Wednesday, 19 July 2023

बुद्धीस्खलन झालेले पिवळे पंडित

 **बुद्धीस्खलन झालेले पिवळे पंडित**


संस्कृत भाषेचे एक अक्षरही ज्याला बोलता येत नसेल, ज्यांना चार श्लोकांचे एखादे स्तोत्रही छंदबद्धरित्या व्यवस्थित म्हणता येत नसेल, अथवा एखादा संस्कृतगद्यपाठ (धडा) ज्यांना शुद्ध उच्चारात वाचता येत नसेल असे काही लोक हल्ली स्वतःला पिवळे पंडित म्हणवून घेऊ लागले आहेत. (पिवळी पुस्तके वाचून झालेले पंडित).

 संस्कृत विद्वान असल्याचा आव आणून वेद, पुराण, उपनिषदातील वाटेल त्या श्लोकांचा, वाटेल तिथे, वाटेल तसा अर्थ लावत व संदर्भ देत हिंदू देवदेवतांवर, सनातन धर्मावर, संस्कृतीवर अतिशय घाणेरडे आरोप लावून देवतांना लांच्छन लावत आहेत. आपल्या पिवळेपणाने बरबटलेल्या मेंदूतून वाटेल तो अर्थ काढून देवाधर्माच्या नावाला गालबोट लावत आहेत. 


"तुमचे देवच असे होते, तुमची देवीच तशी होती, तुमचे ऋषीमुनीच असे होते  तर तुम्ही तसेच असणार ना !" असली अवांच्छित, अश्लाघ्य वाक्ये सोशल मीडियावर लिहिली जात आहेत. 


 संस्कृत भाषा ही जगातील श्रेष्ठतम भाषा आहेच पण तितकीच गूढ रमणीय भाषा आहे. प्रसंगांची, मंत्रांची, उत्पत्तीची, शास्त्राची अनेक अनेक रहस्ये संस्कृतच्या एका-एका छोट्या-छोट्या शब्दात दडलेली आहेत, ज्या शब्दांचा योग्य संदर्भांनी, पुढील मागील वापरलेल्या शब्दांवरून, कालापरत्वे योग्य अन्वयार्थ व मूळ अर्थ शोधून लावणे हे खरोखरीच दिव्य काम आहे.


ज्या भाषेच्या व्यक्त होण्यावर खरे विद्वान स्तिमित झाले तिथे हे पिवळ्या पुस्तकांचे ग्रॅज्युएट्स, संस्कृत महाकाव्यांचे वाटेल ते अर्थ लावत सुटले आहेत. 


 उदाहरणार्थ काही संस्कृत शब्द घेऊन त्याचा सामान्य अर्थ बघू.

- दारु ( र ला पहिला उकार).

 'दारु' या शब्दाचा अर्थ 'लाकूड' असा होतो. देवदार वृक्षाचे वर्णन संस्कृत ग्रंथात देवदारु असे केलेले आहे. 


- 'सहसा' हा मराठीत वापरला जाणारा शब्द अगदीच वेगळ्या अर्थाने संस्कृतमध्ये वापरला जातो. संस्कृतमध्ये याचा अर्थ 'अचानक' असा आहे.


 -'पाणि' (ण ला पहिली वेलांटी) 

या शब्दाचा अर्थ 'हात' असा आहे. पाणिग्रहण याचा 'पाणी ग्रहण करणे', 'पाणी पिणे' असा अर्थ नसून 'लग्न' असा अर्थ होतो. (इथे 'ग्रहण' याही शब्दाचे अनेक अर्थ आहेत.)


- दिन आणि दीन 

 जिथे 'न' ला पहिली वेलांटी असते त्या दिन शब्दाचा अर्थ 'दिवस' असा होतो, तर 'दीन' या शब्दाचा अर्थ गरीब, दुर्बल, दुबळा, सहाय्यहीन असा होतो.


दिनानाथ - सूर्य

दीनानाथ - गरिबांचा कैवारी 


काना मात्रा वेलांटीनी जिथे संस्कृतचे अर्थ बदलतात.  आजूबाजूच्या प्रसंगावर, संदर्भशब्दांवर अवलंबून असलेल्या एक एक शब्दांचे त्यानुसार अनेक अर्थ निघतात, जे आपल्याला अभ्यासपूर्वकच आत्मसात करावे लागतात. 


