Saturday, 5 June 2021

श्री नंदी महाराजांकडून काय शिकावे?

 श्री नंदी महाराजांकडून काय शिकावे?

गुणधर्म .... 

एकटक दृष्टी अखंडपणे आपल्या आराध्याकडे लावून बसलेला नंदी,

एकाच स्थितीत अनंत काळ वाट बघत बसलेला नंदी,

आपली कुणी पूजा करत आहे का नाही हे ही ज्याच्या लक्षात येत नाही असा नंदी,

मंदिरात देवाशेजारी न बसता, अगदी दाराशी विनम्रपणे बसलेला नंदी.


अर्थ...

सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती

तद्वत अखंड श्री देवाचे रूप डोळ्यात साठवत बसलेला नंदी हेच सांगतो की श्री परमेश्वर हेच सर्वस्व आहे व हीच खरी ऊर्जा आहे जी सतत ध्यानी, मनी ठेवली पाहिजे, चित्तात साठवली पाहिजे. श्रींशिवाय दुसरे काहीच डोळ्यासमोर नको, मनात नको, विचारात नको, कृतीत नको. 

ध्यान करावे भगवंताचे,

नाम जपावे परमात्म्याचे.

मनी असावे चित्ती वसावे,

अखंड नेत्री हृदयी वसावे. 


दिवस, रात्र, थंडी, वारा, ऊन, पाऊस, सुख, दुःख जे समोर येईल त्याला सामोरे जात असतानासुद्धा परमात्म्याचा ध्यास न सोडता त्याला आपलंसं करण्यासाठी झटलं पाहिजे. विषय विकारांच्या मागे न पळता, चित्त स्थिर करून पतिव्रतेप्रमाणे आराध्यास पुजले पाहिजे. 

इथे मी पूजा करतो, मग त्याने प्रसन्न व्हायलाच हवे, आपले मूळ रूप दाखवायलाच हवे असा कोणताही हट्ट किंवा अट्टाहास कधीही न करता त्या चिदाकाराची अनंत काळ आनंदाने वाट बघण्यात धन्यता मानत, अविकल्प असले पाहिजे. 

वाट बघताना कधीही अधीर होता कामा नये. शांत चित्ताने, दैनंदिन कर्मे करत असताना, अतिशय दृढ विश्वासाने त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडासा जरी विकल्प, अविश्वास मनात असेल तर संकल्प सिद्धी होऊ शकत नाही. 

देवदर्शन घेताना प्रथम दर्शन श्री नंदीचे होते. पण त्यांना त्याचा ना गर्व ना अहंकार. ते या मिळणाऱ्या मानाला पूर्ण दुर्लक्षितच करत असावेत, अथवा त्यांना ते जाणवत देखील नसावे की हा मिळणारा मान माझा आहे, तो मला मिळत आहे. श्रीतत्वाशी पूर्णपणे एकरूप होऊन त्याचाच एक अंश बनून त्याची सेवा साधना करत कालक्रमण करताना मी, माझे, मला हे कवच कधी गळून पडले व मी आणि तो कधी एकरूप झाले हे कळलेही नाही पाहिजे. याला तादात्म्य होणे म्हणतात. असा भाव जागृत झाला की परमेश्वरी कृपा व्हायला वेळ नाही लागत. 

मंदिरात श्री नंदी देवाशेजारी बसत नाहीत, त्यांच्या श्रीचरणांशी बसतात. भक्तीत विनम्रता असणे फार महत्वाचे आहे. अहंकारयुक्त भक्ती विषासमानच असते. आपले स्थान श्रीचरणांशीच हे निश्चित जाणून अतिशय विनम्रपणे नाम घेणे यातच सर्व आले. असे झाले की मूलस्वरूप दूर नाही.

Sachin Bhide

No comments:

Post a Comment