Monday, 30 May 2022

ऊर्जावान बना!

 ऊर्जा, जीवन दायिनी आहे. जीवनाची सुरुवात, मध्य व अंत म्हणजे ऊर्जा.

जिथे ऊर्जा तिथे जीवन व जिथे जीवन तिथे ऊर्जा.
ऊर्जेचा अभाव म्हणजे अंधार, ऊर्जेचा अभाव म्हणजे मृत्यू, ऊर्जेचा अभाव म्हणजे निराशा.
समस्त ब्रह्मांड सक्रिय आहे ते ऊर्जेमुळे. आपल्या गतीविधी होतात त्या ऊर्जेमुळे.
ऊर्जेचा सुयोग्य वापर माणसाला सामर्थ्यवान बनवतो तर अयोग्य वापर विनाशकारी.
शरीरातील ऊर्जा योग्य वेळी योग्य तऱ्हेने वापरली तर परिणाम आश्चर्यकारक असतात. पण तीच ऊर्जा जर नको तिथे व नको तितकी वापरली तर मात्र शरीराचे अपरिमित नुकसान होते.
विश्वातही ऊर्जा केंद्रे आहेत, ज्याचा शोध लावून तिथे देवालये निर्माण केली गेली होती. ही देवालये केवळ त्यात स्थापित मूर्तीला बघून तिच्या कोरीव कामाचे कौतुक करण्यासाठी नव्हती. ती होती वैश्विक ऊर्जेला आपल्यात सामावून घेण्यासाठी. देवालयात जाऊन तेथील स्थापित देवतेला आवाहन करून आपले शरीर त्या वैश्विक उर्जाकेंद्रातील ऊर्जेला स्वीकारण्यासाठी सक्षम बनवण्याची प्रार्थना करून ती ऊर्जा ग्रहण करावी हा मंदिरांचा मुख्य हेतू होता. म्हणूनच प्राचीन मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन बाहेर पडले की आपल्याला ऊर्जावान वाटते.
ऊर्जा हेच जीवन आहे. शरीर जिवंत आहे कारण त्यात ऊर्जा आहे. ऊर्जा संपली की शरीर थंड पडते. असे शरीर कुजायला सुरुवात होते. म्हणूनच ती प्रक्रिया सुरू व्हायच्या आधी ते थंड शरीर अग्निरूपी ऊर्जेत अर्पण करून टाकतात.
ऊर्जा वाणीतून समाधानाने बाहेर पडली तर तिचा आशीर्वाद होतो पण त्याच वेळी ती जर उद्वेगाने, निराशेने, क्रोधाने बाहेर पडली तर तिचा शाप होतो.
म्हणून ऊर्जेचा वापर तारक अथवा मारक असा दोन्ही प्रकारे करता येतो, जशी, अणुऊर्जा तारते आणि मारते देखील.
साऱ्या विश्वात असलेली निर्मिती ही ऊर्जेचे बिंदू आहेत. जे ऊर्जेचे बिंदू आपल्या ऊर्जेचा सुयोग्य वापर करतात ते आपले जीवन प्रकाशमान करून सोडतात, इतके प्रकाशमान की त्यांच्या देहाच्या जाण्यानंतरही तो प्रकाश कायम असतो. तो प्रकाश इतरांना ऊर्जा देतो.
नकारात्मक ऊर्जा माणसाचे अध:पतन घडवून आणते.
म्हणून आपली ऊर्जा सतत सकारात्मक असावी.
ऊर्जा सकारात्मक राखण्यासाठी विश्वशांती प्रार्थना, मंत्राभ्यास, ध्यान, प्राणायाम, योग, सूर्यनमस्कार, विपश्यना, उपासना याचा प्रचंड उपयोग होतो.
जो यापैकी काहीही करत असतो त्याला ही सकारात्मकता जाणवतेच. इतकेच नाही तर कालांतराने समोरच्या व्यक्तीतून बाहेर पडणारी ऊर्जा ही सकारात्मक आहे का नकारात्मक हे सुद्धा जाणवू लागते.
हे जाणवले की माणूस अश्या नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवतोच.
आपल्या शरीरातील ऊर्जेच्या लहरी जाणवायला सुरुवात झाली की ज्या वेळी आपण मंदिरात जाऊ त्यावेळी त्या ऊर्जाकेंद्रावर स्थापित विग्रहातून (मूर्तीतून) बाहेर पडणारी प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते. त्या लहरी जेंव्हा आपल्या शरीरास येऊन स्पर्श करतात तेंव्हा आपले शरीर थरथरते. मनातील विचार काही सेकंदासाठी शून्य होतात व शरीर मनाची अतिशय आनंददायी अवस्था प्राप्त होते. ही जाणीव अतिशय आनंद देणारी असते.
ऊर्जावान बना!

