Wednesday, 6 March 2024

दत्ता जो जो रे,

 दत्ता जो जो रे,

देवा जो जो रे,
गुरुदत्ता,
निद्रा करी तू आता  !!

बघ बघ नभी तारे, प्रकटोनी
गाती तुजला ध्यानी
म्हणती अंगाई, सुर मिळूनी
जो जो बाळा करुनी
दत्ता जो जो रे !


झोपली वनराई, पशू पक्षी
निद्रादेवीच्या कुशी
निजली ही अवनी, शांतीने
झाली बाळा रजनी !!
देवा जो जो रे ! 

दत्तगुरु परमात्मा, घेई रे विश्रांती,

 दत्तगुरु परमात्मा, घेई रे विश्रांती,

सुमनासनी शयन करी, मनशेजेवरती !!


चंद्र हवा तो म्हणुनी रामचंद्र रडवेला
कौसल्या त्या वेळी नीजवी त्या बाळा
तद्वत तुजलाही झोपवी अनुसयाही
नीज नीज रे बाळा गाते मी अंगाई !!


सेवा ही तुजसाठी, नीज नीज रे जगजेठी
सेवेतचि या देहा, द्यावी तू चिरविश्रांती
जववरी तू या देही, घ्यावी रे मम सेवा
सोडवूनी मग यातूनी, चरणरज मोक्षा न्यावा !! 

Tuesday, 16 January 2024

कर्पूरारती अनसूयातनया

 कर्पूरारती अनसूयातनया गुरू दत्तात्रया!!


कामक्रोधे मोहद्वेषे, चालली बुद्धी लया,

नाम मात्रा दत्त जाळी, कर्पूरासम भवभया !!


अत्रिनंदन, योगभूषण, मोक्षकारक चिन्मया

ज्ञानभक्तीकर्म साधुनी, अर्पिले तव चरणी या !!

कर्पूरासम शुद्धभावे, आळवितो योगिया,

नाम जोडी, बंध तोडी, दत्तचरणरज तन्मया !! 

श्रीदत्त जगन्ज्योती

 श्रीदत्त जगन्ज्योती, निर्मळ मने करितो तुमची आरती!

निशी दिनी तुम्ही स्वामी, रक्षिती भक्तांसी
उद्धरिसी पतीतांसी पापक्षालन करुनी !

नामसाधना करुनी, जपतपचरित्र बोधामृत सेवूनी
मनवाचाक्रियमाण अर्पूनी तुझे चरणी
अनन्यभावे भजता, येई तू ये स्मर्त्रुगामी !!

तुझे दान तुला अर्पुनी, जीवनधना चालवी तू तुझ्या साधनी
सोडवी हे दीनबंधू, तारी तारी भवसिंधु
तोडी तोडी गुरुराया, तोडी भव बंध माया!!

श्रीदत्त जगन्ज्योती, निर्मळ मने करितो तुमची आरती!
श्रीदत्तचरणरज प्रार्थी हे गुरुराया,
ज्योत ही विलिन करि तू, महाज्योतीतया प्रभू ! 

Saturday, 9 December 2023

मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव

 वाटेत पडलेली ती एक शीळा! 

अस्ताव्यस्त, ओबडधोबड. 

ना आकार ना उकार ना संस्कार.

जडता आणि बद्धता बस.... 


एके दिवशी एक पाथरवट काहीतरी शोधत स्वतःच त्या शीळेजवळ आला. त्याला त्या शीळेत काय दिसले ते त्यालाच माहीत. त्या शीळेला तिच्या हजारो लाखो वर्षाच्या त्या स्थानापासून उचलून दूर घेऊन गेला. 

त्याच्या हातातील छिन्नी हातोडा बघून शीळेवर घाव बसणार हे आता नक्की झाले. 


शीळा दुःखीकष्टी झाली कारण आता तिचा आकारभंग होणार होता. तिच्या मूळ अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागणार होते. त्याचवेळी त्या पाथरवटाचे गुणगान करतानाचे थोरामोठ्यांचे काही शब्द त्या शीळेच्या कानी पडले. ते शब्द ऐकले आणि शीळा मनोमन शहारली. 


एका भव्य मंदिराचे बांधकाम होत होते आणि शीळा त्यासाठी इथे आणली गेली होती ... आता मात्र शीळा स्वतःस धन्य समजू लागली, कृतकृत्य समजू लागली आणि मनातल्या मनात त्या परमज्योतीला विनवू लागली ....... 


हे महाराणा, मला तुझ्या मंदिराची पायरी होण्याचा मान दे. 


तुझ्या मंदिराचे कळसदर्शन करून लोक स्वतःस कृतकृत्य मानतात खरे, पण मला कळसाचा दगड व्हायची इच्छा नाही रे. मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


तुझे मूर्तीरूप म्हणजे लोकांचा प्राण.  तुझ्या अश्या मूर्तीरूप दर्शनासाठी साधूसंत व सर्वच जनसामान्य दूरदूरवरून येतील. तुझ्या मूर्तीसमोर नतमस्तक होतील. त्या मूर्तीच्या चरणाशी तुझ्या सगुण अस्तित्वाला स्मरून आपला माथा टेकवतील. पण मला इतके थोर नाही रे बनायचे. 

देवा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


अलंकापुरीतून ज्ञानेश्वर माऊली येतील. तुझ्या दर्शनास येण्याआधी त्या चैतन्यमूर्तीचे पवित्र चरण माझ्या मस्तकी लागतील आणि माझे जीवन सार्थक होईल! 

