Sunday, 7 January 2018

भावना, अधिकार आणि कर्तव्य .....

हल्ली भावना दुखावणं हे सर्दी होण्यासारखं झालय. जरा वातावरण बदललं की जशी लगेच सर्दी होते अगदी तसं जरा काही झालं की लगेच आमच्या भावना दुखावतात. भावना इतक्या स्वस्त कशाकाय झाल्या काय माहित

प्रत्येक समाजाचा आणि समाजातील प्रत्येकाचा एक म्होरक्या हा असतोच आणि अशा प्रसंगी तो जागृत झाला नाही तरच नवल ! अधिकारवाणीने भावना दुखावल्या गेल्याची उद्घोषणा होते आणि कायद्याच्या विविध कलमांचा कीस काढून एक नवा राजकीय खेळ सुरु होतो. हा भावना आणि अधिकाराचा खेळ खेळून समाजाचा काही फायदा तर होत नाही पण राजकीय मंडळींची पोळी मात्र अगदी खरपूस भाजून निघते. असो.. 

काही दिवसापूर्वी एक गाणे ऐकले. त्यातील काही ओळी कानावर पडल्या आणि त्या तशाच घुमत राहिल्या... 
           
'कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो, हलाहलाते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो'

हे ऐकून मनात एक समाजसुलभ विचार आला की आता हे कर्तव्य कशाशी खातात? आणि त्या शंकराला कुणी सांगितलं होतं ते हलाहल प्राशन करायला? प्रश्न विचार करायला लावणारा होता. मला माझ्या भावना आहेत, मला माझे अधिकार आहेत आणि ह्याचा वापर कसा कधी कुठे करायचा हे पण मला माहित आहे. पण ... मला माझी कर्तव्यं माहित आहेत का??????? 

मला घरात सर्वांवर अधिकार गाजवायला आवडतो पण सर्वाना सांभाळण्याचे आद्य कर्तव्य मात्र मी करत नाही. मला माझ्या सोसायटीच्या समितीमध्ये अधिकार हवे असतात पण सर्व सभासदांशी उत्तम संबंध ठेवणे आणि त्यांची कामे करण्याचे कर्तव्य मात्र मला दिसत नाही. मुलांच्या शाळेत गुरुजनांच्या चुका विसरता मी त्यांना दाखवून देतो पण घरी येऊन आपल्या मुलाचा अभ्यास मात्र मी घेत नाही. माझ्या गाडीच्या प्रवासात रस्त्यात खड्डे आलेले मला आवडत नाहीत. सरकारचे आई बाप निघतात मग ! पण इनकमटॅक्स भरायच्या वेळी मात्र मी लगेच सी कडे जाऊन काही ऍडजस्ट होतंय का हेच बघतो. माझे गाव स्वच्छ असावे असे मला वाटते, मग त्या बाबतीत मी प्रशासनाला पत्रे लिहून त्यांच्या जबाबदारीची जाणीवपण करून देतो, आणि इकडे मी मात्र पान तंबाखू खाऊन रस्त्यावर बिनधास्त थुंकतो. गरिबी हटाव, समानता, बंधुता, ह्या विषयांवर सेमिनार झडतात तेव्हा मी अगदी उत्साहाने त्यात सक्रिय सहभाग घेतो पण बाजारात भाजी घेताना त्या शेतकऱ्याशी रुपये कमी करण्यावरून अर्धा तास हुज्जत नक्की घालतो. घरात देवाचा काही कार्यक्रम असला की मी विशिष्ट समाजालाच बोलावतो आणि बाकीच्याना मात्र त्याच्या दर्शनाचा साधा लाभही मिळू देत नाही. माझ्या देशात काय फालतूपणा चाललाय अथवा काय बेईमान सरकार आहे हे बोलायला मी क्षणाचाही विलंब लावत नाही पण ज्या वेळी मतदान असते तेंव्हा मी सुट्टीसाठी सहकुटुंब गोव्याच्या बीचवर उताणा पडलेला असतो. थोडक्यात काय तर माझे अधिकार अंगाखांद्यावर खेळवायला मला खूप आवडते पण त्याच वेळी कर्तव्य हा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी तो अंगावर पडलेल्या पालीसारखा झटकला जातो.

असा मी असेन आणि असा हा समाज असेल तर आपण कधी आणि कसे होणार पुढारलेले? घरात बसून नुसती अमेरिका अशी आहे आणि जपान असा आहे ह्या फालतू गप्पा हाणून काहीही साध्य होणार नाही. ते इतके कसे सुधारले याचे मूळ शोधावे लागेलते मूळ आहे त्यांना झालेल्या कर्तव्याच्या जाणिवेत. मी एकटा करून काहीही होणार नाही असा निराशावाद त्यांच्यामध्ये नाही. या उलट मीच केले नाही तर कुणीच करणार नाही ह्या विचाराने जो तो प्रेरित असतो. आणि म्हणूनच प्रत्येकजण आपली कर्तव्ये प्रथम समजून घेतो आणि मग ती प्रामाणिकपणे पार पाडतो. जेंव्हा अशी कर्तव्य समजून घेणारी ती प्रामाणिकपणे पार पाडणारी पिढी समाजात निर्माण होते त्यावेळी प्रत्येकाने केलेल्या कर्तव्यपूर्तीमुळे दुसऱ्याच्या भावनांचा आपोआप सन्मान केला जातो, मान राखला जातो आणि परिणामतः आपल्यासारखा 'भावना दुखरा' समाज तिथे तयार होत नाही तयार करायचा म्हणलं तरी तयार केला जाऊ शकत नाही
     
म्हणूनच सर्व प्रथम येते ते आपले कर्तव्य. ज्याला आपल्या कर्तव्याची खरी जाणीव होते जो आपली कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडू शकतो तो समाजातील एक सन्माननीय सदस्य होतो आणि असा सदस्य कधीच कुणाच्या भावना पायदळी तुडवत नाही. अश्या उत्तम सदस्यांनाच खरा अधिकारी म्हणले जाते कारण अधिकार हा मिळत नसतो तर तो कमवावा लागतो आणि अश्या कर्तव्यपूर्तीतून जपलेल्या भावना ह्याच आपल्याला आपला अधिकार कमवून देतात.

शेवटी निर्णय आपल्या हातात आहे, आपल्याला खरा अधिकारी व्हायचे आहे का फक्त पुढारी

No comments:

Post a Comment