Thursday, 29 June 2023

हे श्रीकृष्णा

 हे श्रीकृष्णा, हे श्रीरंगा, हे श्रीहरी, हे श्रीधरा, हे श्रीनिवासा, हे श्रीकांता .... 

ही नावे तुझी आहेत पण त्या नावाची सुरुवात माझ्या नावाने होते!  

होय, मी तुझी शक्ती, मी तुझी लक्ष्मी!

जिथे तू तिथेच मी! 

तू जातोस भक्तांच्या हाकेला धावून, मला सोडून! मी मात्र तुझ्या ओढीने तू जिथे जातोस तिथे येतेच! जिथे तुझे चरण पडतात तिथेच माझे चरण उमटतात. तुला मात्र तुझ्या वेड्या भक्तांपुढे माझ्यासाठीच वेळ नसतो. 

वैकुंठात मला तुझ्या समीप स्थान असते, अगदी चरणाशी स्थान असते पण या भूलोकावर मात्र तू मला तुझ्या समीप बोलावत नाहीस. त्या चरणाशी जागा तुझ्या भक्तांना देतोस. मग मला थोडे लांबूनच तुझ्या भक्तीचा सोहळा पहावा लागतो. 

पंढरपुरी एकटाच आलास, मी आपली दूर शेजारी!

तिरुपतीस डोंगरी जाऊन बसलास, मी आपली डोंगर पायथ्याला!

इतका का आहेस सखया तू भक्त वेडा? श्रीकृष्णरुपात  असतानासुद्धा तू अगदी असाच वागायचास. मी राजप्रासादात तुझ्याशी हितगुज करायची वाट बघायचे आणि तुझ्या मनी मात्र राधा, सुदामा, अर्जुन, द्रौपदी, पेंद्या हेच! 

कधीकधी तर असे वाटते प्राणप्रिया, की ती राधा भाग्यवान आहे आणि तो सुदामाही भाग्यवान आहे. मी तुझ्या चरणाशी असते खरी, पण तुझ्या हृदयी असते ती राधा, तुझ्या श्वासात असतो तो समस्त भक्तमेळा!

हेवा वाटतो रे तुझ्या भक्तांचा मला!

ते भक्त किती भाग्यवान, ज्यांची आठवण तू सतत तुझ्या हृदयी घेऊन असतोस! भक्तांच्या कर्मभोगाने तू व्यथित झालेला मी रोज पाहते रे, पण नियतीचे, जगरहाटीचे नियम एकदा केले की ते बदलता येत नाहीत ना!

त्यामुळे तू सुद्धा प्रशांतरूप घेऊन शेषशयन झालेला असतोस. 

एक मात्र खरे, तू स्मर्त्रुगामी आहेस नारायणा! 

एक हाक, काळीज पिळवटून टाकणारी फक्त एक हाक तुला पुरेशी असते धावून जायला! भले तो गजेंद्र असो वा द्रौपदी!

मी स्वतःस भाग्यवान समजते की मी तुझीच शक्ती आहे!

धन्य आहेस तू भगवंता!!!


श्रीदत्तचरणरज

सचिन श्रीकांत भिडे

सावळा तो माझा कान्हा

 सावळा तो माझा कान्हा, विटेवरी प्रकटला

पुंडलिका भेटीसाठी, युगे युगे आसुसला ।।

त्यागूनी त्या वैकुंठाला, अवतरे पंढरीला

भक्ताचिया प्रेमापोटी, रुक्मिणीसी विसरला ।।

विठू वेडा भक्तीसाठी, त्रास त्यांचे स्वतः सोसि

मार भक्ता वळ विठुसि, प्रेमे सर्वा उद्धरिसी ।।

कुणाघरी पाणी भरी, कुणाघरी दळणे करी

कुणापायी रुतता काटा, सत्वरी तो दुरी करी ।।

शील रक्षिसी भक्तांचे, कर्ज फेडी जाऊनि त्यांचे

भक्तासाठी विमानी तू, दार उघडी वैकुंठाचे ।।

कुणामुखी गीता वदवी, कुणी स्तोत्र ओवी गावी

टाळ मृदुंगाच्या गजरी, कुणी चिपळ्या नाचवी ।।

युगे युगे धरतीवरती, उभा असा विठुराया

सादा प्रतिसाद देशी, सागराची तुझी माया ।।

याची कारणे भेटीशी, भक्त येती पंढरीला

माहेराचे आहे सुख, तुझ्या एका दर्शनाला ।।

वीणा बोले विठ्ठल नाम, पायी चालवी तो श्याम

तुझ्या एका भेटीसाठी, दिला गात्रांसी आराम ।।

आता अर्पितो हा सगळा, भार केला मी जो गोळा

मुक्ती देई मोक्ष आता, डोळा दाखवी सोहळा ।।


श्रीदत्तचरणरज

सचिन श्रीकांत भिडे

Monday, 12 June 2023

मी येतोय रे माझ्या सख्या!

