Tuesday, 28 November 2023

दत्त माझा ओझेकरी

 दत्त माझा ओझेकरी,ओझे माझे खांद्यावरी

दत्त माझा सेवेकरी, नित्य श्वास सेवा करी

दत्त माझा रे वाटाड्या, दावी रस्ता काढी बेड्या

दत्त माझा रे सारथी, हाकी गाडी परमार्थी

दत्त करी सारी कामे, ठेवी मला तो सप्रेमे

दत्त व्यापिला या देही, श्र्वासोच्छ्वासि दत्त पाही

दत्त घेई देही ताबा, सर्व कामी तोचि उभा

दत्त मीच मीच दत्त, वेगळी न राहे भ्रांत

दत्त विश्व हे दत्ताचे, तुझे माझे नुरले साचे

आत तोचि तो बाहेरी, व्यापूनी तो चराचरी

तोचि कर्ता तोचि भोक्ता, तोचि जन्मदाता हर्ता

एक तोचि सत्य एक, दुजा नाही रे आणिक

कर्ता आणि तोचि कर्म, क्रिया तोचि तोचि मर्म

ओळखा तो ओझेकरी, ओळखा तो सेवेकरी

ओळखा रे तो वाटाड्या, ओळखा रे तो सारथी

ओळखी त्या ऊर्जास्रोता, ओळखी त्या सद्गुरू दत्ता

नाथ आहे जो अनाथा, जाणून घे तू रे दत्ता

नेणिवेची जाणिवेची, गाठ बांधी तो अविनाशी

बद्ध करी मुक्त करी, माया खेळे तो मुरारी

शरण आला चरणरज, द्यावा मोक्ष महाराज !!


@श्रीदत्तचरणरज 

सचिन श्रीकांत भिडे

Thursday, 23 November 2023

ज्ञानोबा माऊली

दुरितांचे तीमिर जावो, प्रार्थना करते माझी माऊली,

जो जे वांछील तो ते लाहो, म्हणते माझी माऊली.

अज्ञानी मानवांची भिंत, ज्ञानाने चालवते माझी माऊली,

साऱ्या विश्वाचे कल्याण, इच्छिते माझी माऊली.

षडरिपुंच्या तिमिरात, पूर्णीमेचा चंद्रमा होते माझी माऊली,

द्वेषाच्या विषसागरात, अमृत कलश होते माझी माऊली.

अहंकाराच्या रेड्याला, विनम्र करते माझी माऊली,

दंभाच्या राक्षसाला, प्रासादिक करते माझी माऊली.

माऊली व्यापून आहे, साक्षरुपी चराचरी,

तिजविण रिते स्थान, नाही या भुवनांतरी.


सचिन श्रीकांत भिडे

आठवण तुझी येते

 आठवण तुझी येते

डोळे भरून येतात

मेघांविना आकाशीच्या

सरी त्या बरसतात


भिजतात त्या सरींमध्ये

आठवणीतले ते दिवस

होती तुझ्या श्वासांची 

माझ्या हृदयी उठबस


सचिन श्रीकांत भिडे

शब्द माझे हरवले

 शब्द माझे हरवले रे, आर्तता आणू कशी

भाव चरणी गुंतले रे, भावना सांगू कशी 


तू तिथे अन् मी इथे, मन धाव घेते सारखे

रूप ते चित्ती वसे, डोळ्यास झाले पारखे


जीविताच्या जिवलगा रे, नेत्रधारा रोख या

प्राणसखया दिव्यतेजा, जागवी थोडी दया


दर्शना आतुर नेत्रे, अंत का रे पाहशी

अंबरीशा कारणे तू, सत्वरी रे धावशी


धाव घे आता तशी, गजराज जैसा संकटी

व्याकुळ मी रे श्रीहरी, येई हरी द्यावी मिठी


पार्थराणा तू खरा, उघडी जरा तू लोचने

लीन करी रे चरणकमली, एक आता मागणे 


@श्रीदत्तचरणरज

सचिन श्रीकांत भिडे