Saturday, 5 June 2021

रामायणाचा अध्यात्मिक अर्थ

 ********रामायणाचा अध्यात्मिक अर्थ*************


मुख्यकथा थोडक्यात अशी आहे ----


अयोध्या नगरीत राजा दशरथ आपल्या तीन राण्यांसोबत (कौसल्या, सुमित्रा, कैकेयी) राज्य करत होता. कालांतराने त्यांना 4 पुत्र झाले. (राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न). उत्तम राजशिक्षण करून योग्य वेळी चौघांची लग्ने झाली व 4 सुना घरी आल्या. (सीता, उर्मिला, श्रुतिकीर्ती, मांडवी). 

रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी मंथरा दासीच्या भडकवण्यावरून कैकेयीने वर मागून हट्टाने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवले. सोबत लक्ष्मण व सीता गेले. पुत्रशोकाने दशरथ राजा मृत्यू पावला. 

तिकडे वनात सुवर्ण मोहापायी सीतेने लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा उल्लंघली आणि रावणाने सीतेला पळवले. राम, लक्ष्मण, हनुमानाच्या नेतृत्वात वानरसैन्याने समुद्रावर सेतू बांधून लंकेत प्रवेश केला. राम रावण युद्ध सुरू झाले. लक्ष्मण इंद्रजिताच्या हल्ल्याने बेशुद्ध पडला असता हनुमानाने संजीवनीसाठी अख्खा द्रोणागिरी हिमालयातून उचलून आणला. युद्धात रावण मारला गेला. राम सीता लक्ष्मण हनुमान अयोध्येला परत येऊन सुखाने राज्य करू लागले.


**********अध्यात्मिक अर्थ **********


जी युद्ध करून कुणीच जिंकू शकत नाही ती अयोध्या. इतके शुद्धसत्वगुणाचे वातावरण की जिथे कामक्रोधादी विकार कधीच मनाचा ताबा घेऊ शकत नाहीत अशी ती पुण्यशरीररुपीनगरी अयोध्या. त्या नगरीत देहबुद्धिरूपी राजा आपल्या 3 गुणांसह (सत्वगुण, रजोगुण, तमोगुण) राज्य करत होता. कालांतराने त्यांना धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष रुपी 4 पुत्र झाले. म्हणजे या शरीराला 3 गुणांचा योग्यवेळी योग्य वापर केल्याने धर्म, अर्थ, कर्म, मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त झाले इतकी सिद्धी मिळाली, इतकी त्याची साधना उत्तम झाली. 


चारही पुत्रांची लग्ने झाली, 4 सुना आल्या म्हणजे 4 पुरुषार्थाचा सुयोग्य वापर करून उत्तम कर्म केल्याने सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चार मुक्ती देखील पायाशी लोळण घेत आल्या. 


इतका विवेक वैराग्यपूर्ण देह असतानासुद्धा पूर्वकर्मामुळे म्हणा अथवा पूर्वबंधनामुळे म्हणा, ज्या मत्सराला त्याने दासी करून टाकले होते त्या मत्सररुपी मंथरादासीने डोके वर काढल्याने तमोगुणरुपी कैकेयीने दशरथरूपी देहबुद्धीचा ताबा घेतला आणि देहातील वैराग्यरुपी रामाला देह सोडून जावे लागले. वैराग्य गेले की सोबत विवेकरूपी लक्ष्मण व सदाचरणरुपी सीताही गेले. ज्यावेळी शरीर विवेक, वैराग्य, सदाचरणहीन होते त्यावेळी त्याचा नाश होतो. असे शरीर विवेकवैराग्यपुत्रवियोगाने नाश पावले. 


 तिकडे कर्मभोग भोगत असताना वनात मोहापायी कर्मात सदाचरण विसरले गेले आणि विवेकाने आखून दिलेली रेषा उल्लंघली, म्हणजेच सदाचरण सोडून विवेकहीन वर्तन केले की होतं काय की मनाचा ताबा शेवटी काम, क्रोध, अहंकार रुपी रावण घेतो आणि पळवून नेतो मनाला सद्विचारांपासून, सत्कर्मापासून दूर. 


अश्या पळवून नेलेल्या मनाला जर सोडवायचे असेल तर विवेक, वैराग्य, दास्यभक्तीरुपी राम, लक्ष्मण, हनुमानाचे नेतृत्व हवे. अखंड नामस्मरण हवे. जप मालेतील एक एक मणी म्हणजे एक एक वानर. असा भरपूर जप केल्याने जी वानरसेना तयार होते ती आपल्याला हा भवसागर पार करायला नामरूपी सेतू बांधून देते. 


 नामाची पुण्याई वाढली की मनात विकारांचे द्वंद्वयुद्ध सुरू होते. कधी विषयरुपी राक्षसांचा पगडा भारी ठरतो तर कधी विवेक वैराग्याचा. ज्या वेळी विवेकावर विषयांचा हल्ला होऊन विवेकरुपी लक्ष्मण बेशुद्ध पडतो, त्यावेळी आपली दास्यभक्ती हनुमानाच्या रुपात कामाला येते. भक्तीत प्रचंड ताकद असते. दृढविश्वासाने केलेली भक्ती अशक्य असे पर्वतरुपी प्रश्न हलवू शकते, संकटे पार करू शकते. अश्या भक्तीरुपी हनुमानाने नामसंजीवनी आणून विवेक वाचवला. 

शेवटी युद्धात काम, क्रोध, अहंकाराचा पराभव झाला आणि विवेक, वैराग्य, सदाचरण यांचा विजय झाला.

असा सदाचरणी देह आनंदाने तिन्ही लोकांत राज्य करू लागला, सर्वस्वाचा अधिकारी झाला. 

Sachin Bhide

No comments:

Post a Comment