Thursday, 13 July 2023

!!भक्तानां अनुरक्तानाम् , त्राता भव जनार्दन!!

 !!भक्तानां अनुरक्तानाम् , त्राता भव जनार्दन!!


श्रीविष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये ही एक ईशविनंती आहे ज्यात मोठा गृह्यार्थ दडलेला आहे. 

या विनंतीचा अर्थ, हे जनार्दना, श्रीपरमेश्वरा, तू तुझ्या भक्तांचा, तुझ्यावर अनुरक्त असलेल्या लोकांचा त्राता हो, उद्धारकर्ता हो. म्हणजेच, श्रीपरमेश्वर अशाच लोकांचा उद्धार करतो जे त्याचे भक्त असतात, त्याच्यावर अनुरुक्त असतात.

 आता या विनंतीच्या शब्दांचा अर्थ-गुह्यार्थ आपण पाहू.


भक्त कुणाला म्हणावे याचे एक उदाहरण आपण घेऊ. समजा एखाद्या शाळेमध्ये मी दाखला न घेता जाऊन बसलो, शाळेची दाखल्यासाठीची कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता मी स्वतःला त्या शाळेचा विद्यार्थी समजू लागलो तर त्याने काही होणार आहे का? अजिबात नाही. कारण असे फक्त मी समजून काहीही उपयोग नसतो.

मला जर त्या शाळेचा विद्यार्थी बनावे असे वाटत असेल तर मला शाळेच्या दाखल्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करून, शाळेचे सर्व नियम समजून घेऊन, पाळून मगच त्या शाळेत प्रवेश करावा लागेल आणि त्या नंतरच शाळा मला ओळखपत्र देऊन माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करेल.

थोडक्यात काय, तर मी स्वतःलाच त्या शाळेचा विद्यार्थी म्हणून जाहीर करणे आणि शाळेने माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करणे यात जो फरक आहे तोच फरक आहे आपण स्वतःला भक्त म्हणणे आणि परमेश्वराने आपला भक्त म्हणून स्वीकार करणे.


 जोपर्यंत परमेश्वर आपला भक्त म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत तो आपला त्राता होऊ शकत नाही, कारण आपण त्याला संपूर्ण शरणागत झालेलो नसतो. श्रीभगवद्गीतेत जसे श्रीपरमेश्वर स्वतः म्हणतात - 

"अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । 

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ "


त्याचप्रमाणे जेव्हा आपण श्रीपरमेश्वरासमोर संपूर्ण शरणागती पत्करतो व जे काही होवो ते तुझ्या इच्छेने होवो, मला अखंड तुझ्या नामस्मरणात ठेव अशी भूमिका घेऊन कर्मयोग स्वीकारतो त्यावेळी श्रीपरमेश्वर आपल्याला त्याचा भक्त म्हणून स्वीकार करतो. अशा भक्तासाठी परमेश्वर काहीही करायला तयार असतो ज्याचे अनेक दाखले आपल्याला भक्तीमार्गात मिळतात. अशा भक्ताला श्रीपरमेश्वर त्याच्या भक्तीयुक्तकर्ममार्गातून तारून नेतो व त्याचा उद्धार करतो.


वर जी विनंती दिली आहे त्यातील दुसरा शब्द आहे "अनुरक्त". अनुरक्त या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शब्दशः अर्थ आहे अडकून पडलेला, आसक्त झालेला, मोहित झालेला. 

मग आता जो माणूस अडकून पडला आहे, आसक्त झालेला आहे त्याचा परमेश्वर उद्धार कसा करेल?

तर याचा गृह्यार्थ असा आहे की जो जीव परमेश्वराच्या नामात, रुपात, प्रीतीत, कीर्तीत चिंब भिजलेला आहे, आसक्त झालेला आहे, त्याच्या चरणाशी अडकून बसलेला आहे, त्याच्या लीलेने मोहित झालेला आहे, म्हणजेच ज्याने आपले सर्वस्व परमेश्वरालाच मानलेले आहे व जो केवळ त्याच्यासाठी जगत आहे अशा अनुरक्त माणसाचा हे परमेश्वरा तू त्राता बन, त्याचा उद्धार कर.


प्रत्येक वेळी श्रीपरमेश्वर आपला जीव वाचवूनच उद्धार करतो अशातला भाग नाही. कधीकधी श्रीपरमेश्वर आपला या जन्मातला प्राण हरण करूनही उद्धार करू शकतो.

 म्हणजेच परमेश्वर जो जन्मदाता आहे, पालनकर्ता आहे व संहारकर्ता आहे, तो ह्या तिन्हीपैकी कोणत्याही प्रकारे आपला उद्धार करू शकतो.


 एका जन्मी केलेल्या पुण्यकर्मामुळे पुढील जन्म उत्तम मिळून, त्या जन्मी परमेश्वराची भक्ती व सहवास साधून, जन्माद्वारे परमेश्वर आपला उद्धार करतो.

सरडा आणि नारद मुनी यांची गोष्ट हे याचे उत्तम उदाहरण आहे.


एखादा उत्तम तऱ्हेने जन्माला आलेला माणूस त्याच्या पूर्ण जन्मात केवळ परमेश्वर भक्ती करतो व भक्तीद्वाराकर्मयोग साधत आपले मार्गक्रमण करतो, अशा कर्मयोगी-भक्तिमार्गी माणसाची भक्ती स्वतः श्रीपरमेश्वर करतो व त्याला या संसारातून तारून नेत संसारात जगत असताना त्याचा उद्धार करतो.

आपल्या संतांची चरित्रे याचे उत्तम उदाहरण आहेत.


आता तिसरे उदाहरण कोणते की जिथे श्रीपरमेश्वर आपला प्राण हरण करून आपला उद्धार करतो? एका जन्मी भक्त असलेला कोणीही त्याच्या काही प्रमादांमुळे किंवा त्याच्या काही भोगांमुळे जेंव्हा इतर जन्मात येतो जिथे त्याच्याच्याने श्रीपरमेश्वर भक्ती केली जात नाही, किंबहुना परमेश्वराला विरोधच केला जातो पण शेवटी प्रत्यक्ष परमेश्वर अवतार घेऊन, त्याचे प्राण हरण करून त्याला त्या योनीतून मुक्तता देतात आणि त्याचा उद्धार करतात.

रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, कंस, वाली, हिरण्यकशपू, हिरण्याक्ष अशी अनेक उदाहरणे इथे देता येतील की ज्यांचा श्रीपरमेश्वर प्राण हरण करून त्राता, उद्धारकर्ता झाला.


थोडक्यात, श्रीपरमेश्वर आपल्यासाठी जे काही करतो ते केवळ आणि केवळ आपल्या भल्यासाठीच असते हे जर आपण लक्षात ठेवले तरच आपण परमेश्वराला अनन्यशरण जाऊ शकतो आणि निष्काम कर्मयोगातून, भक्तिमार्गातून आपली वाटचाल करू शकतो. ज्या क्षणी आपली ती क्रिया सुरू होईल अगदी त्याच क्षणी श्रीपरमेश्वर आपले योगक्षेम चालवायला घेतो जो स्वतः परमेश्वराने दिलेला शब्द आहे, वचन आहे.


तेव्हा कलियुगात अखंड नामस्मरण करत श्रीपरमेश्वराचे भक्त बनायचा व श्रीपरमेश्वराने आपल्याला भक्त म्हणून स्वीकार करायचा आपण प्रयत्न करूया. 


यश देण्यास श्री परमेश्वर समर्थ आहे.


श्रीदत्तचरणरज

सचिन श्रीकांत भिडे

No comments:

Post a Comment