Sunday, 26 March 2023

रमजान व हिंदू

 कुठल्याही नकारात्मक अथवा पूर्वग्रहदूषित कमेंट्स लिहायच्या आधी एक तर लेख पूर्ण वाचा, समजून घ्या आणि इतकेच ध्यानात ठेवा की हा लेख भगवान परशुरामाच्या अवलादीने लिहीलेला आहे. 


आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सांगितले आहे की प्रत्येकाकडून काही ना काही चांगले शिकण्यासारखे असते व ते जर आपण घेतले व आपल्या धर्माला अनुरूप असे त्याला रूप दिले तर आपला धर्म अजून जास्त बळकट होऊ शकतो. त्या अनुषंगाने हा लेख मी लिहीत आहे.


रमजान मुबारक -----


आजपासून इस्लामचा पवित्र असा रमजान महिना सुरू होतोय. आजचा दिवस ते रमजान ईद असा साधारण 28 दिवसाचा कालावधी व ईदनंतर साधारण 60 ते 70 दिवसाने येणारी बकरीद हा या इस्लाम पंथाचा पवित्र कालावधी समजला जातो.


 या महिन्यात मुस्लिम लोक ज्या पावित्र्याने देवभक्ती व देशसेवा करतात, गरिबांची सेवा करतात त्याला तोड नाही.(आता लगेच याचा अर्थ आपल्या धर्मात असं कोणी करतच नाही का वगैरे म्हणू नका. पण हल्ली आपल्या धर्मात भक्तीपेक्षा तोंड वाजवणं जास्त असतं, ज्याला आळा बसला पाहिजे. द्यायचा एक रुपया आणि फरश्यांवर, भिंतीवर नावे कोरून घ्यायची हे आपल्या धर्मात जरा अति होतंय)


 इस्लाममध्ये गुप्तदान या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. या रमजान महिन्यात 28 दिवसात अब्जावधी रुपयाचे दान दिले जाते व ते दान कोण देतो हे कुणालाही कळत नाही, कारण ते गुप्त असते. हे रमजानचे दान देण्यासाठी लोक वर्षभर दर महिन्याला आपल्या कमाईतून ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवतात. (या पैशाचा वापर जे वाईट मार्गासाठी करतात तो भाग या लेखाचा भाग नाही. यातील उद्देश एकच आहे की यांच्याकडचे जे चांगले गुण, चांगले विचार आहेत ते आपण घ्यायला पाहिजेत.) 


संपूर्ण 28 दिवस ते लोक देवाचे नामस्मरण करण्यात, त्यांचा पवित्र ग्रंथ वाचण्यात, देवाशी संबंधित अशा गोष्टी वाचण्यात, ऐकण्यात घालवतात. दिवसभराचा उपवास करतात. उपवास सुरू करताना व सोडताना देवाच्या नावाने, त्याच्या प्रार्थनेने, कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार सर्वजण एकत्र बसून उपास धरतात व सोडतात. आपल्यामध्ये ही परंपरा व पद्धत लोप पावत चालली आहे. आपण विभक्त होत आहोत व ते एकत्र येत आहेत.

आपणही असे एकत्र येणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक नवरात्री फराळ, सार्वजनिक दिवाळी फराळ असे उपवासाचे अथवा सणांचे निमित्त करून एकत्रीकरणाचे कार्यक्रम आपल्या धर्मात होणे अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून सर्व जातीपंथाचे लोक हिंदू या धर्माछत्राखाली एकत्र येतील व आपल्यातील एकोपा वाढेल. यातील गरजूंना आपल्या समाजातील, आपल्या धर्मातील धनाढ्य लोकांनी एखादा व्यवसाय स्थापन करण्यासाठी मदत करावी, त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, पाय खेचणे थांबवावे.


 ही अशी मदत मुस्लिम पंथांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसते. देव धर्मकार्य समाजाच्या उन्नतीसाठी जकात भरणे, आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे, पाच वेळचा नमाज अता करणे ह्या प्रथा ते अतिशय कट्टरपणे अमलात आणतात. 


आपण आपल्या कुलदेवतेला असे नियमाने जातो का, आपल्या पुढच्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून देतो का? आपल्या समाजातील किती गरीब कुटुंबांना आपण मदत करतो याचा आपणही  सूक्ष्म विचार केला पाहिजे.


 आपल्या देवाला कोणीही येतं व नावे ठेवून जातं पण त्यांच्या बाबतीत असं होत नाही. कारण त्यांनी आपल्या देवधर्म रक्षणासाठी शपथ घेतलेली आहे, आणि आपण मात्र अतिशय धर्मनिरपेक्ष होऊन जगतो.

 तेव्हा या सर्व गोष्टीतून काहीतरी शिकून आपण आपला धर्म कसा वाचवावा, कसा वाढवावा, कसा पुढे न्यावा, जातीभेद कसा नष्ट करावा, सर्वांनी एकत्र कसे यावे व हिंदू या नावाचा सगळीकडे आदर कसा असावा, एक आदरयुक्त दहशत कशी असावी हे या रमजानच्या काळात शिकण्यासारखे आहे.


आपल्या देवाचे पावित्र्य आपल्या हातात असते. आपल्या धर्माचे रक्षण आपल्या हातात असते.

तेव्हा मुस्लिम पंथाकडून अनेक चांगल्या शिकण्यासारख्या गोष्टी घेऊन आपल्याला अतिशय सबळ होणे गरजेचे आहे व याची नितांत आवश्यकता आहे. 


पवित्र रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा.


सचिन श्रीकांत भिडे

No comments:

Post a Comment