देवभक्ती व अध्यात्म खरंच देशोधडीला लावते?

 *****देवभक्ती व अध्यात्म खरंच देशोधडीला लावते?**** 


महाभागवत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात - 

बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥

अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥

बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी ही दुर्दशा जनामध्ये ॥

बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥

बरे झाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥

बरे झाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥ 


याचा अध्यात्मिक गूढार्थ वेगळा आहे हे मान्य, पण लौकिक जीवनातसुद्धा हे श्लोक अगदी चपखल बसतात. ज्यांना हा अनुभव आला आहे त्यांना हे नक्कीच जाणवेल व कळेल की अध्यात्मात दिवाळे का निघते! 

परमेश्वरावर प्रेम करणे हा कधीच side business म्हणून करायची गोष्ट नाहीये. जो साऱ्या ब्रह्मांडाचा निर्माता, रक्षिता व संहारिता आहे त्याच्याशी आपली अलौकिक गाठ बांधायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. 

ते तेज, ती ऊर्जा आपल्या नश्वर देहात येणे, ती झेपणे व ती बाळगणे हे येऱ्या गबाळ्याचे काम मुळीच नाहीये. 

जसे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसेच मन संसारात गुंतवून, त्यात अडकून परमेश्वर प्रीती साध्य होत नाही. संसार हा केवळ आदेश म्हणून जेंव्हा केला जातो व ईश प्रेम जेंव्हा निरपेक्षपणे केले जाते तेंव्हाच ते त्या परमात्म्यापर्यंत पोहोचते. 

हे करत असताना परमेश्वर त्याच्याच योगमायेत आपल्याला अनेक प्रकारे अनेक वेळा अडकवून ठेवतो, गुंतवून ठेवतो. इतके की आपल्याला कळतही नाही की हे जे आपल्याला आनंददायी वाटते आहे ते सुद्धा मायेचेच रूप आहे व हे देखील ईशप्राप्तीत अडसर होऊ शकते. ही जाणीव जेंव्हा आपल्या विवेकाला पटते त्यावेळी परमेश्वर एक एक पाश तोडायला सुरुवात करतो. 

ही प्रक्रिया लौकिक अर्थाने अत्यंत कष्टदायक असते. कधी तुमचा मान सन्मान दुरावतो, कधी पैसे, कधी इज्जत तर कधी एखादी अत्यंत प्रिय व्यक्ती, वस्तू. 

ज्याप्रमाणे ज्वारीच्या लाह्या बनतात त्याप्रमाणे गरम तप्त वाळूत आपण सर्व बाजूने भरडले व घोळले जातो. 

त्यात जे ईश कृपेने तरतात ते जशी ज्वारी आतून फुटून उमलून बाहेर येते व लाही तयार होते तसे उमलले जातात. 

जोवर लौकिकाचा मोह मनापासून सुटत नाही तोवर हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा सुरूच राहते. यातून जे बोध घेतात ते एक पायरी पुढे सरतात. 

जोवर लौकिकाचे दिवाळे निघत नाही तोवर अलौकिकाची दिवाळी साजरी होऊच शकत नाही. 

जे गेले ते त्याच्या इच्छेने, जे राहिले ते ही त्याच्या इच्छेने ही भावना वाढीस लागणे गरजेचे असते. 

परमेशची इच्छा हीच आपली इच्छा मानून अखंड नामात बुडून आदेशाचा संसार केला की निघणाऱ्या दिवाळ्याचासुद्धा एक उत्सव होतो. 

अश्या उत्सवात रंगलेले तुकोबा वर उल्लेखलेल्या ओळी लिहू शकले व तद्वत रमू शकले. 

