जे अनेकांच्या डोळ्यात पहिल्यापासून सलत होते. एक तर घरची श्रीमंती आणि ती ही प्रामाणिकपणाने कमावलेली. व दुसरे म्हणजे आमचे तिथल्या राज परिवाराशी असणारे नाते संबंध. गांधीवधाने आयती संधीच जणू मिळाली होती काही लोकांना त्यांचा पोटशूळ शांत करायची.
1948 ला एका दुर्दैवी सकाळी हल्लेखोरांचा जमाव अचानक वाड्यासमोर जमा झाला व जोरजोरात ओरडून सर्वांना धमकावू लागला की जसे असाल तसे बाहेर निघा. हा वाडा आम्ही जाळून टाकणार आहोत.
परिस्थिती भयानक झाली होती. माझे पणजोबा, पणजी, खापरपणजी व घरातील इतर सर्व लोक नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर पडले. नव्हे तर त्यांना ओढूनच बाहेर काढण्यात आले. त्यातच लोकांनी घर लुटण्याचा नीचपणा केला. 8 तिजो-या पहारीचे, कुदळीचे घाव घालून फोडण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यांना ते जमले नाही. मग काय, जे हाताला येईल ते लुटले गेले. गायी म्हशी गोठ्यातून पळवल्या गेल्या. जे लुटायला जमले नाही ते सरळ सरळ वाड्यातील मोठ्या विहिरीत फेकून दिले गेले आणि वाड्याला आग लावण्यात आली.
प्रचंड दहशत माजवली होती जमावाने त्या वेळी.
भिडे परिवार कसाबसा जवळच्या एका नातेवाइकांच्या घरी पोचला तर जमाव तिथेही हजर. शेवटी लपत छपत हातकणंगलेच्या शेतात जाऊन उसाच्या फडात लपून आपला जीव वाचवावा लागला सर्वांना.
माझे आजोबा त्या वेळी सोलापूर ला होते. त्यांना ही बातमी समजली व ते तडक इचलकरंजीला रवाना झाले. त्या वेळी त्यांना एका ब्रिटिश अधिका-याने खूप मदत केली. त्याच्या अधिकारात त्याने वाड्यातील सामान हलवायला 3 4 ट्रक, काही माणसे व गरजेची हत्यारे दिली. गाड्या घेऊन आजोबा सुसाट वेगाने इचलकरंजीला पोचले. वाटेत जमाव आडवा आलाच. ट्रक पेटवून देणेच बाकी होते, पण आजोबांनी आणि त्यांच्या साथीदारांनी दाखविलेल्या प्रचंड साहसाने आडव्या आलेल्या जमावाला आडवे पाडून गाड्या वाड्यापर्यंत पोचल्या. पण जे दृश्य दिसले त्याने पायाखालची जमीनच सरकली. स्वकष्टाने उभा केलेला आपला राजमहाल आगीत जळून खाक झाला होता. सर्व काही भस्मसात झाले होते. पुरता संसार उध्वस्त झाला होता.
सराफी सावकारी निष्ठेने करुनही हाती राहिले होते ते जाळलेल्या तिजो-यांचे अवशेष. 8 पैकी 6 तिजो-या जळून भस्म झाल्या आणि त्या बरोबर जाळली गेली होती ती जमिनीची कागदपत्रे, गहाण खते आणि सोने, चांदी, हिरे, मोती यांचा खजिना. करोडो रुपयांचे आणि कष्टाचे भस्म झाले होते. अगदी, आवडता अरबी घोडा सुद्धा जाळून मारला गेला होता.
महाभयंकर असा हा संहार होता ज्याची आजवर कोणीही कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाहीये.
सचिन भिडे पुणे
No comments:
Post a Comment