Wednesday, 6 March 2024

दत्ता जो जो रे,

 दत्ता जो जो रे,

देवा जो जो रे,
गुरुदत्ता,
निद्रा करी तू आता  !!

बघ बघ नभी तारे, प्रकटोनी
गाती तुजला ध्यानी
म्हणती अंगाई, सुर मिळूनी
जो जो बाळा करुनी
दत्ता जो जो रे !


झोपली वनराई, पशू पक्षी
निद्रादेवीच्या कुशी
निजली ही अवनी, शांतीने
झाली बाळा रजनी !!
देवा जो जो रे ! 

दत्तगुरु परमात्मा, घेई रे विश्रांती,

 दत्तगुरु परमात्मा, घेई रे विश्रांती,

सुमनासनी शयन करी, मनशेजेवरती !!


चंद्र हवा तो म्हणुनी रामचंद्र रडवेला
कौसल्या त्या वेळी नीजवी त्या बाळा
तद्वत तुजलाही झोपवी अनुसयाही
नीज नीज रे बाळा गाते मी अंगाई !!


सेवा ही तुजसाठी, नीज नीज रे जगजेठी
सेवेतचि या देहा, द्यावी तू चिरविश्रांती
जववरी तू या देही, घ्यावी रे मम सेवा
सोडवूनी मग यातूनी, चरणरज मोक्षा न्यावा !!