मग देशोधडीला नक्की काय लागते? आपल्या वासना, अमर्याद गरजा, लोभ, मोह, माया, ममता यांच्या राज्यात आपण सुखे नांदत असताना जेंव्हा परमेश्वराचे पाऊल आपल्या हृदयी विराजते त्यावेळी या गरजा, वासना, माया, ममता आपल्याला सोडून जाऊ लागतात. इतकी युगे आपण त्यांच्यासोबतच रमलो असल्याने त्या सोडून जाताना आपले लौकिक जीवनात हाल हाल होतात, पण त्याच वेळी अलौकिकाचा मळा फुलायला सुरुवात झालेली असते. नामस्मरणाचे अखंड तीर्थ या मळ्यात देत राहिले की असे लौकिक दिवाळे सुसह्य होते. 

एकीकडे आपण देशोधडीला लागतो तर दुसरीकडे तोच परमेश्वर आपल्याला नित्यशाश्वताची सत्ता सुपूर्त करत असतो.

त्यामुळे ज्यांना श्रीचरणकमल सदास्वरूपी हवे असतील त्यांनी अश्या दिवाळखोरीला कायम तयार असावे. 

                ||कर्ता एक रघुनंदन||

Friday, 6 May 2022

जातीवाद व ब्राह्मण

 एक ब्राह्मण म्हणून मी अनुभवलेला जातीवाद

********************************
मी जन्माने कोकणस्थ ब्राह्मण आहे. लोकसंख्येतील प्रमाणाच्या दृष्टीने कायमच अल्पसंख्यांक असलेल्या या वर्गाने देशाला लढवय्ये महापुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक, कवी, लेखक, सच्चे इतिहासकार, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, राजकारणी, शिक्षक, संत सद्गुरू, विचारवंत, पत्रकार, खेळाडू, देशरक्षक, साहित्यिक, गणितज्ञ, भाषा शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते अश्या वैविध्यपूर्ण क्षेत्रातील अग्रणी दिलेले आहेत व त्याच कुलपरंपरेत माझाही जन्म झाला हे मी माझे भाग्यच समजतो.

माझ्या घरातील वातावरण पापभिरू, धार्मिक व आध्यात्मिक. रीतिरिवाज, सणसमारंभ, पूजापाठ, धार्मिक कार्ये व विधी यात जरी स्वच्छतेच्या दृष्टीने कडक सोवळे परंपरा होती (जी सध्या social distancing या गोंडस नावाखाली आनंदाने स्वीकारली गेली आहे) तरीही कुणाच्याही मनात कधीच जातिभेदाला थारा नव्हता. घरात येणाऱ्या सर्वच माणसांना समान वागणूक दिली जाई. इतकेच काय, तर आडनाव विचारून जात कळते हे देखील मला कळायला पुढे कैक वर्षे लागली.

