वाट पाहे तो कैवारी, ठेवी हात कटीवरी,
मायबापाची ती प्रेमे, पुंडलिक सेवा करी ।।
उभे राहिले सगुण, माथ्यावरी शिवध्यान,
गळा कौस्तुभ आगळा, अंगी बुक्का नि चंदन ।।
माय रुक्मिणी सजली, सौंदर्याची ती पुतळी,
भक्ता आशीर्वाद देण्या, पाहे तिष्ठत थांबली ।।
चरणीची भीमा गाते, विठुरायाचे अभंग,
जळी तिच्या संत स्नाती, होती अभंगात दंग ।।
वारकरी होती गोळा, आहे शयनी सोहळा,
पायी मस्तक ठेवीती, नयनात अश्रू गोळा ।।
बोलती गे माऊली तू, भले शयनाशी जाशी,
परी कृपेचा वर्षाव, नित्य देई या भक्तांशी ।।
राहो रूप तुझे नेत्री, असो नाम तुझे ओठी,
तुझ्या लेकरांची चूक, घे गे माये तुझ्या पोटी ।।
माझा होशील सांगाती, हात धरून चालिशी,
इतुकेच प्रार्थी देवा, झोळीत हे दान देशी ।।
संसाराचे लौकिकाचे, आता खुंटले मागणे,
नित्य संत संग देशी, आहे एकचि सांगणे ।।
दूर करू नको आई, रुक्मिणी गे तू विठाई,
चरणाशी लीन व्हावे, हीच एक आशा राही ।।
B श्रीवल्लभ (सचिन श्रीकांत भिडे)
श्रीवरद दत्तात्रेय भक्ती सेवा समिती