 मी येतोय रे माझ्या सख्या! माझ्या जीवीच्या जिवलगा, माझ्या प्रियकरा! मी धावत येतोय रे तुझ्या भेटीला!

आहेस ना रे तू तिथेच, त्याच विटेवर? गाऱ्हाणे ऐकायला गेला असशील तर बेगीने ये बा परत!

कुठे पाणक्या म्हणून पाणी भरत असशील तर तिथूनही ये रे सत्वर. दळण दळून झाले नसेल तर ते सोडून ये रे त्वरेने माझ्या सख्या!

तुझ्याविना जीव कसा तळमळत असतो 11 महिने. पण केवळ वाट बघणे नशिबात असते. 

ती उन्हाची काहिली परवडेल रे एकवेळ, पण तुझ्या विरहात जळणारे हे हृदय व त्याची काहिली नाही रे सहन होत. चंदनाची चोळी माझे अंग खरंच पोळून टाकते. 

या विरहाच्या काहिलीतून सुटका करतो तो आषाढ मास! ती माझ्या काळोबाची एकादशी, माझ्या राजस सुकुमाराची एकादशी.


माझ्या राजसा, मी इथे तुझी वाट बघतो व तू तिथे माझी वाट बघतोस ना रे! तुला पण किती आनंद होत असेल ना तुझी वेडी लेकरे रांगत, धावत, खुरडत का होईना पण तुझ्याकडे येत आहेत ते बघून!

ते बघ, ते बघ, तो माझा तुकोबा, ती माझी ज्ञानाई, दोघे निघालेत बरं तुझ्याकडे यायला. ही तुझी आवडती दोन लेकरे तुला भेटली की तू काय बोलतोस रे त्यांच्याशी? माझी ज्ञानाई तुला काय सांगते रे कान्होबाई? माझा तुकोबा तुला कोणता अभंग ऐकवतो तो सांग ना विठ्ठला मला! माता इंद्रायणी भीमाईस भेटून काय हितगुज करते हे पण सांग ना रे मला!  भेटलो की सांगशील ना? 


तुझेच नाम गात, तूच दिलेले खात जेंव्हा पंढरीत

पोहोचतो त्यावेळी तुझ्या त्या एका नेत्र कटाक्षाने 11 महिन्याची तळमळ कशी क्षणात विरून जाते बघ. उरते ते समाधान!

पण माऊली, तुझ्यासमोर मी उभा राहिलो ना की तू मला दिसतच नाहीस रे!

तुझे रूप पाहिले ना की ते आषाढाचे ढग आकाश सोडून माझ्या डोळ्यातूनच बरसू लागतात रे कान्हा. मला डोळे भरून पाहायचं असतं रे तुला, पण आनंदाश्रूने आधीच भरलेल्या डोळ्यात तुला कसे भरू मी?  त्याच भारावलेल्या अवस्थेत तुझ्या चरणावर डोके ठेवले की त्या अश्रूंचाच अभिषेक होतो रे सख्या तुझ्या चरणी. ते नवनीताहूनही कोवळे चरण सोडून जावेसे वाटत नाहीत रे विठ्ठला. त्या चरणपाशात असेच कायम गुंतून राहवेसे वाटते. 

प्रियकरा, तुझ्यासाठी, तुला द्यायला मी येताना खाऊ आणलेला असतो.पण तुझ्या रुपात, तुझ्या नामात बुडालेला मी तो तुला द्यायलाही विसरतो. तू पण मागत नाहीस, शांतपणे फक्त पाहतोस माझ्याकडे आणि स्मितहास्य करतोस! 

तुझे दर्शन घ्यायला येताना माहेरी चालल्याचे समाधान असते चेहऱ्यावर, पण तेच तुझे चरण सोडून माघारी निघताना सासरी निघाल्याचे दडपण. 

मी निघतो खरा, पण माझे काळीज तर तुझ्या चरणीच राहिलेले असते माऊली. मागे वळून वळून आईचे रुपडे न्याहाळत बाहेर पडतो तेंव्हा डोळी पाझरतात ते अश्रू नक्की कोणते? माझी माय भेटली त्या आनंदाचे, का आता माय पुन्हा पुढील आषाढीलाच दिसणार या दुःखाचे? 

 @श्रीदत्तचरणरज

सचिन श्रीकांत भिडे