जाणिवेचा अभाव, नेणिवेचा प्रभाव
मोक्षाचा तो ठाव, सापडे कैचा
कामाची प्रगती, नामाची दुर्गती
ईश्वराची प्राप्ती, व्हावी कैची
साधनेचे ढोंग, सज्जनाचे सोंग
नशिबाचे भोग, संपती कैचे
बुडतसे कामी, नाही ओढ नामी
ईश तो अनामी, गावे कैचा
ज्याने श्वास दिला, त्याला विसरला
छंद जो लागला, विषयांचा
विषयांचा दाता, जरी तोची ईश
होई तेही विष, हव्यासाने
विषयांचे विष, चढते सत्वरी
उतर न उतरी, जन्मोजन्मी
उपाय तो एक, नामाचे लेपन
मनाला वेष्टन, नाम हेचि
कामात बुडाला, जीवनी संपला
नामात बुडाला, तरतसे
नाम हेच ध्येय, ठेवा जीवनाचे
वाकुड्या मनाचे, नियंत्रण
नाम देई सुख, ईश चरणांचे
भव बंधनांचे, बाढ संपे
मुक्ती देई नाम, मोक्ष देई नाम
चरणी विश्राम, श्रीदत्तचरणरजा
@श्रीदत्तचरणरज
सचिन श्रीकांत भिडे
No comments:
Post a Comment