ओळख मला राधे ओळख मला,
कोणाचा मी कोण राधे ओळख मला ।।
मथुरेस जन्म झाला, गोकुळात केली लीला
गोपालांचा पालनबाला, ओळख मला ।।
श्री संत एकनाथांची ही एक माधुर्यपूर्ण प्रेमपूर्ण गौळण ज्या कान्होबाच्या ओढीने रचली गेली, त्या कान्होबाचा, त्या गोपालाचा, त्या मदनमोहनाचा धरावतरण दिन अर्थात गोकुळ अष्टमी!
भयभंजन, नरमृग, पंकजनाभ, नगधर, चक्रपाणि अशी असंख्य नामाभिधाने मंडित केलेला हा देवाधिदेव या भूतलावर अवतरला तोच मुळी तमाचा नाश करायला.
अंधाऱ्या पावसाळी रात्री अवतरताच सर्वप्रथम नाश केला तो मातापित्यांच्या पुत्रमोहाचा, कारण जन्मताच पुत्रत्याग सोसावा लागणार होता ना त्यांना! मथुरेतून बाहेर पडतानाच कंसरुपी अहंकाराचा विनाश लिहिला गेला होता. इथून पुढे जणू काही 'सद्रक्षणाय खल निग्रहणाय' हे ब्रीदच घेऊन श्रीकृष्णाने आपले जीवनयापन केले. धर्मो रक्षति रक्षित: हे कुणी जगण्यातून शिकवले असेल तर ते श्रीकृष्णाने!
अष्टमीला जन्म घेऊन मानवी मनातील अष्टरिपूमर्दन (काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर, संशय, चिंता) करायचे काम कुणी केले असेल तर ते अमृत वार्षिणी श्रीमद्भग्वद्गीतेद्वारा या श्रीकृष्णानेच!
कसा होता माझा कान्हा?
गुरुवंदना, विनम्रता, कर्मशीलता, कार्यकुशलता इत्यादी गुणांचे भांडार म्हणजे हा चक्रधर!
भोगरहीत वात्सल्यप्रेम काय असते हे शिकण्याचे विद्यापीठ म्हणजे श्रीराधाकृष्ण !
मित्रप्रेम, बंधुभगिनीप्रेम, आप्तेष्टप्रेम, समाजप्रेम, निसर्गप्रेम असा प्रेमफुलोरा म्हणजे तो कन्हैय्या!
मानवी समाजाचे, मूल्यांचे, नीतीचे, परंपरेचे, धर्माचे अहित करणारा तो संपूर्ण समाजाचा शत्रू असतो, भले तो परकीय असो वा स्वकीय. अश्या शत्रूला वेळीच ओळखून त्याचा समूळ विनाश करणे हाच पुरुषार्थ आहे ही शिकवण स्वतःच्या वागण्यातून देणारा तो हा मायापती!
अश्या अष्टावधानी प्रभूअवताराला स्मरण करून हे गुण अंगी बाणण्याचा हा दिवस म्हणजे गोकुळअष्टमी.
श्रीकृष्ण शरणं मम