माणूस, अधीरता आणि आत्महत्या .....
आपण हे नेहमी ऐकतो की हल्लीचा जमाना फास्ट फूड चा आलाय. अगदी खरे आहे. पण फास्ट हे फक्त फूड पुरतंच मर्यादित राहिलेलं नाहीये तर आपण केलेल्या कामाचा दृश्य आणि आपल्याला हवा तसा परिणामसुद्धा हल्ली लगेच दिसायला हवा असतो आणि तो जर तसा नाही दिसला तर मनस्थिती व पर्यायाने परिस्थिती इतकी बिघडते की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. अगदी स्वतःचं अमूल्य जीवन संपवण्यापर्यंत. इतकी टोकाची भूमिका घेण्याआधी त्याची मनस्थिती नक्की कशी असते, तो असे काही करेल अशी काही लक्षणं दिसतात का अथवा तो हे प्रश्न कुणापाशी, कधी आणि कसे व्यक्त करतो हे एक गूढच आहे..
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला समाज जीवन हवे असते. आपले आपल्या समाजात एक स्थान असावे असे प्रत्येकाला वाटते आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण प्रामाणिक प्रयत्नही करत असतो. पण कधी कधी समाजात आपली जागा मिळवण्याच्या नादात तो स्वतःचं अस्तित्वच पणाला लावायला निघतो आणि त्यातून हे असे आत्महत्येसारखे दुर्धर प्रसंग ओढवतात. बऱ्याच वेळेला भविष्याची गरजेपेक्षा जास्त केलेली चिंता त्याला वर्तमानात नीट जगू देत नाही आणि मग विचाराच्या वाळवंटात भटकलेला असा तो जीवन संपवण्याचा पर्याय निवडतो. कधी कुटुंबाने त्याच्याकडून अथवा त्याने कुटुंबाकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा तर कधी दबाव. कधी अन्याय तर कधी अत्याचार. एक ना अनेक कारणे आहेत अश्या गोष्टीला. ह्या चक्रव्युहातुन बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना दमलेला तो अगदी अगतिक व अधीर होतो आणि त्याला असे वाटू लागते की येणारा प्रत्येक दिवस हा आजच्यापेक्षा वाईटच असेल. असा निराश व हतबल झालेला माणूस लढून जगण्यापेक्षा हार मानून मेलेलं जास्त चांगलं आहे असा गैरसमज करून घेतो आणि जे व्हायला नको असतं तेच होतं.
आपण जेंव्हा स्वतःला स्वतःच्याच कोषात गुरफटून घेतो त्यावेळी आपले प्रश्न आपल्याला खूप मोठे, अवघड आणि असाध्य वाटू लागतात. आणि अश्या वेळी दुर्दैवाने योग्य मार्गदर्शन अथवा मन मोकळे करण्यासाठी एक खांदा मिळाला नाही तर खचून जाणे ठरलेलेच असते. अशी वेळ कधीही आणि कोणावरही येऊ शकते. अश्या कठीण समयाला जो स्वतःला सावरतो तोच खरा 'रणधीर' (रण - युद्ध + धीर - गाजवणारा, धैर्यवान) मानला जातो आणि बाकीचे मात्र 'रणछोड' (रण - युद्ध + छोड - सोडून पळणारा) ठरतात.
१९७७ साली अनुरोध नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. त्यातील एक गाणे मला ह्या प्रसंगी आठवते.
तुम बेसहारा हो तो किसीका सहारा बनो, तुमको अपने आप ही सहारा मिल जायेगा
कश्ती कोई डूबती पहुँचा दो किनारे पे, तुम को अपने आप ही किनारा मिल जायेगा
स्वतः दुःखात असताना आपलंच दुःख कुरवाळत न बसता जरा जगाकडे उघड्या नजरेनं बघितलं की लगेच जाणवतं की आपलं दुःख काहीच नाहीये. जगात आपल्यापेक्षा दुःखी हजारो लाखो लोक आहेत पण तरीही ते अश्या प्रसंगांना तोंड देत जीवनाची ही लढाई लढत आहेत. अश्या लोकांना जर आपण जवळ केलं तर आपल्या दुःखाचा डोंगर हलका होतोच शिवाय आपल्याला लढायला एक साथी आणि दैवी बळही मिळतं.
