Wednesday, 4 August 2021

कोण जातीचा रे तू दीनानाथा?

 कोण जातीचा रे तू दीनानाथा? 

भक्तांच्या आर्त हाकेपोटी वैकुंठ सोडून भूलोकी आलेल्या हे सावळ्या, तू कोणत्या कुळातला आहेस रे? जात काय तुझी? भक्ताने फेकलेल्या विटेवर गुमान तिष्ठत उभ्या असलेल्या हे जगन्नाथा, तुझी जात कोणती? कुणाचे उष्टे आनंदाने खाणाऱ्या तर कुणाच्या घरी पाणी भरणाऱ्या हे नारायणा, कोण जात रे तुझी? 

कुणाच्या शेणी लावणारा, कुणाची शेती करणारा, कुणाची मडकी भाजणारा तर कुणाची वस्त्रे विणणारा तू काय जात सांगशील रे तुझी? 

ज्ञानदान करणारा आणि ढोरकाम करणाराही तूच ना रे विश्वेशा? मासे मारणारा आणि संजीवनी प्रदान करणारा तू कुणी वेगळ्या जातीचा होता का रे? व्यापार करणारा, बाग फुलवणारा, दागिने करणारा, जोहार घालणारा, कपडे शिवणारा तू कोण जातीत जन्माला आला आहेस रे आदीनाथा? 

सांग ना रे अच्युता, हे अखंडा, अरे अभंगा, हे अनंता, तुझी जात कोणती?


*****श्रीदत्तचरणरज*****

No comments:

Post a Comment