काही शब्दांचे रूढार्थ व गुह्यार्थ बघू. 


-लिंग व योनी 


संस्कृतमध्ये 'लिंग' याचा अर्थ 'तत्व' असाही होतो,  'स्वरूप' असाही होतो, 'प्रकार' असाही होतो, 'बीज' असाही होतो, 'ऊर्जा संचयाचे स्थान', 'प्रधान' असाही होतो. 


पुल्लिंग म्हणजे पुरुष गुण प्रधान

स्त्रीलिंग म्हणजे स्त्री तत्व प्रकार 

नपुंसकलिंग म्हणजे पुरुषतत्व, पुरुषस्वरूप अथवा स्त्रीप्राधान्य, स्त्रीबीज नसलेले असे काही


(पुरुषाच्या जननेंद्रियाला संस्कृत मध्ये 'शिश्न' म्हणतात, 'लिंग' म्हणत नाहीत.)


'योनी' याचा अर्थ केवळ स्त्रीची योनी असा नसून एखाद्या विशिष्ठ प्रवाहातील अथवा तश्या प्रकारचा जन्म असाही होतो. 

 - मनुष्य योनी म्हणजे मनुष्याच्या जन्मात

 -  राक्षस योनी म्हणजे राक्षसाच्या पिढीत

 -  देव योनी म्हणजे देवाच्या कुळात


 याच्या अभ्यासाविना, भगवान शंकराचे लिंग (शाळुंका) व देवीशक्तीयोनी यांनी बनलेली शिवपिंडी ही स्त्री योनी व पुरुषाचे लिंग याच्याशी जोडून  वाटेल तो नीचअर्थ काढण्यात हे पिवळे पुस्तकवाले रमण आहेत. 


 - वीर्य  (sperm/semen) 


वीर्य या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत.

ऊर्जा, तेज, धैर्य, अंगातील ताकद, लढण्याचे सामर्थ्य, शक्ती, बुद्धीचे प्राबल्य, तेज, उत्थानशक्ती हे याचे काही अर्थ आहेत. 

वीर्य हा शब्द जिथे कुठे वापरलेला आहे त्या प्रसंगानुरूप या शब्दाचा वेगळा-वेगळा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो.


स्खलन - sperm/semen ejaculation


 या शब्दाचा अर्थ आहे पतीत होणे, पडणे, तेजहीन होणे, तेजरहित होणे, ताकद कमी होणे, ध्यान हटणे, पात्रता कमी होणे, उच्च स्थान गमावणे, स्थानत्याग करावा लागणे, वरून खालच्या दिशेने येणे, अधोगामी वृत्ती तयार होणे, पतित होणे, तपाची-ध्यानाची-योगाची ताकद, ऊर्जा कमी होणे इत्यादी. 


यार्थी वीर्य स्खलन या शब्दांचे किती अर्थ निघतात हे जाणकार नक्की समजू शकतो, पण (Masturbation) हा एकच अर्थ काढणारे हे मतिमंद!  


-  भूत 


या शब्दाचा अर्थ होऊन गेलेला काळ असाही होतो,  एखाद्या प्रकृतीचे, एखाद्या जीवाचे प्रकट रूप असाही होतो अथवा या अनादी आनंदाचे सगुण साकार झालेले रूप असाही होतो.


या नेहमीच्या वापरल्या जाणाऱ्या शब्दांना जर इतके अर्थ असतील तर वेदात, पुराणात, उपनिषदात जे अत्युच्च दर्जाचे साहित्यिक शब्द वापरले आहेत त्या शब्दांचे किती अर्थ निघतील याची कल्पनाही करवत नाही.

तरीही हे पिवळे पंडित स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टवरून बुद्धीस्खलित अवस्थेत हिंदू देवदेवतांवर टीका करत, निंदा करत स्वतःच्या बुद्धीची नीचतम पातळी दाखवून देत आहेत.

अश्या पिवळ्या पंडितांचे वीर्यदोष नष्ट होवो हीच प्रार्थना! 


सचिन श्रीकांत भिडे

No comments:

Post a Comment