🎂🎂🎂🎂💐मनोगत💐🎂🎂🎂🎂
2019
गर्भावस्था, अर्भकावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, किशोरावस्था आणि आज तरूणावस्था सरली. आज चाळीशी संपली. 41 वा वाढदिवस. प्रौढावस्था की काय ती सुरू झाली. सिंह राशीचा मी सिंहावलोकन करताना ह्या विचारात पडलो की ह्या इतक्या साऱ्या वर्षाचा ताळेबंद मांडला तर तो कसा दिसेल?
उत्तम संस्कारात वाढलो. कर्म करत गेलो, धर्माच्या चार गोष्टी केल्या, अर्थार्जनही केले. भरपूर शिक्षण पदरी पाडले, देश विदेशाचा अनुभव गाठीशी बांधला. घर, गाडी घेतली. बायकोपोरांसकट संसारही उत्तम सुरू आहे. मुख्य म्हणजे खूप चांगली माणसे ह्या आयुष्यात सोबत आहेत.
हे सर्व काडीकाडीने जमवत आणि कमवत असताना आयुष्याने खूप चढ उतार दाखवले, खूप वादळे आली, अजूनही येतच आहेत. गोष्टी आल्याही आणि गेल्याही. बरीच माणसे जवळ आली. त्यातील काही वेळेप्रमाणे सोडून गेली तर काहींना मला सोडून द्यावे लागले. एक मात्र आहे की कितीही जीवघेणे प्रसंग आले तरी जीवनाचा प्रवाह मात्र थांबू दिला नाही.
शेवटी काय, तर ह्या अनुभवरूपी पाथरवटाने जे काही छिन्नी हतोड्याचे घाव माझ्या आयुष्यावर मारले आहेत त्यातून अंततः एक सुबक मूर्तीच घडेल ह्याच विश्वासाने हे पुढील जीवन व्यतीत करणे आहे.
इतकी वर्षे मी समाजाकडून बरेच काही घेतले. अजूनही घेत आहेच. पण आता जसे जमेल तसे, जिथे जमेल तिथे आणि जितके जमेल तितके समाजाला परत द्यायचे ठरले आहे आणि त्या दृष्टीने पाऊले उचलली गेलीही आहेत.
आनंद व समाधान हेच आहे की हे सर्व होत असताना माझी सद्गुरू माऊली माझ्या पाठीशी समर्थपणे उभी आहे व तशी जाणीव ती मला सतत करून देते आहे.
जीव जगला जगला, कशासाठी पोटासाठी,
चार दिवस तू जग, माणसाच्या हितासाठी.
साऱ्या जगासी आधार, देणे जमणार नाही,
एका दोघांना जपणे, तुला अवघड नाही.
उपाशी ती पोरे बाळे, दोन घास त्यांना देई,
चार बुके शिकायला, सहायता तुझी होई.
समाजाने दिले तुला, अन्न, ज्ञान आणि धन,
जाणीवेत रहा याच्या, समाजाचे आहे ऋण.
देता होई देत जाई, तोचि धन्य या जीवनी,
ईश्वराची ही जाणीव, आहे पतीतपावनी.
सचिन
No comments:
Post a Comment