Friday, 8 September 2023

तू तारी अथवा मारी

 आज कै.आईचा दशक्रियाविधी झाला. तिच्या मंगल स्मृतीस ही शब्द पुष्पांजली.


तू तारी अथवा मारी, शरणांगत तुजसी मुरारी ॥


हे विश्वव्यापका राणा, हे नीलवर्ण समचरणा ॥

हे दीनोद्धारक प्राणा, दुरितांचा तू कैवारी ॥

शरणांगत तुजसी मुरारी ॥


हे दयानिधे श्रीरामा, हे मीरेच्या विश्रामा ॥

हे सत्यरुप शिवनामा, वारी तू दुःख निवारी ॥

शरणांगत तुजसी मुरारी ॥


फसलो या संसारात, षड्रिपूने केला घात ॥

भोवऱ्यास नाही अंत, थकलो रे या संसारी ॥

 शरणांगत तुजसी मुरारी ॥


हे दत्ता प्राणेश्वर्या, हे त्रिमुर्तीरुपी आर्या ॥

लावावी तनु सत्कार्या, चंदनवत झिजवी सारी ॥

शरणांगत तुजसी मुरारी ॥


श्रीदत्तचरणरज प्रार्थी, बनवावे मज निस्वार्थी ॥

दावी तू मज गुह्यार्थी, स्वीकारी मज स्वीकारी ॥

शरणांगत तुजसी मुरारी ॥


@श्रीदत्तचरणरज

सचिन श्रीकांत भिडे 

श्रीवरददत्तात्रेय भक्तीसेवासमिती