गीतकार पुढे म्हणतो ---
हँस कर ज़िन्दा रहना पड़ता है, अपना दुःख खुद सहना पड़ता है
रस्ता चाहे कितना लम्बा हो, दरिया को तो बहना पड़ता है
तुम हो एक अकेले तो रुक मत जाओ चल निकलो, रस्ते में कोई साथी तुम्हारा मिल जायेगा
जीवन तो एक जैसा होता है, कोई हँसता कोई रोता है
सब्र से जीना आसाँ होता है, फ़िक़्रसे जीना मुश्किल होता है
थोड़े फूल हैं काँटे हैं जो तक़दीर ने बाँटे हैं, हम को इन में से हिस्सा हमारा मिल जायेगा
न बस्ती में न वीरानों में, न खेतों में न खलिहानों में
न मिलता है प्यार बज़ारों में, न बिकता है चैन दुकानों में
ढूँढ रहे हो तुम जिस को, उस को बाहर मत ढूँढो, मन के अन्दर ढूँढो प्रीतम प्यारा मिल जायेगा
नदी जशी वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करत सतत पुढे वाहात असते अगदी तसच आपल्याला सुद्धा सतत आणि कुठेही न थांबता हा जीवनाचा मार्ग चालायचा असतो. सत्याच्या मार्गातील अडथळे साम दाम दंड अथवा भेद याचा वापर करून दूर करणे हेच खरे जीवन आहे. ह्याचसाठी धीर आणि संयम हे गुण आपल्या अंगी बिंबवणे खूप गरजेचे आहे. सूर्योदय झाला आणि उजेड पडला असला तरी पुन्हा अंधार आणि रात्र होणारच आहे. आणि रात्र झाली व काळोख पडला तरी पुन्हा नव्याने दिवस उगवणारच आहे हाच विश्वास मनात बाळगणे खूप गरजेचे आहे. सुख दुःखाला समान मनस्थितीने सामोरे जायची मनाची ही अवस्था आपणच निर्माण करायची असते. म्हणून गीतकार म्हणून जातो की मनाच्या आत डोकावून पहा... आपला आधार आणि आपला धीर मनातच घर करून बसलेला आहे. त्याला शोधा. तो नक्की सापडेल. आणि त्याचा वेध घेतला की हे जगणं कठीण जरी असलं तरी असाध्य होत नाही व दुर्धरही बनत नाही.
स्वतःसाठी जगता जगता थोडं दुसऱ्यासाठी जगून बघितलं की आपल्याला जाणीव होते की हे आयुष्य किती अमूल्य आहे. मग हा अमूल्य ठेवा अशा क्षणिक नैराश्यापायी खर्ची घालायचा मूर्खपणा आपण करणार नाही.
आपल्या मनाला योग्य रस्ता आपली प्रज्ञाच दाखवू शकते. तेंव्हा जागते राहा आणि सावध राहा.
शेवटी इतकेच वाटते की व्यक्तीपुरते जीवन न जगता समष्टीसाठी जगा, समाजासाठी जगा. जे आपल्याला मिळाले तसे आपणही काही समाजाला द्या आणि ह्या मानव जन्माचे सार्थक करा.
जीवने यावदादानं, स्यात प्रदानं ततोधिकं !
My blog by the name 'My point of view' is to share my opinion or what I like and feel about any particular subject chosen for that point of time. Thank you.
Thursday, 18 January 2018
Sunday, 7 January 2018
भावना, अधिकार आणि कर्तव्य .....
हल्ली भावना दुखावणं हे सर्दी होण्यासारखं झालय. जरा वातावरण बदललं की जशी लगेच सर्दी होते अगदी तसं जरा काही झालं की लगेच आमच्या भावना दुखावतात. भावना इतक्या स्वस्त कशाकाय झाल्या काय माहित?