6 वी पर्यंत मला मी ब्राह्मण आहे व असे इतर वेगवेगळ्या जातीचे लोक असतात आणि ते एकमेकांत भांडतात सुद्धा हे माहीतच नव्हते. 7 वीत असताना एकदा माझा खास मित्र मधल्या सुट्टीत एकत्र डबा खाताना मला अचानक म्हणाला की मला तुझी जात आवडत नाही. माझ्यासाठी हा बॉम्ब होता. ज्याच्या सोबत मी एकत्र डबा खायचो, पाणी प्यायचो, खेळायचो तो एक दिवस अचानक मला असे का म्हणाला? मी विचारले असता त्याचे उत्तर आले की तुझ्या लोकांनी माझ्या लोकांवर अन्याय केला होता म्हणून तुझी जात मला आवडत नाही. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याने मैत्री तोडली ती कायमची!
त्यावेळी जो पहिला झटका बसला होता तो आयुष्यात पुढे सातत्याने बसत गेला. 8-9 वीत असताना मला हाक मारताना सुद्धा काही मित्र ए बामना अशीच हाक मारत. खूप राग येई, पण केवळ मैत्री तुटू नये म्हणून तेही सहन केले. समाज असा का आहे याचा सखोल अभ्यास मात्र मी त्यावेळी सुरू केला होता व मला बऱ्याच प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली होती.
पुढे 11 वीला गेल्यावर 10वीत A ग्रेड मार्क असूनही मला मेरिट मध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा विषय मिळाला नाही. मी नाराज होऊन शेवटी न आवडणारा मानसशास्त्र हा विषय घेतला. उदास होऊन बसलेलो असताना कॉलेजचाच एक ओळखीचा मुलगा (मित्र शब्द वापरत नाही), ज्याला 10वीत C grade असूनही electronics मिळाले होते, तो माझ्याजवळ येऊन हसत म्हणाला की भिड्या, तुला आयुष्यात हा विषय मिळणार नाही. मला बघ तुझ्यापेक्षा कमी मार्क असूनही हवा तो subject मिळाला. तू बस मानसशास्त्र वाचत.
असे बोलून तो निघून गेला, पण मी आतून अक्षरशः जळत होतो. या देशात माझे आडनाव हे माझे qualification कसे काय असू शकते, या प्रश्नाचे मला कोणीच उत्तर देऊ शकत नव्हते. 1995 साली माझी 10वी झाली आणि त्यावेळी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी (ब्राह्मण) झाले होते.
मी वहीची काही पाने फाडली आणि माझ्या मनात असणारे ते मळभ त्या पानांवर उतरवले. बघता बघता ते एक 6 पानी पत्र तयार झाले, जे मी खरोखरी श्री मनोहर जोशी यांना पोस्ट केले होते. मी त्यात लिहिले होते की एका जातीवर पूर्वी अन्याय होतो म्हणून त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही आता दुसऱ्या जातीच्या पुढच्या पिढीला (ज्या पिढीचा त्या अन्यायाशी काहीही संबंध नसताना) जबरदस्तीने तसाच अन्याय भोगायला लावताय का? असे केल्याने पूर्वी केलेल्या अन्यायाचे निराकरण होईल असे आपणास वाटते का?
एकाला न्याय देण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय करावा असे कायदा सांगतो का? कोणावरही अन्याय न होता यातून मार्गच तुम्ही काढू शकत नाही का? आणि असे जर असेल तर सत्तेत तुम्ही असून उपयोग काय?
माझ्या 17 वर्षाच्या बुद्धीला व आलेल्या अनुभवाला अनुसरून मी लिहीत गेलो होतो. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या आणि पेनातून शब्दांच्या.
उपयोग मात्र काहीच झाला नाही. पुढे येणाऱ्या प्रत्येक admission च्या वेळी आडनाव हेच माझे प्रथम qualification होत गेले. आणि मी जातीत विभागला गेलो.

इतके जरी झाले तरी माझ्या मनात त्या कोणत्याही जातिबांधवांवर कधीच वैयक्तिक राग किंवा आकस नव्हता व आजही नाही. याला कारण एकच, जन्मापासून घरात असलेले संघ परिवाराचे संस्कार. हिंदू सारा एक हेच सतत जिथे बिंबवले गेले होते तिथे जातीभेद हा प्रकार डोक्यात सुद्धा शिरत नव्हता. पण परिस्थिती मला काहीतरी वेगळेच दृश्य दाखवत होती.

समाजात प्रत्येक वेळी ए भटा, ए पुजाऱ्या, ब्राह्मण भिक्षा मागतात म्हणून ए भीकमाग्या (भिक्षा आणि भीक यात प्रचंड तफावत आहे), ए बामनाच्या, ए शेंडीवाल्या याच नावाने आमची ओळख का होत असेल हे मला आजतागायत कळले नाहीये.

एखाद्या जातीला जर जातीवरून बोलले तर तो जर कायद्याने गुन्हा असेल तर ब्राह्मणांना अशी हाक मारून बोलावणे हा गुन्हा नाही का? याला कायद्याचे कवच का नाही? अश्या मुलांनी मार्क सुद्धा जास्तीत जास्त पाडायचे आणि फी सुद्धा जास्तीत जास्त भरायची हे असे का? असे करून ह्या मुलांवर कायद्याद्वारे न्याय होतोय का अन्याय? ह्या त्यावेळी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही.

कोणताही जातीवाद हा वाईटच हे तर आधीपासूनच कळत होते व मी ते पुरेपूर अवलंबतोसुद्धा. पण त्याच वेळी देशातील राजकारणाची जातीवादी दिशा मात्र मला आजही हतबल करते हे नक्की. 

