संत जीवन ...
भल्या पहाटे उठावे. त्या जगन्नियंत्याचे आभार मानावे की त्याने आपल्याला आजचा सूर्योदय दाखवला, आपल्याला आजच्या दिवसाचे श्वास उसने दिले!
मनात नाम व शरीराने काम सुरू करावे.
स्नानादी आन्हिक कर्मे झाली की त्या गाढ निद्रेतील सुकुमार बालकृष्णापुढे बसावे व आपल्या मधुर आवाजात त्याला गोंजारत
म्हणावे -
उठ उठ पंढरीनाथा, उठ बा मुकुंदा, उठ पांडुरंगा देवा, पुंडलिक वरदा.
त्या नरशार्दूलाला सांगावे की उत्तिष्ठ नरशार्दूल, कर्तव्यं दैवमान्हिकम्.
उन्नीकृष्णन् जागे झाले की त्यांना सांगावे
कुक्षी घेऊनिया कुंभा, उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाळा.
मग त्या नटेशाला स्नान घालावे व म्हणावे तुला स्नान घालितो मी, चक्रधर राया.
गौरीतनयाचे स्नान झाले की त्यास वस्त्र अलंकार अर्पण करावे व नैवेद्य दाखवत म्हणावे की माझ्या बाळा तू खा रे साखर लोणी!
सुकुमाराने नैवेद्य स्वीकार केला की त्याला नमस्कार करून एकच मागणे मागावे की नारायणा, अखंड तुझ्या नामस्मरणात, आज्ञेत व सामर्थ्यात ठेव.
त्याला हे मागून आपण आपली दैनंदिन कामे सुरू करावीत. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम हे मात्र विसरू नये.
आपण दिवसभर जे जे करतो, भोगतो, अनुभवतो, जगतो ते ते सर्व त्या आदिनाथाचा आदेश म्हणून स्वीकारावे व सर्व त्या रमारमणाच्या चरणी अर्पण करावे.
खानपान करताना भगवंताचे आभार मानावे की त्याच्या कृपेने मला सुखाचे दोन घास मिळत आहेत. खाताना अन्नपूर्णेच्या हाताने खावे व प्राशन करताना श्रींचे चरणामृत प्यावे.
संपूर्ण दिवस नाम घेत कर्म करत सरला की प्रसाद अर्पण करून भोजनांती जगदिशाच्या जवळ जाऊन त्याचे कोमल चरण चेपत म्हणावे की हे अनाथनाथा आम्हाला सांभाळून तू सुद्धा थकला असशील ना रे? तुझे पाय चेपून देतो, त्याचा स्वीकार कर.
नंतर स्वामींना निद्रासन तयार करून घ्यावे व म्हणावे पवडीसु परमात्मा श्री वेंकटेशा, मनविम्ब मल्लिगेय हुव हासिगे मेले, हे परमात्मा श्री वेंकटेशा, या इथे पहुडा. माझ्या मनाच्या मोगऱ्याचा बिछाना केला आहे तुमच्यासाठी त्यावर निद्रा करा.
त्या सर्वेशाला विश्रांती घ्यायला सांगून त्याचा निरोप घेऊन सर्व दिवस त्याच्या चरणी अर्पण करून मग आपण निद्राधीन व्हावे.
श्रीदत्तार्पणमस्तु
श्रीदत्तचरणरज
सचिन श्रीकांत भिडे
No comments:
Post a Comment