Saturday, 9 December 2023

मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव

 वाटेत पडलेली ती एक शीळा! 

अस्ताव्यस्त, ओबडधोबड. 

ना आकार ना उकार ना संस्कार.

जडता आणि बद्धता बस.... 


एके दिवशी एक पाथरवट काहीतरी शोधत स्वतःच त्या शीळेजवळ आला. त्याला त्या शीळेत काय दिसले ते त्यालाच माहीत. त्या शीळेला तिच्या हजारो लाखो वर्षाच्या त्या स्थानापासून उचलून दूर घेऊन गेला. 

त्याच्या हातातील छिन्नी हातोडा बघून शीळेवर घाव बसणार हे आता नक्की झाले. 


शीळा दुःखीकष्टी झाली कारण आता तिचा आकारभंग होणार होता. तिच्या मूळ अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागणार होते. त्याचवेळी त्या पाथरवटाचे गुणगान करतानाचे थोरामोठ्यांचे काही शब्द त्या शीळेच्या कानी पडले. ते शब्द ऐकले आणि शीळा मनोमन शहारली. 


एका भव्य मंदिराचे बांधकाम होत होते आणि शीळा त्यासाठी इथे आणली गेली होती ... आता मात्र शीळा स्वतःस धन्य समजू लागली, कृतकृत्य समजू लागली आणि मनातल्या मनात त्या परमज्योतीला विनवू लागली ....... 


हे महाराणा, मला तुझ्या मंदिराची पायरी होण्याचा मान दे. 


तुझ्या मंदिराचे कळसदर्शन करून लोक स्वतःस कृतकृत्य मानतात खरे, पण मला कळसाचा दगड व्हायची इच्छा नाही रे. मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


तुझे मूर्तीरूप म्हणजे लोकांचा प्राण.  तुझ्या अश्या मूर्तीरूप दर्शनासाठी साधूसंत व सर्वच जनसामान्य दूरदूरवरून येतील. तुझ्या मूर्तीसमोर नतमस्तक होतील. त्या मूर्तीच्या चरणाशी तुझ्या सगुण अस्तित्वाला स्मरून आपला माथा टेकवतील. पण मला इतके थोर नाही रे बनायचे. 

देवा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


अलंकापुरीतून ज्ञानेश्वर माऊली येतील. तुझ्या दर्शनास येण्याआधी त्या चैतन्यमूर्तीचे पवित्र चरण माझ्या मस्तकी लागतील आणि माझे जीवन सार्थक होईल! 

प्रभू, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


त्यांच्यासोबतच ती दिव्य अशी तीन भावंडं येतील आणि विसाव्याला माझ्या पाठीवर टेकल्यानंतर मुक्ताईच्या मुखातील ओव्या व निवृत्तीनाथ, सोपानदेवांच्या मुखातून

निरूपण ऐकत माझे अनेक जन्म उद्धरतील. हे अनाथनाथा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


त्या घुंगराच्या गाडीतून दिव्य सौंदर्याचा वरदानयुक्त अभिशाप लागलेली माई कान्होपात्रा येईल. पहिल्या पायरीवर चरण ठेवत माई तुला आर्त हाक मारेल, अरे विठुराया धाव घाल रे ... त्या आर्ततेने माझेही हृदय पिळवटून निघेल, डोळ्यात आसवे जमा होतील व त्याने माझे पापक्षालन होईल.

म्हणूनच, हे प्राणप्रिया, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


मायबाप भगवंताला जोहार घालत आलेले ते चोखोबा, ती उष्ट्याची पाटी माझ्या पाठीवर ठेवून तुझ्या नामात तल्लीन होतील आणि मी त्या संताच्या भोळेपणात! 

अश्या पवित्र संतमाऊलीच्या स्पर्शासाठी हे नारायणा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


नामदेव माऊली ज्या पायरीवर आपला देहप्रवास पूर्ण करतात त्या पायरीचे अहोभाग्य ते काय? त्या माऊलीच्या प्रवासाचा भार घेण्यासाठी हे जगन्नाथा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


शिळी वाळलेली भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याला ती भाकरी कोरडी लागू नये म्हणून त्याच्या मागे तुपाचे तामले घेऊन धावणाऱ्या आणि चराचरात ईश्वर शोधणाऱ्या एकनाथ महाराजांना क्षणभर विसावा देणारी पायरी किती भाग्यवान असेल. हे श्यामकांती, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


वीणा आणि चिपळ्या वाजवत, आनंदाने नाचत रंगत ज्यावेळी माझी तुकाई तुझ्या दर्शनास येईल त्यावेळी तुकोबांच्या पायधूळीने मी नामटिळा लावेन. त्या नामटिळ्यासाठी, हे सनातना, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


समस्त भरतभूमीतील संतांची मांदियाळी तुझ्या दर्शनास येईल. आनंदाचे भरते आलेले हृदय तुझ्या चरणाशी अर्पण करण्यास आतूर संत धावतच तुझे चरणदर्शन करण्यासाठी मंदिरी प्रवेशतील आणि माझे ललाट त्या संतप्रभृतींच्या चरणस्पर्शाने उजळून निघेल. 


हे कृपासिंधू, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


@श्रीदत्तचरणरज 

सचिन श्रीकांत भिडे सा