प्रभू, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


त्यांच्यासोबतच ती दिव्य अशी तीन भावंडं येतील आणि विसाव्याला माझ्या पाठीवर टेकल्यानंतर मुक्ताईच्या मुखातील ओव्या व निवृत्तीनाथ, सोपानदेवांच्या मुखातून

निरूपण ऐकत माझे अनेक जन्म उद्धरतील. हे अनाथनाथा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


त्या घुंगराच्या गाडीतून दिव्य सौंदर्याचा वरदानयुक्त अभिशाप लागलेली माई कान्होपात्रा येईल. पहिल्या पायरीवर चरण ठेवत माई तुला आर्त हाक मारेल, अरे विठुराया धाव घाल रे ... त्या आर्ततेने माझेही हृदय पिळवटून निघेल, डोळ्यात आसवे जमा होतील व त्याने माझे पापक्षालन होईल.

म्हणूनच, हे प्राणप्रिया, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


मायबाप भगवंताला जोहार घालत आलेले ते चोखोबा, ती उष्ट्याची पाटी माझ्या पाठीवर ठेवून तुझ्या नामात तल्लीन होतील आणि मी त्या संताच्या भोळेपणात! 

अश्या पवित्र संतमाऊलीच्या स्पर्शासाठी हे नारायणा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


नामदेव माऊली ज्या पायरीवर आपला देहप्रवास पूर्ण करतात त्या पायरीचे अहोभाग्य ते काय? त्या माऊलीच्या प्रवासाचा भार घेण्यासाठी हे जगन्नाथा, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव. 


शिळी वाळलेली भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याला ती भाकरी कोरडी लागू नये म्हणून त्याच्या मागे तुपाचे तामले घेऊन धावणाऱ्या आणि चराचरात ईश्वर शोधणाऱ्या एकनाथ महाराजांना क्षणभर विसावा देणारी पायरी किती भाग्यवान असेल. हे श्यामकांती, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


वीणा आणि चिपळ्या वाजवत, आनंदाने नाचत रंगत ज्यावेळी माझी तुकाई तुझ्या दर्शनास येईल त्यावेळी तुकोबांच्या पायधूळीने मी नामटिळा लावेन. त्या नामटिळ्यासाठी, हे सनातना, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


समस्त भरतभूमीतील संतांची मांदियाळी तुझ्या दर्शनास येईल. आनंदाचे भरते आलेले हृदय तुझ्या चरणाशी अर्पण करण्यास आतूर संत धावतच तुझे चरणदर्शन करण्यासाठी मंदिरी प्रवेशतील आणि माझे ललाट त्या संतप्रभृतींच्या चरणस्पर्शाने उजळून निघेल. 


हे कृपासिंधू, मला तुझ्या मंदिराच्या पायरीचा दगड बनव.


@श्रीदत्तचरणरज 

सचिन श्रीकांत भिडे सा

Tuesday, 28 November 2023

दत्त माझा ओझेकरी

 दत्त माझा ओझेकरी,ओझे माझे खांद्यावरी

दत्त माझा सेवेकरी, नित्य श्वास सेवा करी

दत्त माझा रे वाटाड्या, दावी रस्ता काढी बेड्या

दत्त माझा रे सारथी, हाकी गाडी परमार्थी

दत्त करी सारी कामे, ठेवी मला तो सप्रेमे

दत्त व्यापिला या देही, श्र्वासोच्छ्वासि दत्त पाही

दत्त घेई देही ताबा, सर्व कामी तोचि उभा

दत्त मीच मीच दत्त, वेगळी न राहे भ्रांत

दत्त विश्व हे दत्ताचे, तुझे माझे नुरले साचे

आत तोचि तो बाहेरी, व्यापूनी तो चराचरी

तोचि कर्ता तोचि भोक्ता, तोचि जन्मदाता हर्ता

एक तोचि सत्य एक, दुजा नाही रे आणिक

कर्ता आणि तोचि कर्म, क्रिया तोचि तोचि मर्म

ओळखा तो ओझेकरी, ओळखा तो सेवेकरी

ओळखा रे तो वाटाड्या, ओळखा रे तो सारथी

ओळखी त्या ऊर्जास्रोता, ओळखी त्या सद्गुरू दत्ता

नाथ आहे जो अनाथा, जाणून घे तू रे दत्ता

नेणिवेची जाणिवेची, गाठ बांधी तो अविनाशी

बद्ध करी मुक्त करी, माया खेळे तो मुरारी

शरण आला चरणरज, द्यावा मोक्ष महाराज !!


@श्रीदत्तचरणरज 

सचिन श्रीकांत भिडे

Thursday, 23 November 2023

ज्ञानोबा माऊली

दुरितांचे तीमिर जावो, प्रार्थना करते माझी माऊली,

जो जे वांछील तो ते लाहो, म्हणते माझी माऊली.

अज्ञानी मानवांची भिंत, ज्ञानाने चालवते माझी माऊली,

साऱ्या विश्वाचे कल्याण, इच्छिते माझी माऊली.

षडरिपुंच्या तिमिरात, पूर्णीमेचा चंद्रमा होते माझी माऊली,

द्वेषाच्या विषसागरात, अमृत कलश होते माझी माऊली.

अहंकाराच्या रेड्याला, विनम्र करते माझी माऊली,

दंभाच्या राक्षसाला, प्रासादिक करते माझी माऊली.

माऊली व्यापून आहे, साक्षरुपी चराचरी,

तिजविण रिते स्थान, नाही या भुवनांतरी.


सचिन श्रीकांत भिडे