पसायदान

 नाम घ्यावे अखंड परमात्म्याचे

सदा वदावे नम्र विनय वाचे

स्मरण असावे आपुल्या कर्तव्याचे
ठायी ठायी ||
अर्पावे प्रत्येक काज चरणी
असावे त्याच्या सदैव नामस्मरणी
तरी तरेल अवघड या भवार्णी
निमिषमात्रे ||
शरण रिघावे सत्वरी रमानाथा
आहे जो कळीकाळाचा नियंता
द्वैतभाव सर्व सोडुनी पुरता
तल्लीन व्हावे ||
अखंड व्हावी आज्ञेची उपासना
जरी येवोत अडथळे तीव्र नाना
मनाचा दृढनिश्चयो करा ना
उपासनेसाठी ||
सहाआठाचा खेळ फार मोठा
फस्त होईल पुण्यसंचिताचा साठा
पाप करण्याच्या अनंत अनंत वाटा
विषयाभोवती ||
पहिले गोड अंती विष ते विष
प्राशन करितो आपल्यासाठी महेश
असा तो देवतांचा इश
त्यासी वंदावे ||
राक्षसभूता निर्दाळाया
शिणविली विष्णुने काया
नमस्कार केला तरी तो वाया
जाणार नाही ||
ब्रम्हादेवे रचली सृष्टी
काय वर्णावी त्याची दिव्य दृष्टी
म्हणुनी त्या चतुर्मुख श्रेष्ठी
नमस्कार करावे ||
आता चौथा राहिला सद्गुरु
जो या तिघांचा आधारु
आहे तो पराचाही परू
सच्चिदानंदरुपी ||
कलियुगी वाढली पातके
त्यासाठी पूर्वी वर्तविली सुचके
पुढे अवतार होणार त्या एके
समर्थ मुनीचा ||
असा तो प्रगटला रेवदंड्यासी
आला सत्वरी दास्य रक्षिण्यासी
पापी युगाचा वार सोशिण्याची
तोचि समर्थ ||
आहे तो या अनाथांचा नाथ
मराठी भाषे वदिला तो परमार्थ
दासबोध ठेवीला निरूपणासी सार्थ
श्रोते हटवाया ||
सहजसोपे निरुपणाचे बोल
त्या बोलामाजी ब्रह्मरसाची ओल
देता झाला प्रचिती तो अमोल
सर्व दासांसी ||
अखंड स्वारींच्या चरणी रहावे
श्रीसेवा भक्ती अखंड करीत जावे
आताची मोक्षासी भोगावे
त्याच्या चरणी ||
वाणी वदे सत्य वागेश्वरी
कर्म कृती शुद्ध गंगेचे वारि
आहे त्या समर्थाच्या अंतरी
आर्णव अमृताचा ||
लोकोपकारी वेचली सर्व वर्षे
करितो कर्म अजूनही तेवढ्याच हर्षे
वय सांडले अवघे ते पाऊणशे
दासाचसाठी ||
अशा त्या समर्थांचा आशीष
लाभो घ्यावा हीच एक आस
दुष्ट चक्री न पडण्या विशेष
आज्ञेसी वंदावे ||
चातकाने मागितला थेंबुटा
देता झाला तो सागराचा साठा
मागता प्रकाशाच्या वाटा
प्रकाश उद्गम दिधला ||
समर्था तुझे अनंत उपकार
कैसा फेडेल हा दीन घोर
तरी आहे सामर्थ्य तुझे थोर
तुचि सर्व करावे ||
असे त्या केवळ फुलामाजी सार
सभोवती काटे असती अपार
परी फुलाचा रस सेविताची मधुर
तृप्त तृप्त वाटे ||
तैसे निरुपण हे असावे फुल
काटे ते लोक सर्व अवखळ
परी श्रवणरुपीचे सलिल
पिवूनी तृप्त व्हावे ||
मनाच्या या मागणीसाठी
वर्षली ही जलधारा गोमटी
ईश्वरी अर्पिली शेवटी
प्राण तो ही अर्पिला ||
शेवटी मागणे एकची समर्था
लाभो घ्यावे ह्याची परमार्था
अशाच आनंददायी वृष्टीवार्ता
अखंड अखंड मिळाव्या ||
झाले पूर्ण हे पसायदान
अखंड रहावे चरणीचे ते स्थान
मागणे आता सर्वची निरसोन
'मी' चरणी लीन झाला  ||