Sunday, 26 March 2023

सावरकर व राहुल गांधी

 "मै राहुल सावरकर नही राहुल गांधी हू". 

"मै माफी नही मांगूंगा"

 "सावरकरजीने कहा था कि मै सदैव आपका नोकर बनने के लिये तय्यार हू'

ही आहेत माजी खासदार श्री राहुल गांधी यांच्या तोंडची श्री विनायक दामोदर सावरकर या थोर क्रांतिकारकाचा अपमान करणारी काही वाक्ये.

 देशाच्या स्वातंत्र्यासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या क्रांतीसूर्य भारतरत्न सावरकरांवर यथेच्छ चिखलफेक करणाऱ्या राहुल गांधी यांचा प्रथम जाहीर निषेध.


'व्हेरी डेंजरस' असे लिहिलेला बिल्ला ज्या कैद्याच्या गळ्यात अडकवून ज्याला अंदमानच्या तुरुंगात साठ वर्षे खितपत ठेवायला धाडले होते ते क्रांतिकारक सावरकर जगातील एकमेव व्यक्ती होते ज्यांना एकदम सलग एकत्र दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. स्वतःच्या संसाराची कुटुंबाची राखरांगोळी झालेली स्वतःच्या डोळ्याने बघूनही एखाद्या अभेद्य तटबंदीसारखा जो माणूस देशसेवेशी एकचित्त राहिला त्या सावरकरांवर लांच्छन लावायची राहुल गांधींची हिंमत होतेच कशी?


 "चिमण्या पाखरांसारखे घरटे बांधून पिले जन्माला घालून वंश वाढवायचा संसार आपल्याला करायचा नाहीये. आपल्याला आपल्या भारतमातेचा विचार करायचा आहे." या शब्दात आपल्या पत्नीला धीर देऊन समजावून सांगणाऱ्या जितक्या हळव्या तितक्याच खंबीर सावरकरांचा अपमान हे गृहस्थ करतातच कसे ?


देशासाठी मार्सेलीसची जगप्रसिद्ध उडी मारणारे वीर सावरकर, अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन करणारे व मंदिरे सर्वांना खुली करणारे समाज सुधारक सावरकर, स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणारे क्रांतीरत्न सावरकर, आपले परिपक्व ओजस्वी तेज:पुंज विचार कारागृहाच्या भिंतीवर कोरून महाकाव्य लिहिणारे थोर विचारवंत व साहित्यिक सावरकर, देश स्वतंत्र झाल्यानंतरही समाज सुधारणेसाठी लढणारे लढवय्ये सावरकर, हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा अंधश्रद्धा यांचा अंत होऊन हिंदू धर्म जातीविरहित व विज्ञाननिष्ठ व्हावा म्हणून झिजणारे हिंदूहृदयसम्राट सावरकर, स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारने उपेक्षा केल्याने आता आपले लौकिक कर्तव्य संपले हे स्वीकारून शांतपणे प्रायोपवेशनाने शरीरत्याग करणारे धीरोदात्त सावरकर!

अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा अपमान करणे म्हणजे माथ्यावरील सूर्यावर थुंकल्यासारखे आहे व हा अपमान राहुल गांधी यांनी वारंवार केलेला आहे.


 देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्वच शूरवीरांना समान मानवंदना द्यावी हा सरळ साधा विचार असताना, केवळ काँग्रेसच्या विचारांच्या विरोधात असल्याने काँग्रेस पक्ष व त्यातून फुटून बाहेर पडलेले स्थानिक पक्ष व त्यांचे नेते अशा क्रांतीवीरांचा सतत अपमान करत असतात जे अत्यंत चुकीचे आहे व समाजाच्या एकोप्यास बाधा आणणारे आहे.


 आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी हे स्पष्ट सांगितले आहे की सावरकरांचा अपमान हाही एक प्रकारे देशद्रोहच आहे.


अशा थोर क्रांतिकारकाचा अपमान हा समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे, मराठी जनतेचा अपमान आहे, मराठी अस्मितेचा अपमान आहे, समस्त हिंदूंचा अपमान आहे व सावरकरांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या जगभरातील कोट्यावधी जनतेचा अपमान आहे.

सचिन श्रीकांत भिडे

No comments:

Post a Comment