एक ब्राह्मण म्हणून मी अनुभवलेला जातीवाद
********************************मी जन्माने कोकणस्थ ब्राह्मण आहे. लोकसंख्येतील प्रमाणाच्या दृष्टीने कायमच अल्पसंख्यांक असलेल्या या वर्गाने देशाला लढवय्ये महापुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक, कवी, लेखक, सच्चे इतिहासकार, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, राजकारणी, शिक्षक, संत सद्गुरू, विचारवंत, पत्रकार, खेळाडू, देशरक्षक, साहित्यिक, गणितज्ञ, भाषा शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते अश्या वैविध्यपूर्ण क्षेत्रातील अग्रणी दिलेले आहेत व त्याच कुलपरंपरेत माझाही जन्म झाला हे मी माझे भाग्यच समजतो.
माझ्या घरातील वातावरण पापभिरू, धार्मिक व आध्यात्मिक. रीतिरिवाज, सणसमारंभ, पूजापाठ, धार्मिक कार्ये व विधी यात जरी स्वच्छतेच्या दृष्टीने कडक सोवळे परंपरा होती (जी सध्या social distancing या गोंडस नावाखाली आनंदाने स्वीकारली गेली आहे) तरीही कुणाच्याही मनात कधीच जातिभेदाला थारा नव्हता. घरात येणाऱ्या सर्वच माणसांना समान वागणूक दिली जाई. इतकेच काय, तर आडनाव विचारून जात कळते हे देखील मला कळायला पुढे कैक वर्षे लागली.
6 वी पर्यंत मला मी ब्राह्मण आहे व असे इतर वेगवेगळ्या जातीचे लोक असतात आणि ते एकमेकांत भांडतात सुद्धा हे माहीतच नव्हते. 7 वीत असताना एकदा माझा खास मित्र मधल्या सुट्टीत एकत्र डबा खाताना मला अचानक म्हणाला की मला तुझी जात आवडत नाही. माझ्यासाठी हा बॉम्ब होता. ज्याच्या सोबत मी एकत्र डबा खायचो, पाणी प्यायचो, खेळायचो तो एक दिवस अचानक मला असे का म्हणाला? मी विचारले असता त्याचे उत्तर आले की तुझ्या लोकांनी माझ्या लोकांवर अन्याय केला होता म्हणून तुझी जात मला आवडत नाही. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याने मैत्री तोडली ती कायमची!
त्यावेळी जो पहिला झटका बसला होता तो आयुष्यात पुढे सातत्याने बसत गेला. 8-9 वीत असताना मला हाक मारताना सुद्धा काही मित्र ए बामना अशीच हाक मारत. खूप राग येई, पण केवळ मैत्री तुटू नये म्हणून तेही सहन केले. समाज असा का आहे याचा सखोल अभ्यास मात्र मी त्यावेळी सुरू केला होता व मला बऱ्याच प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली होती.
पुढे 11 वीला गेल्यावर 10वीत A ग्रेड मार्क असूनही मला मेरिट मध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा विषय मिळाला नाही. मी नाराज होऊन शेवटी न आवडणारा मानसशास्त्र हा विषय घेतला. उदास होऊन बसलेलो असताना कॉलेजचाच एक ओळखीचा मुलगा (मित्र शब्द वापरत नाही), ज्याला 10वीत C grade असूनही electronics मिळाले होते, तो माझ्याजवळ येऊन हसत म्हणाला की भिड्या, तुला आयुष्यात हा विषय मिळणार नाही. मला बघ तुझ्यापेक्षा कमी मार्क असूनही हवा तो subject मिळाला. तू बस मानसशास्त्र वाचत.
असे बोलून तो निघून गेला, पण मी आतून अक्षरशः जळत होतो. या देशात माझे आडनाव हे माझे qualification कसे काय असू शकते, या प्रश्नाचे मला कोणीच उत्तर देऊ शकत नव्हते. 1995 साली माझी 10वी झाली आणि त्यावेळी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी (ब्राह्मण) झाले होते.
मी वहीची काही पाने फाडली आणि माझ्या मनात असणारे ते मळभ त्या पानांवर उतरवले. बघता बघता ते एक 6 पानी पत्र तयार झाले, जे मी खरोखरी श्री मनोहर जोशी यांना पोस्ट केले होते. मी त्यात लिहिले होते की एका जातीवर पूर्वी अन्याय होतो म्हणून त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही आता दुसऱ्या जातीच्या पुढच्या पिढीला (ज्या पिढीचा त्या अन्यायाशी काहीही संबंध नसताना) जबरदस्तीने तसाच अन्याय भोगायला लावताय का? असे केल्याने पूर्वी केलेल्या अन्यायाचे निराकरण होईल असे आपणास वाटते का?
एकाला न्याय देण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय करावा असे कायदा सांगतो का? कोणावरही अन्याय न होता यातून मार्गच तुम्ही काढू शकत नाही का? आणि असे जर असेल तर सत्तेत तुम्ही असून उपयोग काय?
माझ्या 17 वर्षाच्या बुद्धीला व आलेल्या अनुभवाला अनुसरून मी लिहीत गेलो होतो. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या आणि पेनातून शब्दांच्या.
उपयोग मात्र काहीच झाला नाही. पुढे येणाऱ्या प्रत्येक admission च्या वेळी आडनाव हेच माझे प्रथम qualification होत गेले. आणि मी जातीत विभागला गेलो.
इतके जरी झाले तरी माझ्या मनात त्या कोणत्याही जातिबांधवांवर कधीच वैयक्तिक राग किंवा आकस नव्हता व आजही नाही. याला कारण एकच, जन्मापासून घरात असलेले संघ परिवाराचे संस्कार. हिंदू सारा एक हेच सतत जिथे बिंबवले गेले होते तिथे जातीभेद हा प्रकार डोक्यात सुद्धा शिरत नव्हता. पण परिस्थिती मला काहीतरी वेगळेच दृश्य दाखवत होती.
समाजात प्रत्येक वेळी ए भटा, ए पुजाऱ्या, ब्राह्मण भिक्षा मागतात म्हणून ए भीकमाग्या (भिक्षा आणि भीक यात प्रचंड तफावत आहे), ए बामनाच्या, ए शेंडीवाल्या याच नावाने आमची ओळख का होत असेल हे मला आजतागायत कळले नाहीये.
एखाद्या जातीला जर जातीवरून बोलले तर तो जर कायद्याने गुन्हा असेल तर ब्राह्मणांना अशी हाक मारून बोलावणे हा गुन्हा नाही का? याला कायद्याचे कवच का नाही? अश्या मुलांनी मार्क सुद्धा जास्तीत जास्त पाडायचे आणि फी सुद्धा जास्तीत जास्त भरायची हे असे का? असे करून ह्या मुलांवर कायद्याद्वारे न्याय होतोय का अन्याय? ह्या त्यावेळी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही.
कोणताही जातीवाद हा वाईटच हे तर आधीपासूनच कळत होते व मी ते पुरेपूर अवलंबतोसुद्धा. पण त्याच वेळी देशातील राजकारणाची जातीवादी दिशा मात्र मला आजही हतबल करते हे नक्की.
No comments:
Post a Comment