प्रत्येक समाजाचा आणि समाजातील प्रत्येकाचा एक म्होरक्या हा असतोच आणि अशा प्रसंगी तो जागृत झाला नाही तरच नवल ! अधिकारवाणीने भावना दुखावल्या गेल्याची उद्घोषणा होते आणि कायद्याच्या विविध कलमांचा कीस काढून एक नवा राजकीय खेळ सुरु होतो. हा भावना आणि अधिकाराचा खेळ खेळून समाजाचा काही फायदा तर होत नाही पण राजकीय मंडळींची पोळी मात्र अगदी खरपूस भाजून निघते. असो..
काही दिवसापूर्वी एक गाणे ऐकले. त्यातील काही ओळी कानावर पडल्या आणि त्या तशाच घुमत राहिल्या...
'कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो, हलाहलाते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो'
हे ऐकून मनात एक समाजसुलभ विचार आला की आता हे कर्तव्य कशाशी खातात? आणि त्या शंकराला कुणी सांगितलं होतं ते हलाहल प्राशन करायला? प्रश्न विचार करायला लावणारा होता. मला माझ्या भावना आहेत, मला माझे अधिकार आहेत आणि ह्याचा वापर कसा कधी कुठे करायचा हे पण मला माहित आहे. पण ... मला माझी कर्तव्यं माहित आहेत का???????
मला घरात सर्वांवर अधिकार गाजवायला आवडतो पण सर्वाना सांभाळण्याचे आद्य कर्तव्य मात्र मी करत नाही. मला माझ्या सोसायटीच्या समितीमध्ये अधिकार हवे असतात पण सर्व सभासदांशी उत्तम संबंध ठेवणे आणि त्यांची कामे करण्याचे कर्तव्य मात्र मला दिसत नाही. मुलांच्या शाळेत गुरुजनांच्या चुका न विसरता मी त्यांना दाखवून देतो पण घरी येऊन आपल्या मुलाचा अभ्यास मात्र मी घेत नाही. माझ्या गाडीच्या प्रवासात रस्त्यात खड्डे आलेले मला आवडत नाहीत. सरकारचे आई बाप निघतात मग ! पण इनकमटॅक्स भरायच्या वेळी मात्र मी लगेच सी ए कडे जाऊन काही ऍडजस्ट होतंय का हेच बघतो. माझे गाव स्वच्छ असावे असे मला वाटते, मग त्या बाबतीत मी प्रशासनाला पत्रे लिहून त्यांच्या जबाबदारीची जाणीवपण करून देतो, आणि इकडे मी मात्र पान तंबाखू खाऊन रस्त्यावर बिनधास्त थुंकतो. गरिबी हटाव, समानता, बंधुता, ह्या विषयांवर सेमिनार झडतात तेव्हा मी अगदी उत्साहाने त्यात सक्रिय सहभाग घेतो पण बाजारात भाजी घेताना त्या शेतकऱ्याशी २ रुपये कमी करण्यावरून अर्धा तास हुज्जत नक्की घालतो. घरात देवाचा काही कार्यक्रम असला की मी विशिष्ट समाजालाच बोलावतो आणि बाकीच्याना मात्र त्याच्या दर्शनाचा साधा लाभही मिळू देत नाही. माझ्या देशात काय फालतूपणा चाललाय अथवा काय बेईमान सरकार आहे हे बोलायला मी क्षणाचाही विलंब लावत नाही पण ज्या वेळी मतदान असते तेंव्हा मी सुट्टीसाठी सहकुटुंब गोव्याच्या बीचवर उताणा पडलेला असतो. थोडक्यात काय तर माझे अधिकार अंगाखांद्यावर खेळवायला मला खूप आवडते पण त्याच वेळी कर्तव्य हा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी तो अंगावर पडलेल्या पालीसारखा झटकला जातो.
