देते व्हा...
जन्मताच प्रत्येक मनुष्यप्राणी प्रकृतीच्या अधीन असतो. प्रकृती नियमाप्रमाणे तो जगतो, वागतो. त्याचे सर्वाधिक परिश्रम कुठे होत असतील तर एखादी गोष्ट मनासारखी घडवून आणणे, एखादी गोष्ट मिळवणे. थोडक्यात, मला यातून काय मिळणार आहे हे तो प्रत्येकात शोधत असतो. हे प्राकृतिक आहे.
काही ठिकाणी या प्रकृतीवर विकृतीचा विजय झालेला दिसतो, जिथे येन केन प्रकारेण सर्व मलाच कसे मिळेल याची धडपड दिसते. मला नाही मिळाले तर इतर कुणालाही मिळून देणार नाही, प्रसंगी त्याला खाली खेचून, पाडून आपण पुढे जाणे या खलनायकाच्या रुपात ही विकृती आपल्याला समाजात दिसते.
बहुतांश वेळा या विकृतीवर शेवटी संस्कृतीचा विजय झालेला दिसतो. असे सुसंस्कारित लोक स्वतःपुरता विचार न करता वसुधैव कुटुंबकम् हे ध्येय निश्चित करून समाजकल्याण करताना दिसतात. देव, देश व धर्म यासाठी ते जीवनार्पण करता व असे करत असताना त्यांच्या जीवनात एकच ध्यास असतो - "देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें."
निसर्ग कायम आपल्याला मुक्तहस्ते द्यायला शिकवत आलेला आहे व यातूनच आपली परोपकारी भारतीय संस्कृती उदयास आली आहे.
परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः। परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम् ॥
वृक्ष फळ देतात ते दुसऱ्यासाठी, नदी पाणी देते ते दुसऱ्यासाठी, गाय दूध देते ते दुसऱ्यासाठी, अगदी तसेच आपले शरीरसुद्दा परोपकारी खर्ची लागले पाहिजे हेच हा श्लोक सांगतो.
सूरज हमें रौशनी देता, हवा नया जीवन देती है ।
भूख मिटने को हम सबकी, धरती पर होती खेती है ।
औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखें ।।
गरमी की तपती दुपहर में, पेड़ सदा देते हैं छाया ।
सुमन सुगंध सदा देते हैं, हम सबको फूलों की माला ।
त्यागी तरुओं के जीवन से, हम परहित कुछ करना सीखें ॥
निसर्गातील सर्वच गोष्टी आपल्याला दुसऱ्यासाठी जगायला शिकवतात. यात एक महत्वाचा मुद्दा लपला आहे. आपण ज्यावेळी दुसऱ्यासाठी निःस्वार्थपणे काही करत असतो, त्याच वेळी कुठेतरी कुणीतरी आपल्यासाठीसुद्धा नक्की काहीतरी करत असतोच.
म्हणूनच सतत मी,माझे,मला आणि फक्त मलाच, हे न करता आपली जाणिवेची सीमा वाढवून समाजाचे देणे जाणून घेतले पाहिजे.
जो अनपढ़ हैं उन्हें पढ़ाएँ , जो चुप हैं उनको वाणी दें ।
पिछड़ गए जो उन्हें बढ़ाएँ, समरसता का भाव जगा दें ।
हम मेहनत के दीप जलाकर, नया उजाला करना सीखें ॥
हे जेंव्हा आपल्याला जाणीवेतून लक्षात येईल तो सुदिन असेल.
आपली भारतीय संस्कृती या गोष्टीवरच आधारित आहे व म्हणूनच आजवर इतकी आक्रमणे होऊनही ती टिकून आहे तग धरून आहे.
चलातर मग, आपल्या उर्वरित आयुष्यातले क्षण 'प्रकृतीनियम' पाळून जगताना थोडे 'संस्कृतीनियम' पाळून जगूया. देते होऊया.