असा मी असेन आणि असा हा समाज असेल तर आपण कधी आणि कसे होणार पुढारलेले? घरात बसून नुसती अमेरिका अशी आहे आणि जपान असा आहे ह्या फालतू गप्पा हाणून काहीही साध्य होणार नाही. ते इतके कसे सुधारले याचे मूळ शोधावे लागेल. ते मूळ आहे त्यांना झालेल्या कर्तव्याच्या जाणिवेत. मी एकटा करून काहीही होणार नाही असा निराशावाद त्यांच्यामध्ये नाही. या उलट मीच केले नाही तर कुणीच करणार नाही ह्या विचाराने जो तो प्रेरित असतो. आणि म्हणूनच प्रत्येकजण आपली कर्तव्ये प्रथम समजून घेतो आणि मग ती प्रामाणिकपणे पार पाडतो. जेंव्हा अशी कर्तव्य समजून घेणारी व ती प्रामाणिकपणे पार पाडणारी पिढी समाजात निर्माण होते त्यावेळी प्रत्येकाने केलेल्या कर्तव्यपूर्तीमुळे दुसऱ्याच्या भावनांचा आपोआप सन्मान केला जातो, मान राखला जातो आणि परिणामतः आपल्यासारखा 'भावना दुखरा' समाज तिथे तयार होत नाही व तयार करायचा म्हणलं तरी तयार केला जाऊ शकत नाही.
म्हणूनच सर्व प्रथम येते ते आपले कर्तव्य. ज्याला आपल्या कर्तव्याची खरी जाणीव होते व जो आपली कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडू शकतो तो समाजातील एक सन्माननीय सदस्य होतो आणि असा सदस्य कधीच कुणाच्या भावना पायदळी तुडवत नाही. अश्या उत्तम सदस्यांनाच खरा अधिकारी म्हणले जाते कारण अधिकार हा मिळत नसतो तर तो कमवावा लागतो आणि अश्या कर्तव्यपूर्तीतून जपलेल्या भावना ह्याच आपल्याला आपला अधिकार कमवून देतात.
शेवटी निर्णय आपल्या हातात आहे, आपल्याला खरा अधिकारी व्हायचे आहे का फक्त पुढारी?
Monday, 1 January 2018
उठा राष्ट्रवीर हो ......
वसुधैव कुटुंबकं हे
ब्रीद वाक्य घेऊन शेकडो वर्षे वादळ वाऱ्यांचा भडीमार सोसत, परकिय आणि बऱ्याच वेळा स्वकीयांचेही घाव सहन करत हा हिंदू धर्माचा
वटवृक्ष तसाच उभा आहे. एक सर्व समावेशक जीवन प्रणाली असा ज्याचा गौरव होतो त्या धर्माला
बऱ्याच ग्रहणांनी ग्रासले किंबहुना त्या धर्माचा बराच काळ अश्या ग्रहणांना तोंड देण्यातच
गेला आणि आजही ते तितकेच खरे आहे. आता खरंतर असं म्हणायची वेळ आली आहे - हिंदू खतरे में है ।
आकाशात पतितम तोयं
यथा गच्छति सागरात असा विश्वास असणाऱ्या या सनातन परंपरेचा सामना जेंव्हा परकिय जात्यांध
शक्तींशी झाला त्यावेळी दुराभिमान, अहंकार, द्वेष आणि मत्सर यांनी प्रचंड गदारोळ घातला. बरीच
शतकं हे वादळ सुरूच होते. एकीकडे मंदिरे तोडली जात होती, देवी देवतांच्या मूर्ती भंग होत होत्या, ज्ञानाचे अफाट असे ग्रंथ भांडार समूळ नष्ट होत होते
तर दुसरीकडे हा समाज उच्च नीच, गरीब श्रीमंत,
गोरा काळा, उत्तर दक्षिण या तत्सम गोष्टींमुळे एकमेकांपासून विलग होऊ लागला
होता.
मंदिरे तुटली,
बाया बाटल्या, पुरुष मेले आणि समाजही भंगला. मग या भंगलेल्या समाजावर प्रेम,
दया, सेवा, प्रभू या शब्दांचा भडीमार
सुरु झाला. जखमेवर मलमपट्टी करण्याच्या निमित्ताने ती जखम सतत चिघळत कशी ठेवायची याचाच
विचार सुरु झाला आणि कत्लेआम मधून वाचलेला हा जनसामान्य या करुणेच्या ओझ्याखाली मात्र
कायमचा अडकला. ठिणगी पडलेलीच होती, आता तिला हवा पण मिळाली
आणि हां हां म्हणता हा वणवा पेटला तो कायमचा..... राष्ट्राचे तुकडे झाले, माणसांचे तुकडे केले गेले. एकच आगडोंब उसळला पण
या आगीत काही राजकीय मंडळींनी आपली सत्तेची पोळी भाजून घेतली तर काहींनी स्वतःचे आडनाव
इतके मोठे करून घेतले कि त्याच्या शिवाय देशात पानही हलू शकत नव्हते.
ह्या सर्वात हिंदू
सर्वसामान्य कुठे होता ? तर तो एकमेकांशी भांडण
करण्यात व्यस्त होता. भाषा, जाती, रंगरूप, उभे गंध का आडवे गंध, पैसा, मान मरातब एक ना हज़ार
कारणे पुढे करून आपल्याच लोकांवर श्रेष्ठत्व गाजवण्याची कुप्रवृत्ती बळावली होती. ह्या
सामाजिक दरीचा अगदी हवा तसा उपयोग त्या वेळच्या सत्ताधारी अपप्रवृत्तींनी करून घेतला आणि आपली व आपल्या सात पिढ्यांची
तरतूद करून ठेवली. ते सर्व मोठे झाले, श्रीमंत झाले, आणि एक दिवशी मरुनही
गेले. पण आज जो काही समाज आणि जे काही समाजमन शिल्लक आहे ते तरी निरोगी बनलय का?
तर मुळीच नाही.... समस्त हिंदू धर्माला जी जातीपंथाची,
रंगरूपाची वाळवी लागली आहे ती ह्या सनातन वटवृक्षालाच
समूळ नष्ट करेल कि काय इतपत शंका येतेय आता.
सर्वांना सामान संधी
देऊन सर्वांचं भलं करू पाहणारे काही द्रष्टे या देशाला लाभले हे या देशाचे भाग्यच म्हणायचे
पण असे द्रष्टेपण राजकीय पोळी भाजणाऱ्यांच्या मुळाशी येऊ पाहत आहे म्हणल्यावर ते तरी
गप्प कसे बसतील. आणि म्हणूनच त्यांनी आपले पठडीतले हाथियार पाजळायला पुन्हा सुरुवात
केली आहे. तोडा आणि राज्य करा ही वारसा हक्काने चालत आलेली शिदोरी परत उघडली जात आहे.
एकीकडे हा प्रश्न तर दुसरीकडे एक समाजविशेष आपल्या सनातन आणि वैज्ञानिक अशा उपासना
पद्धतीवर घाव घालत आहे, आया बहिणींना बाटवणेही
सुरूच आहे आणि सेवेच्या व करुणेच्या नावाखाली निष्ठा परिवर्तन करणेही सुरूच आहे.
यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत हा नुसता श्लोक म्हणून कोणीही कृष्ण आता येणार नाही, तर हे रथाचे चाक आणि सुदर्शन आता आपल्या प्रत्येकालाच
उचलावे लागेल.
झटका ही मरगळ आणि
उठा राष्ट्रवीर हो. स्वतःपासून सुरुवात करूया. हिंदू सारा एक या एकच समष्टी भावनेने
कामाला लागूया. जाती, प्रांत, भाषा, वर्णभेद यांना मनात आणि जीवनात आता थारा नकोच. रूढींची बंधने तोडून आता फक्त एकच
जयघोष होऊद्या ..
सारे भेद मिटाकर बोलो,
हिंदू सारा एक है ।
माँ भारतीकी हम संतान,
अमर रहेगा हिंदुस्थान ।
Subscribe to:
Posts (Atom)